Shrigonda News: मी मैत्री जपली; पण राहुल जगतापांनी गद्दारी केली, करारा जवाब मिलेगा : साजन पाचपुतेंचा जगतापांना इशारा

Sajan Pachpute vs Rahul Jagtap : काय आहे साजन पाचपुते यांची फेसबुक पोस्ट?
Rahul Jagtap and Sajan Pachpute
Rahul Jagtap and Sajan PachputeSarkarnama

Shrigonda Politics : श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने 18 पैकी 11 जागा जिंकल्या. तर भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांच्या गटाने सात जागा जिंकल्या. त्यानंतर सभापती पदासाठी दोन्ही गटांत मोठी रस्सीखेच झाली. अखेर सभापती- उपसभापतीपद राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या गळ्यात पडले.

या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी राहुल जगताप यांच्या गटाकडून संचालकपदाची निवडणूक लढवली. पण सभापती- उपसभापतीपदाच्या निवडीनंतर आता साजन पाचपुतेंनी जगतापांना करारा जवाब मिलेगा, असा इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याबरोबरच "मी मैत्री जपली, पण राहुल जगतापांनी गद्दारी केली", अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Rahul Jagtap and Sajan Pachpute
Shrigonda Politics: श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला बळ; तर बबनराव पाचपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का!

काय आहे साजन पाचपुते यांची फेसबुक पोस्ट?

"मी मैत्री जपली, पण राहुल जगतापांनी गद्दारी केली, करारा जवाब मिलेगा...", असं साजन पाचपुते यांनी म्हणत जगतापांना थेट इशारा दिला आहे.

साजन पाचपुतेंनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, "श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या घडामोडीनंतर माझ्याबद्दल वेगळी चर्चा केली जात आहे. मी अजिबात मोठा नाही, पण स्वर्गीय सदाअण्णांचा मुलगा असल्याने मी चर्चेत आहे. मी खुलासा करावा की नाही या द्विधा मनस्थितीत होतो. पण राहुल जगताप व त्यांची टीम ज्या पद्धतीने माझ्याशी वागली आणि मी जवळून त्यांची गद्दारी पाहिली, हे सगळे तुमच्यासमोर यावे म्हणून मी माझ्या भावना या पोस्टमधून व्यक्त करीत आहे", असंही ते म्हणाले.

"बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राहुल जगताप यांनी माझे मित्र बाळासाहेब नाहाटा यांना माझ्याकडे पाठवले. ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याने तुमच्याशिवाय पर्यायच नाही, असा आग्रह करुन मी उमेदवारी करावी, असा आग्रह राहुल जगताप यांनी धरला आणि त्यातूनच मी ग्रामपंचायत मतदारसंघात उमेदवारी करावी, अशी गळ घातली.

मितेश नाहाटा यांनीही उमेदवारी करावी अशी चर्चा सुरु झाली आणि माझी इच्छा नसताना मी बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो. त्यातच माझे मित्र सचिन चौधरी यांच्या पत्नीला राजापुर गावचे सरपंच करु, असा शब्द राहुल जगताप यांनी देत लगेच त्यांच्या कार्यकर्त्याचा राजीनामा घेतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात हा 'शब्द' पाळला नाही. शब्द द्यायचा तर तो पाळायचा असतो, हे राहुल जगताप यांना माहिती दिसत नाही. शब्द कसा पाळायचा हे आमच्याकडून शिका यापुढे आम्ही दाखवून देवू", असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Rahul Jagtap and Sajan Pachpute
Devendra Fadanvis News : एका दगडात दोन पक्षी मारू पाहताहेत देवेंद्र फडणवीस ?

"मितेश माझा मित्र आहे. त्याच्यासाठी सगळे पणाला लावले. पण राहुल जगताप व त्यांच्या टीमने माझ्यासह मितेशला पाडण्यासाठी सर्व प्रकारची ताकत खर्च केली. मला निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायत मतदारसंघात त्यांची ४१६ मतांची बेरीज असणारी यादी दाखवली होती. प्रत्यक्षात मला ३९८ व मितेशला ३३४ मतेच मिळाली.

यात माझ्या वडीलांच्या उपकाराची जाण ठेवून माझे चुलते आमदार बबनराव पाचपुते यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी १७० क्राॅस मते मला दिली. म्हणजे राहुल जगताप यांची नेमकी किती मला मिळाली याचा हिशोब तुम्ही करा.....

माझे वडील सदाअण्णा आज हयात नाहीत. मला काष्टीने सरपंच केले हे राहुल जगताप व त्यांच्या बलगबच्च्यांना पाहवले नव्हते. ज्या अण्णांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या मुलाला बाजार समिती निवडणुकीत उभे करुन कायमचे संपविण्याचा प्रयत्न झाला, पण वडीलांची पुण्याई कामाला आली आणि मी तरलो आणि माझा मित्र मितेश मात्र, पडला नव्हे तर पाडला गेला", असा आरोपही साजन पाचपुते यांनी केला.

"मी तर सभापती होणारच नव्हतो पण मितेशला मात्र सभापती करु, हा शब्द बाळासाहेब नाहाटा यांना राहुल जगताप यांनीच दिला होता. मितेश सभापती झाला तर काही खरे नाही, असे वाटू लागल्याने त्याला पाडण्याचे कारस्थान सुरु झाले. त्यामुळेच त्या तरुण मुलाचे राजकारण सुरु होण्यापुर्वीच संपविण्याचा कुटील डाव राहुल जगताप यांच्या जवळच्या सोनेरी टोळीने टाकला व त्यात ते यशस्वी झाले.

हा सगळा घटनाक्रम झाला व त्यानंतर सभापती, उपसभापती पदाची निवडणूक लागली. मला सभापती व्हायचे नव्हते. मी त्यासाठी इच्छुकही नव्हतो. मात्र, काहींनी माझे नाव पुढे केले व पुर्वनियोजीत माझा कार्यक्रम करण्याचा डाव राहुल जगताप व त्यांच्या बगलबच्च्यांनी टाकला. मला सगळ्यांनी विरोध केला हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला", असंही ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Rahul Jagtap and Sajan Pachpute
Sanjay Raut On Bjp : महाराष्ट्रात मुंडेंचा आणि देशात वाजपेयी, अडवाणींचा भाजप आता राहिला नाही...

"मी अण्णांचा मुलगा आहे. उतरलो की आर नाही तर पार अशीच लढाई करतो हे काष्टीकरांना चांगलेच माहिती आहे. मला सभापती व्हायचेच नव्हते त्यामुळे मी त्यात उतरलोच नाही. पण ज्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना उमेदवारी दिल्यावर मी त्यांना कशी मदत करु शकतो. आपणच सांगा ज्यांनी माझे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला, हे पुराव्यानिशी माझ्या पुढे आल्यावरही मी त्यांना मदत करणे योग्य होते का? राहुल जगताप यांचे व माझे कुठलेही राजकीय संबंध नव्हते.

मात्र, केवळ राज्याचे नेते अजित पवार यांनी मला आदेश दिला व तो मी मान्य केला. पण जे त्यांच्या नेत्याला डोक्यावरुन टाकण्याची तयारी करतात ते मला व माझ्या कार्यकर्त्यांना भविष्यातही पाडापाडीचे राजकारण करतील हे न समजण्याएवढे आम्ही दुधखुळे नाहीत. या गद्दारीनंतर एक मोठा व महत्वाचा निर्णय घेत आहे. माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आपण तालुक्याच्या राजकारणात स्वतंत्र राहणार आहोत. मित्रांनो तुम्ही सांगा यात माझे काय चुकले का...", असं साजन पाचपुते यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com