नितीन गडकरींनी जळगाव महापालिकेची बेअब्रु का केली?

जळगाव शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांचा विषय महत्त्वाचा असल्याने त्याकडे वेधले लक्ष
Nitin Gadkari & Jalgaon Municiple corporation Building
Nitin Gadkari & Jalgaon Municiple corporation BuildingSarkarnama

सचिन जोशी

जळगाव : काल- परवा मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) जळगावी (Jalgaon) येऊन गेले. विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि नव्या कामांच्या भुमिपूजनासह घोषणांचा पाऊस त्यांनी पाडला. गडकरींचे ‘कमिटमेंट’ ते पूर्ण करतील, पण अवघ्या चार- पाच किलोमीटरच्या जळगाव शहरातील प्रवासात त्यांनी रस्ते, लगतच्या अतिक्रमणाच्या मुद्यावरुन महापालिकेची (Corporation) ‘इज्जत’ घेतली. यातून पालिकेचे सत्ताधीश काही धडा घेतील का, याची उत्सुकता आहे.

Nitin Gadkari & Jalgaon Municiple corporation Building
पोलिसांना आता ८ तासांची ड्यूटी अन् १ लाख घरे!

जिल्हावासियांचे नसेलही किंवा नाहीच.. पण, चांगले रस्ते हे जळगावकरांसाठी जणू पूर्ण न होणारं स्वप्नच. कारण, गेल्या चार- पाच वर्षांपासून शहरातील प्रमुख आणि नागरी वस्त्यांमधील सर्वच रस्ते, गल्लीबोळांची जी काय अवस्था या महापालिकेने करून ठेवलीय, त्या स्थितीवरून तरी चांगल्या रस्त्यांची अपेक्षा करणं आणि ती केली तरी पूर्ण होणं हे स्वप्नच. रस्त्यांच्या अवस्थेमुळे नरकयातना सोसणाऱ्या संयमी (षंढ?) जळगावकरांना शहराबाहेर पडताच चांगल्या गुळगुळीत रस्त्यांची अनुभूती येते, याचे कारण केंद्रातील रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे व्हीजन. जळगाव शहराच्या चारही बाजूंनी जाणाऱ्या रस्त्यांचा चेहरामोहराच गेल्या पाच-सहा वर्षांत बदलला. राष्ट्रीय महामार्ग असेल, पिंप्री- धरणगाव- अमळनेर, अथवा चोपड्यापर्यंतचा मार्ग, पाचोरा- भडगाव- चाळीसगाव, मुक्ताईनगर- बोदवड- जामनेर रस्ता अशा अनेक रस्त्यांची कामे गतकाळात झाली.. आणि त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही परवा गडकरींच्या हस्ते झाले.

Nitin Gadkari & Jalgaon Municiple corporation Building
भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

या रस्त्यांचे लोकार्पण करताना गडकरींनी आधी घोषणा केलेल्या व या काळात पूर्ण न होऊ शकलेल्या कामांमधील तांत्रिक व मक्तेदार एजन्सीशी संबंधित अडचणींचीही मनमोकळेपणाने कबुली दिली. परंतु, ही कामे पूर्ण करण्याची ग्वाही देतानाच त्यांनी आठ- दहा हजार कोटींच्या कामांच्या घोषणाही करून टाकल्या.

शहराच्या सभोवतालचे रस्ते चांगले होत असताना शहराच्या हद्दीतील रस्त्यांची दुर्दशा का? हा प्रश्‍न गडकरींना पडणे स्वाभाविक होते. शहरातील रस्त्यावर त्यांनी भाष्य केले नाही. पण, विमानतळापासून हॉटेल प्रेसिडेंटपर्यंत व हॉटेलपासून शिवतीर्थापर्यंत येताना त्यांची त्यांच्या निधीतून होत असलेल्या महामार्गालगतच्या अतिक्रमण व अवस्थेवर बोट ठेवले. बेशिस्त ट्रकची पार्किंग, अनियंत्रित वाहतूक त्यामुळे होणारी कोंडी असे मुद्दे त्यांच्या नजरेतून सुटू शकले नाहीत. शहरात जागा दिल्यास ट्रक टर्मिनल उभारुन देण्याचेही घोषित केले.

महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे (कुठल्याही पक्षाचे असोत) लक्ष शहरातील अशा जागांवरच असते, त्यामुळे अशी मोठी जागा मनपा उपलब्ध करून देणे कठीणच, हे गडकरींना माहीत नसावे. कारण अशी एखादी जागा असलीच तर तिला हडप करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत असतात. महापौर गडकरींना विविध कामांसाठी निधीची मागणी करणारे निवेदन देत असताना शहरातील रस्त्यांचा व महामार्गालगतच्या अतिक्रमणाचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील विषय व्यवस्थित हाताळला तरी खूप होईल.

गडकरींच्या भाषणात सर्कलचाही उल्लेख होता. ते महामार्गावर असल्याने अंडरपास व उड्डाणपुलाच्या कामाचा उल्लेख त्यांनी केला. आता यातून धडा घेऊन महामार्ग प्राधिकरणानेही या सर्कलवर होणाऱ्या कोंडीवर अथवा वाढलेल्या अपघातांच्या शक्यतेवर काय मार्ग काढता येईल, यावर तांत्रिकदृष्ट्या विचार करणे गरजेचे आहे. मनपा यंत्रणा असो की, न्हाई अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणांनी गडकरींसारख्या मंत्र्याच्या दिशादर्शक वाटेवरुन किमान जाण्याचा प्रयत्न केला तरी रस्त्यांचे प्रश्‍न सुटू शकतील..

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com