
मूर्तिजापूर/अकोला : विदर्भातील ४५ ते ४६ अंश तापमान, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा आणि अशा परिस्थितीत ५ दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणाऱ्या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहऱ्यावरील थकवा, तणावाची जागा क्षणात आनंदाने घेतली. कारण त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते. अमरावती अकोला मार्गावर विश्वविक्रम झाल्याची घोषणा गिनीच वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
गिनीच वर्ल्ड रेकॉर्डच्या घोषणेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या विश्वविक्रमाचे साक्षीदार असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. अमरावती (Amravati) ते अकोलादरम्यान, (Akola) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राजपथ इन्फ्राकॉनने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडीत काढत नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुधवारी ७ जून २०२२ रोजी माना कॅम्प येथे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्निल डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी राजपथ इन्फ्राकॉन तर्फे 'अखंड रस्त्यावर अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंग' या श्रेणीत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प सोडला. ३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता अमरावती जिल्ह्यातील लोणीपासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला सुरुवात झाली आणि ७ जूनला रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाळ येथे १०९.८८ तासांत पेव्हिंगचे कार्य पूर्ण करून ८४.४०० किलोमीटरचा विक्रम करण्यात आला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच, या विक्रमासाठी घेतलेली प्रचंड मेहनत अखेर फळाला आली. यावेळी उपस्थित कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः: आनंदाश्रू तरळले. रात्री फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष झाला.'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय भवानी जय शिवाजी', 'असा जयघोष सर्वत्र निनादू लागला.
https://www.youtube.com/watch?v=Zvh4I82Vd0g
या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्व्हेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टॅडेम रोलर, १ पीटीआर मशीन, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस, कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे, उच्च ध्येयाने प्रेरित मनुष्यबळ इथे कार्यरत होते.
या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४,००० मेट्रिक टन बिटूमिनससह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली 22 तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते परीक्षण करीत होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.