आमदार फारुक शाह यांचा मनपा आयुक्तांवर हल्लाबोल!

धुळ्याच्या आयुक्तांविरोधात घेणार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.
MLA Farukh Shah
MLA Farukh ShahSarkarnama

धुळे : महापालिकेच्या (Dhule) आयुक्तपदाचा गतवर्षी सप्टेंबर मध्ये देविदास टेकाळे (Devidas Tekale) यांनी कार्यभार स्वीकारला. ते आजपर्यंत नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास व मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आयुक्तांविरोधात आमदार फारुक शाह (MLA Farukh Shah) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात श्री. टेकाळे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. (Farukh Shah will meet CM Eknath Shinde to complain of Commissioner)

MLA Farukh Shah
`साहेब, आम्ही गद्दार नाही ,तुम्हाला सोडून जाणार नाही`

आमदार शाह यांनी तक्रारीत म्हटले आहे, की शहरातील पाणीप्रश्न, कचरा संकलन, मोकाट जनावरे, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि पथदिव्यांची समस्या आदींबाबत वारंवार आयुक्तांकडे तक्रारी केल्या. मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी निर्देश दिले. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या मनपा प्रशासनाने कुठलीही कार्यवाही अद्याप केल्याचे दिसून येत नाही.

MLA Farukh Shah
चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

शहरासाठी मुबलक जलसाठा उपलब्ध असूनही नागरिकांना किमान ८ ते १० दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात विचारणा केल्यानंतर प्रशासनाने चार दिवसानंतर नियमित पाणीपुरवठा केला जातो, अशी खोटी माहिती आमदार कार्यालयास दिली. आजही मिल्लतनगर, दुर्बल घटक सोसायटी, गरीब नवाजनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात किमान दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो.

कचरा संकलनात दिरंगाई होत आहे. शहरातील पाचकंदील भाग, ८० फुटी रोड, जुने धुळे, साक्री रोड, मौलवीगंज येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाड्यांची संख्या न वाढविल्यामुळे नागरिकांना कचरा इतरत्र फेकावा लागतो. वर्षभरापासून मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे- डुकरे याबाबत उचित कार्यवाहीची सूचना देऊनही, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत वाहतुकीच्या कोंडीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचा आदेश देऊनही आयुक्तांकडून कुठलीच कारवाई झालेली नाही. ८० फुटी रोड, संत कबीर चौक, गांधी पुतळा चौक, पंचवटी, महापालिका चौक, पंडित नेहरू पुतळा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमणग्रस्त आहेत. दिलदार नगर, काझी प्लॉट, अन्सार नगर, चाळीसगाव रोड, वडजाई रोड, फायनल प्लॉट क्रमांक ४९, ८० फुटी रोडबाबत तक्रारी होऊनही अतिक्रमणे हटविली जात नाहीत. रात्री अनेक प्रभागातील पथदिवे बंद दिसतात. तक्रारी करूनही प्रशासनाला कुठलाच फरक पडत नाही. आयुक्त टेकाळे यांच्या कार्यकाळात मनपाचे अन्य अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. त्यांचे नागरिकांशी असलेले वर्तन अयोग्य असल्याचे निदर्शनास येते. आयुक्तांचा कुठलाच वचक यंत्रणेवर दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची तक्रार केली असून कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आमदार शाह यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in