
Jalgaon Latest Marathi News
जळगाव : शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांचा प्रखर विचार प्रमाण मानून १९८४ पासून मी जनसेवेत कार्यरत झालो. या सेवेतूनच आजवर मजल मारली आहे. आजवरच्या वाटचालीत अनेक चढ-उतार आले असले तरी देखील नागरिकांच्या प्रेमाने आगेकूच करत राहिलो. आज पाळधी येथे दिवसभर भेटून शुभेच्छा देणारे आणि आता सभेला जमलेला अफाट जनसागर पाहता नागरिक सोबत असल्याचे सिद्ध झाले. याच जनतेसमोर आपण नतमस्तक होत असल्याचे भावनिक उदगार पालकमंत्री (Jalgaon) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी काढले. (Shivsena will came in power in ZP On it`s own-sd67)
पालकमंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री पाटील यांनी भाषणात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. आगामी निवडणुकीत झेडपीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवाच फडकणार असल्याचा संकल्प देखील मंत्री पाटील यांनी केला.
जनतेच्या सेवेत राहण्याची इच्छा...
पालकमंत्री पाटील म्हणाले, की जनतेचे प्रेम हेच आपल्यासाठी ऊर्जास्रोत आहे. आपण कायम लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले आहे. संपर्क हीच श्रीमंती आणि सेवा हेच कर्तव्य असे मानल्याने आपण आजवरची वाटचाल केलेली आहे. मी कितीही मोठा झालो तरी माझे गाव आणि मतदारसंघासाठी गुलाबच आहे. याचमुळे देवाला माझी प्रार्थना आहे, की मला कधी गर्वाची बाधा येऊ देऊ नको. माझे पाय जमिनीवरच रहावेत आणि जनतेच्या सेवेत अविरत कार्यरत रहावे हीच माझी इच्छा आहे.
पालकमंत्री पाटील यांच्या वाढदिवसाला पाळधी येथे भव्य सभा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, ग्रामीणचे संपर्कप्रमुख अरविंद नाईक, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते.
सभा सुरू होण्याआधी पाळधी शहरातून कार्यकर्त्यांनी भव्य दुचाकी फेरी काढली. संपूर्ण गावाला फेरी मारून ही रॅली सभास्थळी आली. सायंकाळी प्रचंड जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. जिल्हा परिषदचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.