
नाशिक : (Nashik) `शिवसेना (Shivsena) महावटवृक्ष आहे. अनेक वर्षाच्या परिश्रमातून तो उभा राहिला आहे. मात्र आता या झाडावर बांडगुळं निर्माण झाली आहे. त्यांचा शिवसेनेला धोका आहे` हे विधान उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) गटाच्या नव्हे तर चक्क शिवसेना सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी शिंदे गटाच्या नेत्याने ही काळजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Shinde Group criticise Sanjay Raut & appriciate Shivsena organisation)
खासदार संजय राऊत शनिवारी (ता. ७) नाशिकमध्ये आले होते. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटात प्रवेशकर्ते झालेल्या आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना पालापाचोळा व केरकचरा असे संबोधले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेत खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला.
खासदार राऊत यांची ही टिका शिंदे गटात गेलेल्या नेत्यांच्या चागंलीच जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर टिका केली. हे करताना त्यांनी देखील शिवसेना हा वटवृक्ष आहे, असे म्हटले.
श्री. बोरस्ते म्हणाले, शिवसेना हा महावटवृक्ष आहे. मात्र या वटवृक्षावर खासदार संजय राऊत नावाचे बांडगुळ बसले असून, ते बांडगुळ शिवसेनेचा वटवृक्ष संपवायला निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या सच्चा कार्यकर्त्याला केरकचरा, पालापाचोळा म्हणणारे संजय राऊत यांचाच ‘डीएनए’ तपासण्याची गरज आहे. संजय राऊत यापुढे आमच्यासाठी अदखलपात्र आहे.
श्री. बोरस्ते म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्राचे संपर्कनेते म्हणून संजय राऊत यांनी काम पाहिले. या काळामध्ये शहराच्या विकासासाठी कुठला प्रकल्प आणला? व किती जणांना रोजगार दिले? याचा हिशेब त्यांनी द्यावा. ते केवळ पर्यटनासाठीच नाशिकमध्ये आले व येत आहेत. नाशिकला आल्यावर ते आपल्या बगलबच्चांना भेटी देतात, या बगलबच्चांना काही त्रास झाला तर ते त्यांना त्रास देतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आता आमचा घरोबा झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी, शहराच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो आहोत. आमचे काय होईल, ते जनताजनार्दन ठरवेल. मात्र साधे सरपंच म्हणूनही निवडून न येणाऱ्या राऊत यांनी आम्हाला पाडण्याची भाषा करू नये. शिवसेनेच्या वटवृक्षावर बसलेले बांडगुळ आता स्वतःलाच वटवृक्ष समजत असून, ते स्वतःला प्रतिउद्धव ठाकरे म्हणून बोलू लागले आहेत. राऊत यांच्याकडून ठाकरे कुटुंबीयांची चेष्टा सुरू असून, शिवसेनेचा वटवृक्ष त्यांना कोसळवायचा आहे. खासदार हेमंत गोडसे म्हणाले, की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे कटकारस्थान राऊत यांनीच रचले. अनैसर्गिक युतीमुळे शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाली. राऊत यांनी सातत्याने उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून गैरसमज पसरविले. त्यामुळे पक्ष संपत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.