Jayant Patil: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी नेत्यांची कानटोचणी का केली?

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Upcoming elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं (NCP) राज्यभर सदस्य नोंदणी अभियान (Membership Drive) सुरू केलं आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जळगाव, (Jalgaon) धुळ्याचा (Dhule) दौरा केला. हा दौरा विविध कारणांनी गाजला. सव्वा महिन्यातील हा दुसरा दौरा राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी असल्याचे बोलले जाते. (NCP leader Jayant patil tour jalgao & Dhule twice in a month)

Jayant Patil
मांजरपाडा हा छगन भुजबळ यांचा माईलस्टोन प्रकल्प!

जळगाव जिल्ह्यातील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी चांगलंच धारेवर धरलं, तर धुळ्यातील गटबाजी या दौऱ्यात अधोरेखित झाली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आहेत. कदाचित गुजरातमधील निवडणुकांसोबत महाराष्ट्रात निवडणुका होणे शक्य असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. हिमाचल प्रदेशात निवडणुका घोषित झालेल्या आहेत. तिथं भाजपला यश मिळाल्यास गुजराजसोबत महाराष्ट्रात निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार पक्षबांधणीची मोहीम सुरू आहे. जळगावमध्ये जयंत पाटील आले असता, त्यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. पारोळा, चोपड्यात सदस्य नोंदणीचं काम फारस पुढे सरकलेलं नाही.

Jayant Patil
राष्ट्रवादीच्या आमदार अहिरेंना झिडकारत शिंदे गटाच्या कार्यक्रमाला उसळली गर्दी

चोपड्यात जागा लढवायची असेल तर मग कामं का होत नाहीत, असा सवाल ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांना विचारला. पारोळ्यातील कामांबाबतही प्रदेशाध्यक्षांनी अशाच स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. त्यावर ज्यांना जबाबदारी दिली ते काम करत नाहीत, अशी भूमिका माजी आमदार सतीश पाटील यांनी मांडली. जबाबदारी बदलणं हे तुमचंच काम आहे, असं म्हणत जयंत पाटलांनी सुनावलं. लोकांमध्ये जाण्याची आत्ता गरज आहे असं म्हणतं, याला सांगितलं, त्याला सांगितलं असं सांगून चालणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले.

निवडणुकीची रणनीती आखण्याऐवजी जयंत पाटील यांचा पक्षांतर्गत डागडुजीवर अधिक वेळ खर्च होत आहे. जयंत पाटील यांनी सकल मराठा आंदोलनाला जळगावात भेट दिली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. हे राजकीयदृष्ट्या योग्य आणि आवश्यक देखील आहे. दुसरीकडे मात्र पक्ष संघटनेच्या कामात मी आता कोणतीही सबब ऐकणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. मी या पदावर किती दिवस आहे, हे मला माहीत नाही; पण अकार्यक्षम लोकांना मात्र मी हाकलून देईन, असा सज्जड दमदेखील त्यांनी भरला. जळगाव ग्रामीणमधील सध्याच्या परिस्थितीवर ज्ञानेश्वर महाजन यांनी विरोधाची भूमिका घेतली. आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यावर आपण सगळ्यांना सोबत घेऊन जातो, असं गुलाबराव देवकर म्हणाले. त्यापाठोपाठ जळगाव ग्रामीणचा उमेदवार आत्ताच जाहीर करून टाका, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, अशी भूमिका गुलाबराव देवकर यांनी मांडली.

जामनेरमध्ये केवळ नेत्यांनी फिरून उपयोग नाही, कार्यकर्त्यांना बळ द्या, अशी सूचना वजा दम जयंत पाटील यांनी संजय गरुड यांना भरला. निवडणुकीच्या काळात केवळ शिक्षकांना फिरवून काय उपयोग, असेही गरुडांना सुनावले. फॉर्म भरल्यावर शिक्षक प्रचार करतात, पण समाजातील लोक शिक्षकांना ओळखत नाही. त्यापेक्षा कार्यकर्त्यांना आत्तापासून मतदारसंघात फिरवा. ऐनवेळी लोक-कार्यकर्ते तुमच्यासाठी का काम करतील, असा प्रश्नही पाटलांनी उपस्थित केला. पक्ष वाढविण्याची ही पद्धत नसून आत्तापर्यंतच्या निवडणूक निकालातून हे स्पष्ट झालंय. म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये जा, मिसळा, जबाबदाऱ्या सोपवा अशी जोरदार कानटोचणी जयंत पाटील यांनी केली. नेत्यांनी लोकांमध्ये जायला हवं. लोक तुमच्याकडे येतील अशी अपेक्षा धरणं चूक असल्याचं सर्व उपस्थितांच्या लक्षात

आणून दिलं.

धुळ्यात आगमनानंतर सदस्य नोंदणीचा आढावा राहिला बाजूला, गटबाजी सांभाळताना जयंत पाटलांना नाकीनऊ आले. एका गटाच्या बॅनरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अनिल गोटे यांचा फोटो नव्हता. त्यावरून चांगलाच राडा झाला. अनिल गोटे हे धुळे-नंदुरबारचे राष्ट्रवादीचे प्रभारी देखील आहेत. गोटे समर्थकांनी फोटो बॅनरवर नसल्यानं राडा केला. बैठक आटोपल्यावर जयंत पाटील यांना गाडीतून उतरवून बॅनर दाखवण्यात आले. पक्षशिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करू, असे सांगत जयंत पाटील यांनी विषयाला पूर्णविराम दिला. मात्र यामुळे धुळे राष्ट्रवादीत दुफळी असल्याचं प्रकर्षानं समोर आलं. अनिल गोटे यांचं पक्षात राहणं अनेकांना खुपणारं आहे. धुळ्यातून विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. धुळे शहराध्यक्ष रणजित भोसले हे त्यातील एक. शहरातून अनिल गोटे देखील इच्छुक आहेत. आणखी दमदार उमेदवार मिळाला, तर त्याचाही धुळ्यातून विचार होऊ शकतो. शिंदखेड्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिंदखेड्यात राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. धुळे शहरात मात्र जुने आणि नवे असा वाद या निमित्तानं समोर आहे. सभासद नोंदणीच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या. सभासद नोंदणीवर लक्ष देणाऱ्यांना पदं आणि उमेदवारीचा विचार होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आता निर्णायक वेळ

काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार धुळे दौऱ्यावर आले होते. तेव्हा अनिल गोटेंनी उघड भूमिका घेतली. गटबाजी असेल तर पक्ष मजबूत करणे कठीण असल्याचं ते पवार यांना म्हणाले. त्यानंतर गोटे यांनी शरद पवार यांना मल्हार बागेत जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, शरद पवार यांनी शहराध्यक्ष रणजित भोसलेंकडे जाणं पसंत केलं. तेव्हापासून धुळ्यात राष्ट्रवादीतील दोन गटांमध्ये वाद धगधगतोय. आता धगधगणारे वाद शमवायचे की पक्षबांधणी करत निवडणुकांसाठी सज्ज व्हायचं, हे ठरवण्याची वेळ राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com