
येवला : चाळीस आमदार व बारा खासदारांनी (Shivsena rebels) केले तो उठाव नाही, तर ती गद्दारी आहे. त्यांच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का लागलायं. त्यामुळे आहे तिथं नीट रहा, लाज असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. जनता ठरवेल काय करायचे ते, अन्यथा परत या. तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे खुले आव्हान युवासेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी येथे शुक्रवारी बंडखोरांना दिले. (Rebel MLA Should resigne and face new elections)
सत्तेत आलेले हे सरकार घटनाबाह्य व बेकायदेशीर असून, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच हे लिहून घ्या, असेही श्री. ठाकरे म्हणाले.
शिवसंवाद यात्रेनिमित्त बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात मेळावे घेण्यासाठी जात असलेले आदित्य ठाकरे यांनी येथे शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधला. प्रारंभी येथील विंचूर चौफुलीवर आमदार नरेंद्र दराडे, माजी सभापती संभाजी पवार, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
शनिपटांगणातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी जनतेशी संवाद साधला. श्री. ठाकरे म्हणाले, की आमदार- खासदारांसह विविध पदाधिकाऱ्यांना फसवून नेले आहे. तुम्ही अजूनही परत या. मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत. माणसाचे मन मोठे असावे लागते आणि आमचे ते आहे. चुका होतात, अशा चुकांना आम्ही माफ करू, पण गद्दारांना मात्र माफी नाही. शिवसेनेने त्यांना प्रेम, आमदारकी, मंत्रिपदे दिली. किंबहुना मुख्यमंत्र्यांनी गेल्या ३५ वर्षांत सोडले नाही, ती पदेही त्यांना दिली. तरी ते गद्दारी करून गेले, उठाव करायचा होता, तर समोर येऊन बोलले असते. मात्र, त्यांनी विश्वासात गेला आणि सुरत, गुवाहाटीला जाऊन लपले. येथे लोक पुरात दुःखी असताना, हे हॉटेलात मजा करीत होते. गोव्यात जाऊन टेबलवर नाचत होते. उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली असताना, पक्ष फोडण्याची बीजे रोवली. मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना ओळख व पदे दिली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राज्याचे प्रेम आमच्यासोबत आहे आणि आम्ही पुन्हा सेनेची बांधणी करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, संपर्कप्रमुख अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कुणाल दराडे, संभाजी पवार, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, रूपेश कदम, युवासेना विस्तारक नीलेश गवळी, जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, झुंजार देशमुख, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, निवृत्ती जगताप, प्रकाश पाटील, शिवा सुरसे, नाना जेऊघाले, प्रवीण नाईक, प्रवीण गायकवाड, भय्या भंडारी, छगन आहेर, पुंडलिक पाचपुते, बाळासाहेब पिंपरकर, धीरज परदेशी आदींसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागताचे फलक, भगवेमय वातवरण!
शनिपटांगणात भाषणाची सुरवात करतानाच मी फक्त बंडखोरांच्या मतदारसंघात जात आहे. मात्र, येथे कुणाल दराडे यांच्या आग्रहाने आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनमाड-नगर महामार्गावर सर्वत्र कुणाल दराडे व संभाजी पवार यांनी स्वागताचे फलक व भगवे झेंडे लावले होते. विंचूर चौफुलीवरही सर्वत्र भगवे झेंडे दिसत होते. सभेप्रसंगी शनिपटांगण पूर्ण गर्दीने भरले होते.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.