नाशिककरांच्या मनात घर केलेल्या महापालिका आयुक्त रमेश पवार यांची १२० दिवसांतच बदली

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Chandrakant pulkundwar & Ramesh Pawar
Chandrakant pulkundwar & Ramesh PawarSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांची नाशिक महापालिका (NMC) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी त्वरित कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना बदलीच्या आदेशात दिल्या दिल्या आहेत. (Dr. Chandrakant Pulkundwar will be the new commissioner of Nashik municiple corporation)

Chandrakant pulkundwar & Ramesh Pawar
चार सदस्यांचा प्रभाग ही राहणार केवळ चर्चाच !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे चौतिसावे आयुक्त म्हणून ते पदभार स्वीकारतील. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी त्या संदर्भातील आदेश पारित केले आहेत.

Chandrakant pulkundwar & Ramesh Pawar
बंडखोर खासदार हेमंत गोडसे लपतछपत न येता थेट जल्लोषात आले...

नाशिककरांच्या मनात घर केलेल्या महापालिका आयुक्त रमेश पवार यांची राज्य शासनाने अवघ्या १२० दिवसांमध्ये शुक्रवारी तडकाफडकी बदली केली. बदलीमागचे ठोस कारण दिले नसले, तरी राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासूनच आयुक्त पवार यांच्या बदलीची चर्चा होती.

कथित म्हाडा सदनिकांच्या घोटाळ्याचे निमित्त करून कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्याच्या सूचना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जाधव यांची बदली करताना त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बदली झाल्याने पवार यांच्या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले होते. मुंबई महापालिकेचे केडर असताना नाशिक महापालिकेत बदली झाल्याने थेट ‘मातोश्री’चाच वरदहस्त असल्याची चर्चा होती; परंतु आयुक्त पवार यांनी त्यांच्या कामकाजात असा कुठलाही आविर्भाव आणला नाही.

श्री पवार यांच्या १२० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या कामकाजातून कार्यक्षमता सिद्ध केली. भूमिपुत्र असल्याने गोदावरी नदी संदर्भात त्यांना आस्था होती. आयुक्तपदाच्या कार्यकाळात गोदावरी स्वच्छतेचा प्रश्‍नासह नमामि गोदा प्रकल्पासाठी ते आग्रही होते. गोदावरी स्वच्छतेची पहाटे पायी व रिक्षातून फेरफटका मारून पाहणी करणे नाशिककरांना भावले. तातडीने निर्णय घेणे व काम मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा नाशिककरांना पसंत पडला. महापालिकेच्या कामकाजातदेखील त्यांनी मोठी सुधारणा घडवून आणली. पालिका कर्मचाऱ्यांचे काम पाहून त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्यातूनच सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा होत आहे.

महापालिकेवरचे दोन हजार ८०० कोटींचे दायित्व ही डोळ्यात खुपणारी बाब त्यांनी खोडली. अनावश्यक कामांना कात्री लावताना सध्या जवळपास ६०० ते ७०० कोटींचे दायित्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयीन वेळेत नियोजित कार्यक्रम व साइट व्हिजिट वगळता पालिका मुख्यालयात ठाण मांडून बसल्याने त्यातून कामावर नियंत्रण निर्माण करण्यात पवार यांना यश आले.

महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये गोंधळ असल्याची बाब समोर आल्याने कर्मचाऱ्यांना थेट निलंबनाचा इशारा देत याद्या दुरुस्त करून घेतल्या. एकंदरीत अवघ्या १२० दिवसांत नाशिककरांवर आयुक्त पवार यांच्या कामकाजाची चांगलीच छाप पडली, असे असताना शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांची झालेली बदली नाशिककरांसाठी आश्चर्यकारक मानले जात आहे.

कोण आहेत डॉ. पुलकुंडवार

नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडवार शनिवारी (ता. २३) कार्यभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. डॉ. पुलकुंडवार नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १९९३ मध्ये यवतमाळ तहसीलदार म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर अमरावती, जालना, हिंगोली व नांदेडमध्ये त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. २०१६ मध्ये ते आयएएस झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक होते. २०१८ पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in