पटेल-पटोले वादाचा भाजपला फायदा; काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर

Nana Patole | Prafull Patel : काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी धर्म सपशेल गुंडाळला
Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel
Nana Patole, Nawab Malik and Prafull Patel Sarkarnama

भंडारा/गोंदिया : राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम काल (मंगळवार, १० मे) रोजी पार पडला. भंडाऱ्यामध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचा (Congress) तर गोंदियामध्ये भाजपचा (BJP) विजय झाला आहेत. मात्र यात भंडाऱ्यामध्ये काँग्रेसला मदत केली ती भाजपने आणि गोंदियामध्ये भाजपला मदत केली राष्ट्रवादी काँग्रेसने. (NCP) त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसनेच आघाडी धर्म गुंडाळून ठेवतं विरोधी पक्ष भाजपला साथ दिल्याचे किंवा सोबत घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

(Bhandara And Gondia Jilha parishad)

अर्थात हा आघाडी धर्म गुंडाळून ठेवण्यासाठी स्थानिक वादाची किनार आहे. भंडारा-गोंदियामध्ये हा वाद आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ्य नेते प्रफुल्ल पटेल यांच्यातील. तर भंडाऱ्यात भाजपमध्ये वाद आहे तो माजी आमदार चरण वाघमारे आणि आमदार परिणय फुके यांच्यात. भंडारा-गोंदियातील पटेल-पटोले यांच्यातील राजकीय वाद नवा नाही. एकमेकांवर मात करण्याची, एकमेकांना राजकीय आस्मान दाखविण्याची, एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत. खूप कमी प्रसंगात दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.

भंडाऱ्यामध्ये काय झाले?

यात राष्ट्रवादी काँग्रेसने साथ सोडल्याने काँग्रेसने भाजपमधील फुटीर गटाला सोबत घेत आपली सत्ता स्थापन केली. यानुसार अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या फुटीर गटाचे संदीप टाले विजयी झाले. भंडाऱ्यातील पक्षीय बलाबल काँग्रेसच्या बाजूने होते. ५२ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे २१ सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. याशिवाय भाजपचे एकूण १२ सदस्य आहेत. याशिवाय बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष ३ असे सदस्य आहेत. त्यामुळे भंडाऱ्यात काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आली असती तर आघाडी धर्म पाळला गेला असता. मात्र नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या मागे न जाता माजी आमदार चरण वाघमारेंच्या ५ आणि १ अपक्ष अशा ६ सदस्यांचा एक गटाला सोबत घेतले.

मोहाडी नगर परिषद व तुमसर पंचायत समितीमध्ये फुके यांनी दगाबाजी करण्याचे प्रयत्न केले, अशी तक्रार वाघमारे यांनी भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये जावून केली होती. "आता देखील फुके राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे नियोजन करत होते, मात्र सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास आपला विरोध होता. त्यामुळे शेवटी आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली असे वाघमारे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले. नाना पटोले यांनी याच गटबाजीचा फायदा उचलत वाघमारे यांना सोबत घेतले आणि काँग्रेसचा अध्यक्ष विजयी केला. यातून त्यांनी एक प्रकारे भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलला असल्याचे बोलले जात आहे.

गोंदियामध्ये काय झाले?

गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली अन् काँग्रेसला जोरदार धक्का दिला. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. गोंदियातील पक्षीय बलाबल बघितल्यास ५३ सदस्यीय सभागृहात बहुमताचा आकडा भाजपच्या बाजूने होता. भाजपचे सर्वाधिक २६ सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, चाबीचे ४ आणि २ अपक्ष असे सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी १ सदस्य कमी होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दोन अपक्षांची भेट घेत त्यांना भाजपच्या बाजून घेतले होते. मात्र त्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com