नाशिकच्या साहित्य संमेलनात ‘मन की बात’वर ओढले ‘आसूड’

अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील चर्चेत केंद्र सरकारवर टिका
Chhagan Bhujbal, Javed Akhtar & Balasaheb Thorat
Chhagan Bhujbal, Javed Akhtar & Balasaheb ThoratSarkarnama

नाशिक : साहित्य संमेलनाचे सुप वाजले. या संमेलनात केंद्र सरकारच्या विरोधात विचारवंतांचा हुंकार घुमला. चर्चा करण्यापेक्षा ‘मन की बात’ अशा शब्दांमध्ये संविधान समर्थनार्थ झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनासोबतच कुसुमाग्रजनगरीमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘आसूड’ ओढण्यात आला.

केंद्र सरकारच्या विरोधात साहित्यिक का बोलत नाहीत? असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जातो. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून हा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वातंत्र्याला ‘भीक’ संबोधले आणि अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मात्र वैचारिक गोंधळाची परिस्थिती देशभर तयार झाली. त्यावर टिकात्मक बरेच बोलले गेले. समाजमाध्यमांतून ‘ट्रोल' केले गेले. तरीही लेखक-सेलिब्रिटी-कलावंत राजसत्तेला घाबरुन मौन पाळताहेत काय? असाही प्रश्‍न विचारला जाऊ लागला होता.

Chhagan Bhujbal, Javed Akhtar & Balasaheb Thorat
नवाब मलिक म्हणाले, ममता बॅनर्जी नव्हे, सध्याच्या राजकीय स्थितीवर होणार चर्चा!

याच पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये दोन साहित्य संमेलने झाली आणि त्यात केंद्र सरकारच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडली गेली. अ. भा. साहित्य संमेलनात जयदेव डोळे यांनी लोकांना मोतीबिंदू होतो, पण मला मोदीबिंदू झालाय काय? असा उपहासात्मक टोला लगावत, माध्यमांचे मनोरंजनीकरण नव्हे, तर नमोरंजनीकरण झाले आहे असे वाटू लागल्याचा षटकार ठोकला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्वातंत्र्य चळवळीविषयी बोलले गेले, उद्या राज्यघटनेविषयी बोलले जाईल, तरीही गप्प बसायचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याचवेळी राज्यघटनेनुसार देश चालावा हे राजकारण्यांचे काम आहेच, पण राजकारणी कमी पडत असतील, तर लेखक-कवी-गायकांनी उभे राहायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लेखन स्वातंत्र्याविषयी बोलताना सत्ता पाहून विरघळू लागल्यास लिहणार कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला. कला संस्थांची स्वायत्तता महत्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आता देशद्रोही ठरवले जाते

गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात लेखक सर्वसामान्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आता देशद्रोही ठरवले जाते, अशा शब्दांमध्ये नाराजीचा सूर आळवला होता. साहित्यिकांनी राजकारणाला बळी पडू नये, मुक्तपणे लिहावे. कुठल्याही कवी-लेखकावर अन्याय होत असल्यास सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याच मराठी साहित्य संमेलनात दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करण्यात आली. त्याचबरोबर कृषीविषयक कायदे करताना आणि नंतर मागे घेताना चर्चा झाली नसली, तरीही ‘मन की बात’ केली गेल्याची बाब अधोरेखित केली गेली.

Chhagan Bhujbal, Javed Akhtar & Balasaheb Thorat
छगन भुजबळांची प्रतिज्ञा; एक थेंब पाणीही गुजरातला देऊ देणार नाही!

जनतेच्या मनातील असावा देश

विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. गौहर रझा यांनी देश कसा असावा, याचा विचार शेतकरी आंदोलनाने दिल्याचे सांगितले. जनतेच्या मनातील देश असावा, असे सांगत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला विज्ञानवादी बनविण्यासाठी गोमूत्रावर संशोधन करण्याची गोष्ट करतात ही शरमेची बाब असल्याचे नमूद केले. त्याचवेळी पंतप्रधान देशातील आयआयटीचे महत्व कमी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते सुखदेवसिंग सिरसा यांनी सध्याचे सरकार कॉर्पोरेटच्या मर्जीवर चालणारे असल्याचा आरोप केला. त्यांनी दिल्लीच्या आंदोलनाचा उल्लेख करत लोकशाही पद्धतीने हुकूमशाही प्रवृत्तीला रोखता येते, असा नारा दिला. विद्रोही साहित्य संमेलनातील कविसंमेलन, रांगोळी अशा उपक्रमांमधून केंद्र सरकारच्या विरोधात रोष आळवला गेला.

आदर्श अवमान? अन्‌ कुणी केला?

मराठी साहित्य संमेलन आणि वाद असा काहीसा नियम झालाय, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात व्यक्त केली. अर्थात्‌ त्याला पार्श्‍वभूमी होती ती म्हणजे, आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदर्शांचा अवमान होत असेल, तर कशाला जावे? असा प्रश्‍न नाशिकमध्ये उपस्थित केल्याची. श्री. पवार यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे योगदान आणि त्यागाची चर्चा होऊ शकत नाही, सावरकरांच्या नावाला मराठी आणि महाराष्ट्र माणूस विरोध करु शकत नाही, असे निक्षून सांगितले. पालकमंत्री छगन भुजबळ हे संधी सोडतील तरी कसे? त्यांनी संमेलनातील सावरकरांच्या गौरवाच्या प्रत्येक मुद्यांचा दाखला देत आदर्शांचा अपमान कुणी केला? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याचवेळी नाशिकची द्राक्षे आंबट नाहीत हो! अन्‌ आमच्याकडे शरद सीडलेस अतिशय गोड द्राक्षे आहेत, अशी टिप्पणी करताच, उपस्थितांमध्ये हंशा पिकला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com