आर्थिक घाव सोसूनही वर्तमानपत्रांनी विश्वासार्हता टिकवली...

साहित्य संमेलनात कोरोनानंतरचे अर्थकारण आणि साहित्यव्यवहार या परिसंवादात वर्तमानपत्राच्या स्थितीवर चर्चा झाली.
Sakal Newspaprs photo
Sakal Newspaprs photoSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनानंतरचे अर्थकारण आणि साहित्यव्यवहार या परिसंवादात वर्तमानपत्राच्या स्थितीवर काही मुद्दे समोर आले. वास्तविक वृत्तपत्रांनी यापूर्वी अनेकदा संकटे झेललेली आहेत. जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झाला, तेव्हा वर्तमानपत्रे संपतील, असे म्हटले गेले. पण त्यानंतर वर्तमानपत्रे संपली नाहीत, तर वाढली. वर्तमानपत्रांचे अर्थकारण (Economy of Newspapers) बिघडत असले तरीदेखील हा डोलारा कोसळणार नाही, याची खबरदारी घेत पुढे मार्गक्रमण सुरू होते.

Sakal Newspaprs photo
देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर संतापले, म्हणाले, `त्यांना लाज वाटली पाहिजे`

यानंतर कोरोनाने वर्तमानपत्रांवर मोठा घाला घातला. लॉकडाउनमध्ये सलग अनेक दिवस वर्तमानपत्रे बंद होती. मात्र त्यानंतरही डिजिटल माध्यमातून वाचकांपर्यंत विश्वासार्ह बातम्या पोचवण्याचे व्रत वृत्तपत्रांनी सुरूच ठेवले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे समाज माध्यमांच्या अतिरंजित आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांच्या काळात वर्तमानपत्रांनी मोलाची भूमिका बजावत चोख आणि अचूक माहिती बातम्यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवली. जणू कोरोनाचा काळ हा वर्तमानपत्रांसाठी तपश्चर्येचा ठरला.

Sakal Newspaprs photo
मधुकर पिचड अडचणीत, मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करून मालमत्ता हडप केल्याची तक्रार!

खटाटोप करून जेव्हा वर्तमानपत्र वाचकांपर्यंत पोचवण्यास सुरवात झाली, तेव्हादेखील लोकांमधली भीती कमी झालेली नव्हती. अनेक लोक इस्त्री करून पेपर घरात घेत होते, तर काही लोक दुसऱ्या दिवशी आदल्या दिवसाचा पेपर वाचायचे, तोवर पेपर उन्हात वाळत ठेवला जायचा. डब्ल्यूएचओसारख्या संस्थेने वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, असे सांगूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. एकीकडे जाहिरातींच्या उत्पन्नासाठी आटोकाट प्रय़त्न, तर दुसरीकडे वितरणाच्या अपुऱ्या व्यवस्थेअभावी वाचकांपर्यंत कसा न्यायचा, हा मोठा प्रश्न होता. वृत्तपत्रांचे एजंट आणि हॉकर्स यांनी जिवाची पर्वा न करता वर्तमानपत्र पोचवण्याचे काम सुरू ठेवण्याचा केलेला प्रयत्न या सगळ्या काळात अत्यंत मोलाचा ठरला. अनेक विक्रेते बांधवांना या काळात कोरोना संसर्गाने मुकावे लागले.

सध्याच्या काळाचा विचार करता खपाच्या संदर्भात वर्तमानपत्रे कोविडपूर्व परिस्थितीत पोचली आहेत. महसुलाच्या संदर्भात अजूनही ती परिस्थिती यायची आहे. कारण वर्तमानपत्रांचे व्रत टिकवायचे आहे. वृत्तपत्रांचा व्यवसाय हा मुळात तोट्यातील व्यवसाय मानला जातो. हा कदाचित जगातील एकमेव व्यवसाय असावा, ज्याचे निर्मितीमूल्य अधिक आणि विक्रीमूल्य कमी आहे. आम्ही वर्तमानपत्रातील मंडळी गमतीने असे म्हणतो, की वर्तमानपत्र काढण म्हणजे रोज लग्न लावण्यासारखे आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक घाव सोसल्यानंतरही अत्यंत नेटाने हा वृत्तपत्र व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचे काम आम्ही करत आहोत. मात्र प्रत्येक संकटात जशी संधी असते, ती संधी अनाहूतपणे वर्तमानपत्रांसाठी चालून आली.

कोरोना काहीअंशी वर्तमानपत्रांसाठी इष्टापत्ती ठरला. अलीकडेच जागतिक पातळीवर एक सर्वेक्षण समोर आलेय, त्यात कोरोनाकाळात वर्तमानपत्र सर्वांत विश्वासार्ह माध्यम असल्याचे म्हटलेय. विश्वासार्हतेच्या जोरावर वर्तमानपत्रांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती वाचकांपर्यंत पोचवली. जेव्हा मास्क वापरला जात नव्हता, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते तेव्हा त्यावर वर्तमानपत्रांनी प्रहार करून लोकांना या गोष्टी पाळण्याचे आवाहन केले. ऑनलाइन शिक्षणात अडकलेली शालेय मुले आणि वेबसिरीजमध्ये गुंतलेल्या युवा पिढीकडे पाहिल्यानंतर पालक-शिक्षकांना वृत्तपत्राचे महत्त्व समजू लागलेय.

मूळ विचार वाचल्याशिवाय, तो अंगी बाणल्याशिवाय पर्याय नाही. साहित्याची दर्जेदार पुस्तके वाचणे, वर्तमानपत्रांमधील ताज्या घडामोडी, विश्लेषण वाचून ते समजून घेणे पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा विचाराअभावी ही पिढी धोक्यात येऊ शकते. वाचन, चिंतन, मनन या त्रिसूत्रीकडे या पिढीला न्यावे लागणार आहे. किंबहुना वर्तमानपत्रांना ही भूमिका आता सक्षमतेने पार पाडावी लागेल. वेळीच समाज माध्यमांच्या तडाख्यातून सावरलो नाहीत, तर पुढची पिढी एकांगी विचार करणारी आणि मनोविकारांच्या विळख्यात गुरफटलेली राहील. या माध्यमांचा वापर कसा करावा, हे समाजावून सांगण्याची जबाबदारीदेखील आता वृत्तपत्र उचलत आहेत.

वाचनसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक म्हणून वृत्तपत्रांचे महत्त्व आहे. तरुण पिढी वृत्तपत्र वाचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यांना आकर्षून घेण्यात वृत्तपत्रदेखील कमी पडत आहेत, हे ओळखून त्या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले. ‘सकाळ’चे तरुणांसाठीचे ‘यिन’ व्यासपीठ त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. तरुण पिढीच्या आशा-आकांक्षा नेमक्या काय आहेत, हे जोखण्यात वृत्तपत्रांना अजून यश आलेले नाही, किंबहुना याच दिशेने वर्तमानपत्रे आता सक्रिय होत आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com