भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

जळगाव जिल्हा बॅंकेच्या राजकारणात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना चेक मेट केल्याचे चित्र आहे.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

नाशिक : जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक (Jalgaon District Bank election) राजकीय ताकद, डावपेच व प्रतिष्ठेची चाचणी म्हणून पाहिली जात होती. त्यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) व काँग्रेसच्या डावपेचांपुढे राज्य भाजपचे संकटमोचक म्हणून मिरवणाऱ्या गिरीश महाजनांना (Girish Mahajan) `कात्रजचा घाट` दाखवला. महाजनांना पुढे पाऊल टाकता येईना व मागेही फिरता येईना. त्यामुळे त्यांनी पाढरे निशाण फडकावल्याने, मुरलेल्या नाथाभाऊंपुढे गिरीश महाजनांचे राजकारण चक्क `कच्चा लिंबू` ठरले.

Girish Mahajan & Eknath Khadse
भुजबळ-कांदे वादाला वेगळे वळण; निकाळजे म्हणतो, आमदार सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल करा!

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेल निर्मितीची प्रक्रीया प्रारंभी सुरु झाली. त्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख तर शिवसेना व काँग्रेस हे अन्य असे चार पक्ष होते. त्यातील दोन बैठकांत तीन-चार जागांचा अपवाद वगळता जवळपास पॅनेलचे प्रारूप देखील तयार झाले होते.

त्यानंतर अचानक काँग्रेसने यु टर्न घेत भाजपबरोबर आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यात काँग्रेसला दोन ते तीन जागा हव्या होत्या, प्रत्यक्षात एकच जागा वाट्याला येत होती. त्यात देखील गिरीश महाजन यांचा त्या जागेसाठी आग्रह होता. त्यामुळे तीथे भाजपचा उमेदवार असण्याचा धोका होताच. हे ओळखून काँग्रेसने सावध पवित्रा घेतला होता. मात्र ज्या काँग्रेसला गिरीश महाजन किरकोळ समजत होते, त्यांनीच त्यांचा सगळा डाव उलटवणाऱ्या फटाक्याची वात पेटवली होती, हे अतीआत्मविश्वास असलेल्या महाजन यांच्या लक्षातच आले नाही.

Girish Mahajan & Eknath Khadse
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी गोंदीयाचा दौरा सोडून रात्रीच थेट नगरचे रुग्णालय गाठले!

याच दरम्यान अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील चुळबूळ सुरु झाली. यातील काही इच्छुक उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. काहींची दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. त्याने सर्वपक्षीय पॅनेलच्या प्रसवप्रक्रीयेत जन्माच्या नव्हे तर अडथळ्यांच्या वेदना अधिकच वाढल्या. बँक निवडणुकीत एकवीस जागांत भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी सात, शिवसेनेसा पाच व काँग्रेसला दोन असे सूत्र होते. त्यानुसार भाजपने सात जागांवर उमेदवारी अर्ज भरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व एकवीस जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने सहा तर शिवसेनेने सात ते आठ जागांवर उमेदवार दिले होते. नेहेमीच प्रचंड आत्मविश्वासाने वागणारे महाजन यांच्या हा साधा डाव लक्षातच आला नाही. त्यांचे उमेदवारी अर्ज फक्त नऊ जागांवरच होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीच्या एक दिवस आधी एकनाथ खडसे सुडबुद्धीने वागणाऱ्या भाजपशी युती अशक्य असल्याचे जाहीर केले. तेव्हा भाजप पुरता अडकला होता.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या राजकारणावर शेवटचा घाव बसला तो भाजपचे महत्त्वाचे अर्ज बाद झाल्याचा. भाजपच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांसह चार महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले. विशेष म्हणजे महाजनांच्या गोटात येऊन नाथाभाऊंना ललकारणाऱ्या रक्षाताईंना अर्ज देखील भरता येत नाही, यावरून गुलाबराव पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली.

हा मोठा धक्का होता. त्यावर अपील झाले, उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले, मात्र अर्ज बाद करण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम राहीला. भाजपबरोबर जायचे नाही हे दाखवायचे दात होते. खरे टार्गेट गिरीश महाजन होते. कारण शेजारच्या धुळे-नंदूरबार जिल्हा बॅंकेचीही निवडणूक सुरु आहे. तीथे सर्वपक्षीय पॅनेलचे नेतृत्व चक्क भाजप नेते अमरीशभाई पटेल व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेस सुखनैव राजकारण करीत आहे. हे महाजनांना कळायला विलंब झाला होता, किंवा कळलेच नसावे. परिणामी एकनाथ खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीश चौधरी अर्थात महाविकास आघाडीसमोर पराभव स्पष्ट दिसू लागला. त्यामुळे भाजपचे संकटमोचक स्वतःच संकटात सापडल्याने अखेरच्या दिवशी श्री. महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ (अन्य गटातील अर्ज), माजी खासदार ए. टी. पाटील यांसह भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेत पांढरे निशाण फडकावले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com