
नाशिक : धार्मिक स्थळांवर (Religious places) भोंगे लावण्यासाठी पोलिसांची (Police permission) परवानगी सक्तीची केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) आवाजाच्या डेसिबल मर्यादेसंदर्भात सूचनेचे पालन करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांनी आता अनोखी योजना आखली आहे.
या योजनेंतर्गत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी घेत असताना स्वयंचलित नियंत्रण उपकरण (ऑटोमॅटिक डिव्हाईस) लावणे सक्तीचे केले जाणार आहे. या यंत्रामुळे निर्धारित मर्यादेपेक्षा आवाज अधिक झाल्यास उपकरणामुळे आपोआप वीजपुरवठा खंडित होऊन भोंगा बंद होणार आहे.
भोंग्यांच्या परवानगीच्या नियमावलीप्रमाणे आता डेसिबल नियंत्रणासाठीचा हा प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरणार आहे. राज्यभरात भोंग्यांच्या प्रश्नावर चांगलेच वातावरण गाजत असताना नाशिक पोलिस आयुक्तालयाने पुढाकार घेताना सर्वप्रथम मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते.
त्यानुसार धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक केले आहे. यापुढे जात सर्वोच्च न्यायालयाच्या डेसिबल मर्यादेचे पालन होण्यासाठीदेखील सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत परवानगी देताना संबंधित भोंग्याला स्वयंचलित उपकरण बसविणे सक्तीचे केले जाणार आहे. डेसिबलची कमाल मर्यादा गाठताच या उपकरणामुळे भोंग्याचा विद्युत पुरवठा खंडित होईल व आवाज तातडीने बंद होऊन, यासंदर्भात संबंधितांनाही लक्षात घेईल.
यंत्रणेची दमछाक टळणार...
पोलिस आयुक्तांच्या या पुढाकारामुळे प्रदूषण मंडळ व पोलिस यंत्रणेची दमछाक टळणार आहे. दैनंदिन भोंग्यांच्या आवाजाच्या डेसिबल मर्यादेवर लक्ष ठेवणे यंत्रणेसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे तपासणीदरम्यान कमी आवाज व नंतर सर्रासपणे नियमांची पायमल्ली होण्याची शक्यता निर्माण होते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होवू नये म्हणून स्वयंचलित उपकरणातून डेसिबल मर्यादा पाळली जाणार असल्याने यंत्रणेची दमछाक टळणार आहे, सोबत नियमांचे काटेकोर पालन होण्यास मदत होणार आहे.
नोंदणीकृत स्थळांनाच परवानगी
पोलिस प्रशासनाकडून परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या धार्मिक स्थळांच्या नोंदणीचा संपूर्ण तपशील पडताळून पाहिला जाणार आहे. यासाठी धर्मदाय आयुक्तालयाकडे पत्रव्यवहारदेखील करण्यात आला आहे. केवळ धर्मदाय आयुक्तालयाकडे नोंदणीकृत असलेल्या धार्मिक स्थळांचाच परवानगीसाठी विचार केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती देखील समोर येणार आहे.
संनियंत्रण समितीची आज बैठक
शहरातील धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २१) पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनिप्रदूषण संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पोलिस आयुक्तालयात होत आहे. या समितीमध्ये पोलिस उपायुक्त (परिमंडळ १,२) आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित राहणार आहे.
...
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालक केले जात आहे. यामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाची कमाल डेसिबल मर्यादेची पातळीचे पालन होण्यासाठी उपकरण बसविणे सक्तीचे केले जाईल.
- दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.