Shiv sena : शिंदे गटात गेलेल्या आमदाराला घरातूनच आव्हान ; पाचोऱ्यात राजकीय भूकंप ?

वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार किशोर पाटील व माजी आमदार कै.आर ओ पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kishore Patil, Vaishali Suryavanshi
Kishore Patil, Vaishali Suryavanshisarkarnama

-प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघाचे (Pachora Bhadgaon Assembly)माजी आमदार व निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै.आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) यांनी शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शुभेच्छापर जाहिराती दिल्या आहेत. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्याप्रमाणात फलक लावून आपण ठाकरेयांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. (shivsena latest news)

आर ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणाऱ्या आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांना हे मोठे आव्हान ठरणारे आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार किशोर पाटील कुटुंबीयांत राजकीय व वैचारिक फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हि फुट पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला नवी दिशा देणारी व राजकीय भूकंप करणारी ठरणार, असा सुर राजकीय गोटात व्यक्त होत आहे.

आमदार किशोर पाटील हे गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय नाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रथमपासूनच सहभागी झाले. सुरत, गोहाटी, गोवा, मुंबई अशा शिंदे गटाच्या प्रवासात ते सक्रिय होते. शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची निषेध आंदोलने अथवा विरोध दर्शवणारी भूमिका मतदारसंघात व्यक्त झाली नाही. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी न भूतो न भविष्यती रॅली काढून कमालीचे शक्तिप्रदर्शन केले . प्राचीन राम मंदिरात आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी महाआरती करण्यात आली.

मुंबई येथील यशवंतराव सभागृहात आमदार किशोर पाटील यांनी नुकतेच मेळाव्याचे आयोजन करून मतदार संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार घडवून आणला. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना साकडे घातले. सत्तांतर नाट्यानंतर आमदार किशोर पाटील मतदार संघात परतल्यानंतर त्यांनी आपल्या कामांचा ,बैठकांचा धडाका लावून कामे पूर्ण करण्याचे व नवीन मंजूर कामांना प्रारंभ करण्याचेही संबंधित यंत्रणेला सूचित केले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Kishore Patil, Vaishali Suryavanshi
BJP : भाजप युवा नेत्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या ; कर्नाटक हादरलं

या साऱ्या गोष्टी घडत असताना आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण व माजी आमदार कै.आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जाहिरातबाजी करून आपण ठाकरें सोबत असल्याचा संदेश द्विगुणित केला आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या मोठमोठ्या जाहिराती व मतदारसंघात लावलेले भलेमोठे डिजिटल बॅनर्स राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे ठरले आहेत.

वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार किशोर पाटील व माजी आमदार कै.आर ओ पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आर ओ पाटील यांनी पाचोरा मतदार संघात सर्वप्रथम शिवसेनेचा भगवा फडकवला . त्या अगोदर हा मतदारसंघ कै.के. एम. बापू पाटील व कै.ओंकार आप्पा वाघ यांच्या नावाने ओळखला जात होता.

1978 ते 1999 दरम्यान कै पाटील व कै.वाघ यांनी आलटून पालटून या मतदारसंघाचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे 1999 पर्यंत या मतदार संघात मराठा समाजाच्या व्यक्तीनेच आमदार म्हणून नेतृत्व केले. 1999 च्या निवडणुकीत मात्र कै.आर ओ पाटील यांच्या रूपाने शिवसेनेचे दमदार नेतृत्व व राजपूत समाजाचे प्राबल्य मतदार संघात प्रस्थापित झाले .

त्यांनी प्रथम कै.ओंकार आप्पा वाघ व त्यानंतर त्यांचे सुपुत्र दिलीप वाघ यांना पराभव करून सलग दोन वेळा आमदारकी मिळवली. दरम्यानच्या काळात आमदारकीचा वाढता व्याप त्यात निर्मल उद्योग समूहाचे देशासह देशाबाहेर पसरणारे जाळे या गोष्टींचा व्याप पाहता कै.आर ओ पाटील यांनी आपले पुतणे किशोर पाटील यांना पोलिसाची नोकरी सोडून स्थानिक राजकारणात आणले. प्रथम त्यांना निर्मल सीड्स मध्ये पगारी नोकरी देण्यात आली.

आमदार किशोर पाटील यांनी त्यावेळी स्थानिक राजकारणात सक्रिय होऊन शिवसेनेचे संघटन करून प्रभाव वाढवला. जिल्हाप्रमुख ,नगराध्यक्ष अशी पदे मिळवत जिल्हा परिषद,पंचायत समिती, दूध संघ,जिल्हा बँक अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थात त्यांनी शिवसेनेचे प्राबल्य वाढवले. 2014 च्या निवडणुकीत दिलीप वाघ यांना पराभूत करून किशोर पाटील यांनी विधानसभा गाठली. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार बनले.आर ओ पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून किशोर आप्पांची आतापर्यंतची ओळख आहे.

Kishore Patil, Vaishali Suryavanshi
Shiv sena : शरद पवारांनी शिवसेना फोडली का ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर..

आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट केल्याने आता त्या कै. आर ओ पाटील यांच्या राजकीय वारसदार असल्याचे सिद्ध झाले आहे. किशोर पाटील यांच्या समर्थकांनी काढलेली रॅली, केलेले शक्तिप्रदर्शन या सर्व घडामोडीत वैशाली सूर्यवंशी या कोठेच दिसल्या नाहीत .

त्यांच्या जाहिरातीतून विचार, एकनिष्ठता व वारसा अशा शब्दांचा वापर करून "तत्त्वांशी नाही केली तडजोड, विचारांशी सदैव एकनिष्ठ..आणि आता तोच विचारांचा वारसा" असे शब्द प्रयोग करून बंडखोरांवर टीकास्त्र सोडण्यासह आपली ठाकरे कुटुंबाशी व मातोश्री असलेली एकनिष्ठता स्पष्ट केली आहे.

वैशाली सूर्यवंशी या निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष, निर्मल उद्योग समूहाच्या संचालिका अशा पदांवर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत.

विधानसभा निवडणूकीत उमेदवारी करून आपले चुलत भाऊ असलेले आमदार किशोर पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करतात ? की जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वतीने उमेदवार म्हणून उभ्या राहतात? की ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार, या साऱ्या गोष्टी प्रश्नांकित असल्या तरी आमदार किशोर पाटील व वैशाली सूर्यवंशी या चुलत भाऊ बहिणीमध्ये राजकीय व वैचारिक फूट पडून कौटुंबिक मतभेद विकोपाला जातील असा सूर राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com