CM Uddhav Thakre
CM Uddhav ThakreSarkarnama

मुख्यमंत्री महोदय, नाशिकच्या फाळके स्मारकाकडे लक्ष द्यावे..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिकच्या विविध कार्यक्रमांत ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : नाशिकच्या (Nashik) अनमोल ठेव्यांपैकी (Heritage) एक सर्वोत्तम ठेवा म्हणजे दादासाहेब फाळके आणि त्यांच्या चिरंतन स्मृती. दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) स्मारकाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अलीकडेच भेट दिली. फाळके स्मारकात फिल्म सिटीची निर्मिती करता येणे शक्य आहे. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी या विषयांत लक्ष घालावे.

CM Uddhav Thakre
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यासोबत नाशिक आणि नाशिकमधील इगतपुरी, घोटी आणि त्र्यंबकेश्वर परिसराला शूटिंग झोन जाहीर केल्यास देशातील चित्रपटसृष्टी नाशिकमध्ये अवतरू शकते. सध्या मुंबईतील फिल्म सिटीवर आणि एकूणच चित्रपट व्यवसायाशी संबंधित घटकांवर प्रचंड ताण आलेला आहे. त्यात नाशिकमध्ये शक्यता निर्माण झाल्या तर दादासाहेब फाळके यांची भूमी चित्रपट क्षेत्रात मोठ्या उंचीवर पोचू शकते. समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक उपयोग या क्षेत्रासाठी होऊ शकतो.

चित्रपटांच्या, मालिकांच्या शूटिंगसाठी विविध खात्यांच्या ५-६ परवानग्या लागतात. यासाठी एक खिडकी योजना जर नाशिकमध्ये उभारता आली, तर ‘सोने पे सुहागा’. सहकार्याची भावना असलेली एक खिडकी योजना असावी, एका खिडकीत ‘अनेक खिडक्या’ नसाव्यात. कोरोनाकाळात सगळं ठप्प असताना दमणने परवानगी दिल्याने तब्बल ३६ सीरियल्सचे शूटिंग तिथे होऊ शकल्या, हे ध्यानात घ्यायला हवे. आपल्या देशात शूटिंगसाठी यावे म्हणून इंग्लंडमध्ये अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे अगदी मराठी सिनेमांचे शूटिंग इंग्लंडमध्ये होऊ लागले आहे. जर आपली मंडळी इंग्लंडमध्ये जावू शकतात, तर नाशिकमध्ये नक्कीच येऊ शकतील. रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर २९ एकर जागेमध्ये दादासाहेब फाळके फिल्म सिटी उभारल्यास इकडे ओढा निश्चितपणे वाढेल.

CM Uddhav Thakre
मध्यरात्री दोनला शिवसैनिकांनी नवनीत राणाचा शोध घेतला!

चित्रपटांशी संबंधित सगळ्या शक्यता नाशिकमध्ये या निमित्ताने आकाराला येऊ शकतात, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. सध्या चित्रपटसृष्टीत नैसर्गिक लोकेशन्सला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर परिसराला शूटिंग झोन जाहीर केल्यास त्याचा मोठा फायदा चित्रपटांना मिळू शकतो. २४ तास शूटिंगची परवानगी या लोकेशन्सला मिळायला हवी.

फिल्म सिटीमध्ये राहण्याची उत्तम सोय निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे कमी पैशांत शूटिंग स्टाफला राहता येईल. याशिवाय शासकीय आणि खासगी रिसॉर्टमध्ये सवलतीच्या दरात राहण्याची सोय इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर परिसरात चित्रपट कलावंत यांच्यासह सगळ्या टीमची होऊ लागली तर मुंबईवरचा सध्याचा भार नक्कीच हलका होईल. अगदी परराज्यातूनही शूटिंगसाठी नाशिक एक हॉट डेस्टिनेशन ठरेल. फाळके फिल्म सिटीचे निर्माण नियोजनबद्धरीत्या करायला हवे. संचालकपद निर्माण करून सुनियोजित पद्धतीने उभारणी व्हायला हवी. चित्रपटाशी संबंधित घटकांसाठी कोर्सेस तयार केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी नाशिकमध्ये निर्माण होऊ शकतात. चित्रपटांना स्किल्ड लेबरची गरज असते. जसे लाइटमन, मेकअप आर्टिस्ट, एडिटिंग, ग्राफिक्स, ज्युनिअर आर्टिस्ट, स्पॉटदादा, प्रॉडक्शन विभाग, वेषभूषाकार वगैरे. या विषयांचे लहान कोर्सेस फिल्म सिटीत सुरू करता येतील. यासह

आयटीआयमध्येही हे कोर्सेस सुरू करून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिकमधून अन्य राज्यातही पाठवता येणे शक्य आहे. या सगळ्यांना कायमस्वरूपी काम चित्रपटसृष्टीत आहे. विशेष म्हणजे चित्रपटांसाठी लागणाऱ्या ग्राउंड स्टाफचं प्रशिक्षण अन्यत्र कुठेही दिलं जात नाही. यासाठी विशेष पारंपरिक शिक्षणाची अट नाही. त्यामुळे एक मोठं क्षेत्र या माध्यमातून नाशिकसाठी, विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगरसाठी खुलं होऊ शकतं.

दादासाहेब आणि नाशिक

धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे जनक. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० मध्ये त्र्यंबकेश्वरचा. तर वयाच्या ७३ व्या वर्षी १६ फेब्रुवारी १९४४ मध्ये अखेरचा श्वास नाशिकच्या भूमीत घेतला. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र त्यांनी १९१३ मध्ये साकारला. चित्रपटसृष्टीतील १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट आणि २६ शॉर्टफिल्म साकारल्या. १९६९ मध्ये दादासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देणे केंद्र सरकारने सुरू केले. अवघ्या काही ओळींत दादासाहेब फाळके यांच्या कारकीर्दीचा आढावा यासाठी, की त्यांचे थोरपण पुन्हा एकदा मांडले जावे. नाशिकशी असलेलं त्यांचं नातं अधोरेखित व्हावं. हे नातं अधिक घट्ट करण्यासाठी आणि राज्यातील चित्रपट उद्योगाला उभारी येण्यासाठी राज्य शासनाने आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही आशा नक्कीच करता येऊ शकते...

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com