सामान्य कार्यकर्त्यातील कुशल संघटक निर्माण करणारा जाणता नेता : जयंत पाटील

‘मी आहे ना… नको काळजी करू....’, असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. माझ्या आयुष्यातील असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री जयंत पाटील. (Jayant Patil)
Pravin Kunte Patil and Jayant Patil
Pravin Kunte Patil and Jayant PatilSarkarnama

प्रवीण कुंटे पाटील

नागपूर : राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत गेल्या २२ वर्षांपासून माझा संबंध आहे. हा संबंध अनुभवताना राजकीय संबंधाचे रूपांतर कौटुंबिक संबंधात कधी व कसे झाले, हे मला कधीच कळले नाही. अलीकडच्या राजकारणात कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्यानं व विनम्रतेनं वागून त्यांच्यासोबत राजकीय संबंधांपलीकडे जाऊन कौटुंबिक जिव्हाळा राखणारे जे काही मोजके नेते आज महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत, त्यांपैकी जयंत पाटील हे अग्रणी आहेत. हे मला माझ्या प्रत्यक्ष अनुभवाने सांगता येते.

मला त्यांनी कायम कार्यकर्ता म्हणून नव्हे तर एक खंदा विश्‍वासू सहकारी व धाकट्या भावाप्रमाणे प्रेम दिले. ‘मी आहे ना… नको काळजी करू....’, असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. माझ्या आयुष्यातील असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री जयंत पाटील. (Jayant Patil) अशा नेत्याच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन करताना मला अत्याधिक आनंद होतो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर कायम पश्‍चिम महाराष्ट्राचा पक्ष म्हणून आरोप केला गेला आणि आजही केला जातो. परंतु जयंत पाटील यांनी मंत्री म्हणून व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आजपर्यंत जे निर्णय घेतले, त्यावरून त्यांचा विदर्भ व विदर्भाच्या विकासाबद्दलचा जिव्हाळा लक्षात येतो. त्यांनी ज्याप्रमाणे राज्याचे अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि आता जलसंपदा मंत्रिपदाची धुरा सक्षमतेने सांभाळली, त्यावरून ते राज्याचे सीएम मटेरीअल (भावी मुख्यमंत्री) आहेत, हे सांगताना मला (Pravin Kunte Patil) कुठलीही शंका नाही.

राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना पर्यावरण संतुलन ग्रामसमृद्धी योजना (इको व्हिलेज) या अभिनव उपक्रमाची सुरुवात त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील येकलपु या अतिशय दुर्गम नक्षलग्रस्त गावातून केली व त्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. पक्ष सत्तेत नसताना यवतमाळ ते नागपूर पदयात्रेचे नेतृत्व करून तळागाळात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून तर त्यांनी विदर्भाच्या सिंचनाच्या दृष्टीने सन २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बरी नसतानासुद्धा गोसीखुर्द या विदर्भाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सिंचन प्रकल्पाला एक हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून विदर्भाला न्याय मिळवून दिला. गोसीखुर्द प्रकल्पामध्ये पुनर्वसनाची फार मोठी अडचण होती. त्यामुळे प्रकल्पामध्ये १०० टक्के पाणी साठा करता येत नव्हता. त्यावर जलसंपदा मंत्री म्हणून श्री जयंत पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन पुनर्वसनाचा जटिल प्रश्‍न निकाली काढला. त्यामुळे २०२१-२२ मध्ये ७ टीएमसी येवढा अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध झाला.

विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा (गोसीखुर्द) नळगंगा (पूर्णा-तापी) नदीजोड प्रकल्पाला गती दिली. या योजनेद्वारे पूर्व विदर्भातील वैनगंगा नदीचे अतिरिक्त पाणी सिंचन अनुषेशग्रस्त पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांना देण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाची नागपूर प्रदेशातील सिंचन क्षमता १,४७,९७२ हेक्टर असून अमरावती प्रदेशातील सिंचन क्षमता २,२२,३०५ हेक्टर आहे. या प्रकल्पाची किंमत ७२,५०१ कोटी रुपये आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पश्‍चिम विदर्भ सुजलाम सुफलाम होईल, हे निश्चित.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटलांनी घेतली, तेव्हा पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. सत्तेच्या हव्यासापोटी मोठमोठे नेते पक्ष सोडत होते. कार्यकर्ते हतबल झालेले दिसत होते. निवडणुकीनंतर आमची व्यवस्था कशी असेल, यावर नेते व कार्यकर्ते साशंक होते. त्यावेळी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना जोडून त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. एनसीपी कनेक्ट ॲप सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण राज्यात बूथ बांधणीचे काम मजबूत करून, संघटना मजबूत करून श्री शरद पवार साहेबांनी व्यक्त केलेला विश्‍वास सार्थ ठरवला आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला अव्वल स्थानी आणून ठेवले. पवार साहेबांच्या अभूतपूर्व चाणक्य नीतीला जयंत पाटलांची साथ मिळाली व महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद तुटू नये, त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घ्यावे, याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’, ही अभिनव संकल्पना राबविली. या यात्रेची सुरुवात करण्याकरितासुद्धा पुन्हा त्यांनी विदर्भाची निवड केली. विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या गावाची निवड करून अहेरी - सिंदखेड राजा या विदर्भाच्या अंतिम टोकापर्यंत ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मला त्यांनी विश्‍वासाने यात्रेचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली. त्या यात्रेचे अनुभव आठवले की, अजूनही अंगावर शहारे येतात. त्या यात्रेदरम्यान विदर्भामध्ये कोवीडची दुसरी लाट जोरात सुरू होती. (यात्रेनंतर माझ्यासह अनेक नेत्यांना कोविडचा सामना करावा लागला) तशाही परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाचा झपाटा तरुणाला लाजवेल, असाच होता.

रोज पहाटे ५ वाजता उठून सकाळी ७ वाजता त्यांच्या कामाची सुरुवात व्हायची. दिवसभर सुरू असलेल्या संवाद सभा मध्यरात्री २ वाजेपर्यंत चालायच्या. (मध्यरात्रीपर्यंत शेकडो नागरिक व कार्यकर्ते उत्सुकतेने वाट बघत असायचे) रात्रीचे जेवण पहाटे ३ वाजताच्या अगोदर झाल्याचे मला आठवत नाही. पहाटेचे जेवण झाल्यावरसुद्धा प्रसन्न चेहऱ्याने, हसतमुख, कुठलाही थकवा न दर्शवता पुन्हा माझ्यासारख्या अनेक सहकाऱ्यांशी दिलखुलास चर्चा करून दिवसभराच्या कामाचा फिडबॅक घेणे व पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देऊन सकाळची तयारी करणे, असा त्या यात्रेदरम्यान नित्यक्रम असायचा. पक्षाकरिता प्रचंड कष्ट घेणारा व कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारा सेनापती जयंत पाटलांच्या रूपाने या यात्रेत आम्ही बघितला.

Pravin Kunte Patil and Jayant Patil
अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील गटबाजीवर तोडगा काढणार : जयंत पाटील

श्री जयंत पाटील यांचे वडील स्व. राजाराम बापु पाटील यांच्यावरसुद्धा ज्यावेळी तत्कालीन कॉंग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्य़ा अडचणीत होता. त्यावेळी त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती व त्यांनीसुद्धा कॉंग्रेस पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले. त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांनीसुद्धा त्यांच्याच वारसा पुढे चालविला आणि आपल्या वडिलांचे नाव मोठे केले. शरद पवार यांनी त्यांच्यावर जो विश्‍वास व्यक्त केला, तो त्यांनी सार्थ ठरविला. आज महाराष्ट्रात जे काही मोजके सुसंस्कृत व कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून मदत करणारे संवेदनशील नेते आहेत, त्यात श्री जयंत पाटील अग्रस्थानी आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. अशा नेत्याचा विश्‍वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी सातत्याने मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे.

आज त्यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना श्री जयंत पाटील साहेब म्हणजे जनसामान्यांच्या सामाजिक जाणिवेचा महामेरू, असा दृढ आत्मविश्‍वास व्यक्त करतो. त्यांच्या आयुष्याला असीम, निरोगी आणि उच्चपदांचे वैभव उत्तरोत्तर लाभो, त्यांचे कुटुंब व संपूर्ण चाहते यांना त्यांचा लोभ कायम असो, ही ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा. याप्रसंगी शब्दसुमनांची उधळण करण्याचा मोह अनावर झाला आहे....

''ज''लसमान समरस तू

''य''ज्ञा समान ज्वलंत तू

''त''ळमळ सारी हृदयी

''रा''ष्ट्रवादीचा जयवंत तू

''व''रिष्ठांची मर्जी अन् अर्जी

''पा''लनकर्ता निष्ठावंत तू

''टी''कास्त्रे भेदून सारे

''ल''क्ष वेधतो तू…

हीरक वर्षात कोहिनूर हिऱ्याला मोलताना जयंत पाटील साहेब यांना पुन्हा पुन्हा अभीष्टचिंतन !

- प्रवीण कुंटे पाटील

प्रवक्ता व सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com