अमरावती-अकोला मार्गावर आज रात्री प्रस्थापित होणार विश्‍वविक्रम !

या विक्रमानंतर देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
अमरावती-अकोला मार्गावर आज रात्री प्रस्थापित होणार विश्‍वविक्रम !
Nitin GadkariSarkarnama

मूर्तिजापूर (जि. अकोला) ः जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीचा विश्‍वविक्रम आज रात्री प्रस्थापित होणार आहे. 'राजपथ इन्फ्राकॉन' कंपनीने त्यासाठी अविरत श्रम उपसले आहेत. या विक्रमानंतर देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चमुच्या अनुसार अमरावती (Amravati) - अकोला (Akola) मार्गावर आज दुपारी ३ वाजेपर्यंतच निर्धारीत ७५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. आणि गिनीजची टीम मोजमाप करण्याच्या कामात गुंतली आहे. विश्‍वविक्रमासाठी (World Record) कुठलीही कमतरता राहू नये, म्हणून ८० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण केले जाणार आहे. अंतराचे मोजमाप करून गिनीजची टीम रात्री ९.३० वाजता आपला निर्णय देणार आहे. त्यानंतर आकाशाला गवसणी घालण्याची नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि या कामावर राबलेल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता गडकरी संवाद साधणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या विश्वविक्रमी उपक्रमाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील (पूर्वीचा क्रमांक ६) अमरावती जिल्ह्यातील लोणी येथून शुक्रवारी (ता. ३) प्रारंभ झाला होता. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद होण्यासाठी ही प्रक्रिया आज रात्री ९ वाजता पूर्णत्वास जाणार आहे. लोणी ते नागोली-नागठाणा व तेथून दुसऱ्या बाजुने परत असे दोन लेनमधील रस्ता चौपदरीकरणाचे ऐतिहासीक काम आज पूर्णत्वास जाणार असून विश्‍वविक्रम प्रस्थापित होणार आहे.

नितीन गडकरी यांनी लेह लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत रस्ते कसे बांधले, हे आता देशवासियांना सांगणे काही नवे नाही. देशाच्या कुठल्याही भागात जा, नितीनजींनी रस्त्यांचा कायापालट केला आहे. कर्णाच्या दातृत्वाने ते निधीची उधळण करतात आणि पाहता पाहता परिसराचा कायापालट होतो. जिथे प्रवास अशक्य होता तिथे काही तासात अंतर पार करता येईल, अशी किमया करण्याची त्यांची ताकद त्यांनी संपूर्ण देशात सिद्ध करून दाखवली आहे. थेट गंगोत्री, यमुनोत्री पर्यंत नितीनजींच्या अचाट कार्याची पावती लोक मुक्तकंठाने देतात.

एखाद्या शुभ्र श्वेत वस्त्रावर एखादा छोटासा डाग जसा खटकतो तसे एक शल्य गडकरींच्या आवडत्या विदर्भातच होते. देशाचा चेहरा बदलवलेले नितीनजी अमरावती - अकोला मार्ग कधी दुरुस्त करणार, हा सामान्यजनांचा कायम प्रश्न होता. विदर्भात नितीनजींवर प्रेम करणाऱ्या लोकांना पक्ष वैगेरे आडवा येत नाही. त्यांच्या कर्तृत्वाचे व दातृत्वाचे लोक दिवाने आहेत. अमरावतीहून अकोल्याला जाताना हा रस्ता कधी पूर्ण होणार, या प्रश्नाची त्यांचीही माळ पूर्ण व्हायची.

Nitin Gadkari
Video: गडकरी जे बोलले ते करून दाखवलं..

2012 साली या चार पदरी रस्त्याचा कंत्राट एल अँड टी सारख्या नामांकित कंपनीला दिला गेला. तांत्रिक कारणे काहीही असोत काम पुढेच सरकत नव्हते. शेवटी या कंपनीने काम सोडून पळ काढला. 2014 साली केंद्रात नितीनजी मंत्री झाले पण अमरावती - अकोला महामार्गातील अडसर दूर होण्या ऐवजी वाढतच होते. हा मार्ग लवकर पूर्ण व्हावा म्हणून जुनं खरकटं सावरून पुन्हा निविदा काढली गेली. आयएल अँड एफएस नामक कंपनीने कंत्राट घेतला. त्यांनी 2018 पर्यंत थातूर मातूर काम केले आणि पुन्हा रस्ता ठप्प झाला. शेवटी लोकांनी अमरावतीहून अकोल्याला जाण्यासाठी दर्यापूर मार्ग निवडला आणि या रस्त्याला रामराम ठोकला.

सर्व वाहतूक दर्यापूर - लासुर - आपातापा मार्गे जाऊ लागली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कुठेच काही दोष आढळत नसतानाही एखादे उपकरण योग्य तो परिणाम देत नाही, त्या न आढळणाऱ्या दोषास ब्लॅक होल म्हणतात. तसा काहीसा ब्लॅक होल या कामात निर्माण झाला होता. 2021 ला या महामार्गाचे तुकडे पाडून अमरावती अकोला रस्त्याचा कंत्राट "राजपथ" ला दिला गेला. या वर्षभरात थोडेफार काम होताना दिसू लागले. 2012 ते 2022 तब्बल 10 वर्ष एखादा रस्ता होत नसेल तर लोकांचे वैतागणे स्वाभाविक होते. मंत्री निष्क्रिय असता तर लोकांनी ओरडणेही सोडून दिले असते.

पण आता खरंच या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. दहा वर्षांपासून नासुर बनलेल्या या रस्त्यावरच एक जागतिक विक्रम होतो आहे. सबुरीका फल मिठा होता है ! नितीनजींच्या प्रतिमेला साजेसा हा विक्रम आहे. दहा वर्षांची ओरड केवळ पाच दिवसात थांबवण्याची ही भन्नाट योजना आहे. रखडलेला अमरावती अकोला रस्ता मार्गी लावण्यासाठी गडकरींनी "राजपथ" कंपनीचे प्रमुख जगदीश कदम यांच्यावर जबाबदार दिली आणि कदम यांनी त्यांच्या कार्यशैलीला शोभेल असा विश्‍वविक्रमी उपक्रम हाती घेतला. फक्त पाच दिवसांत ७५ किलोमीटर रस्ता आज पूर्ण होणार आहे. जीवघेण्या खड्ड्यांच्या जागी पोटातील पाणी हलू न देणारा डांबराच्या आवरणाचा रस्ता आकाराला आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in