Shivsena News: बाळासाहेबांच्या प्रतिमा पूजनावरून ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; राजकीय वातावरण तापलं

Anant Joshi and Jayshree Mahajan : महापालिकेतील शासकीय प्रतिमा पूजनाला निमंत्रीत न केल्याचा आरोप
Shivsena
Shivsena Sarkarnama

जळगाव : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त जळगाव महापालिकेत प्रतिमा पूजनावरून शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात चांगलेच राजकारण तापले. महापालिकेतील शासकीय प्रतिमा पूजनाला निमंत्रीत न केल्याबद्दल शिंदे गटाने सत्ताधारी ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महापालिकेत महापौरातर्फे शासकीय कार्यक्रम झाला तर शिवसेना शिंदे गटातर्फे स्वतंत्र कार्यक्रम करण्यात आला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत शासकीय प्रतिमा पूजन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापालिकेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते बंटी उर्फ अनंत जोशी, आस्थापना उपायुक्त चंद्रकांत वानखेडे, उपायुक्त गणेश चाटे, कार्यालय अधिक्षक अविनाश बाविस्कर, आदी उपस्थित होते.

कार्यक्रम आटोपल्यावर महापौर दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या. त्यांनंतर शिंदे गट शिवसेनेचे नेते व पालकंमत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील, मनपाचे नगरसेवक दिलीप पोकळे हे महापालिकेत आले.

बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा तसेच पुष्पहार तसेच फुले सोबतच घेवून ते आले होते. मात्र, या ठिकाणी अगोदरच प्रतिमा पूजन झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले वाहीली.

Shivsena
Bhagatsingh Koshyari : राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारीत; पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या सरीता कोल्हे, नगरसेक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण, श्‍याम कोगटा आदी उपस्थित होते. याबाबत बोलतांना शिंदे गटाचे नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे म्हणाले, ''बाळासाहेबांच्या प्रतिमेचे शासकिय पूजन होते.

त्यामुळे नगरसेवक म्हणून महापौर किंवा प्रशासनाने आम्हाला निमंत्रीत करायला हवे होते. परंतु त्यांनी आम्हाला कोणतेही आमंत्रण दिले नाही. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी महापालिकेत त्यांची प्रतिमा व पुष्पहार घेवून आलो. आम्हाला अगोदरच माहिती दिली असती, तर आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असतो.

Shivsena
Thackeray-Ambedkar Alliance : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे-आंबेडकर युती कितपत फलदायी ठरणार?

आम्हाला निमंत्रण नसल्यामुळे आम्ही वैयक्तीक फोटो घेवून आलो होतो. परंतु अगोदरच त्या ठिकाणी फोटो असल्याचे समजल्यावरून आम्ही बाळासाहेबांचा दुसरा फोटो न लावता अगोदर असलेल्या फोटोलाच माल्यार्पण केले. परंतु आम्हाला हेतुपुरस्सर महापौरांनी डावलल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्तामार्फत शासकीय कार्यक्रमाचा आदेश काढण्यात आला होता. महापौर, उपमहापौर व आयुक्त यांना समारंभास उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यात कोणत्याही नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे पत्र नसल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com