
अमरावती : गत रविवारी हिंगोलीचे (Hingoli) आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी येथे आले होते. देवस्थान मठामध्ये पत्नी व बहिणीसह दर्शन घेऊन निघाल्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवला गेला. यावेळी हल्ल्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणात १० शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
१० शिवसैनिकांना काल न्यायालयासमोर (Court) हजर केले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. आमदाराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर (Shivsena) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’, अशा घोषणाही दिल्या. घटनेची वरिष्ठ स्तरावरून दखल घेतल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संशयित महेंद्र दीप्टे, शहरप्रमुख राजेंद्र आकोटकर, युवासेना तालुकाप्रमुख अभिजित भावे, गजानन चौधरी, गजानन हाडोळे, रवींद्र नाथे, गजानन विजेकर, शरद फिसके, मयूर राय, गजानन पाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने दहाही जणांना पोलिस कोठडी सुनावली. घटनेनंतर जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक अंजनगाव पोलिस स्टेशनसमोर आले होते. यामध्ये जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुडधे, गजानन वाकोडे, प्रमोद धनोकार, मनोज कडू, अंकुश कावडकर, तालुकाप्रमुख कपील देशमुख यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिसांच्या उपस्थितीत घडली घटना
आमदार संतोष बांगर यांच्या दौऱ्यात बंदोबस्तासाठी एक उपनिरीक्षक व काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. बांगर यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर स्थानिक पोलिसांचे वाहन होते. उपनिरीक्षकाला शिवसैनिक येताना दिसल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती दखल घेतली नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
अशी घडली होती घटना..
आमदार संतोष बांगर रविवारी दुपारी ३ वाजता अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आले होते. त्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’चे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची तक्रार देण्यासाठी शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना इसोकर हे पोलिस ठाण्यात गेले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.