
Nashik News: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड बुधवारी (24 मे) होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली. लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या 24 मे रोजी सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात होईल. तर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी नाम निर्देशन पत्र देणे तर 11 वाजून 30 मिनिटापर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, 11 वाजून 45 मिनिटापर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, तर 11:55 मिनिटांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ देण्यात आली आहे.
दुपारी 12 वाजता गरज वाटल्यास मतदान मतमोजणी व निवडणूक निर्णय जाहीर करण्यात येईल. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत नऊ जागा शेतकरी पॅनल तर आठ जागा शेतकरी विकास पॅनलला व एक जागा अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री तथा शेतकरी विकास पॅनलचे नेते छगन भुजबळ यांच्या पॅनलला आठ जागेवर समाधान मानावे लागले.
तर थोरे - जगताप गटाने नऊ जागा जिंकून भुजबळ गटाला धक्का दिला. बाजार समितीच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी थोरे-जगताप गटाला चर्चेसाठी दोन दिवसांपूर्वी पाचारण करून सकारात्मक चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.
तर आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांची सोमवारी चर्चा करून गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून बाजार समितीचे हित सर्वांना समजावून सांगितले. मात्र, याबाबतीत अंतिम निर्णय भुजबळ यांच्या निवासस्थानी अंतिम चर्चा होऊन पहिली टर्म कोणत्या गटाला द्यायची यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचंही बोललं जात आहे.
या बैठकीत प्रत्येक गटाच्या सीनियर सदस्याला एक वर्ष सभापतीपद तर नवनिर्वाचित सदस्यांना सहा महिने उपसभापती पद देण्यात येईल, असे समजते. सभापती पदासाठी थोरे-जगताप गटाकडून पंढरीनाथ थोरे, डी.के.नाना जगताप व राजेंद्र डोखळे व सुवर्णाताई जगताप हे सभापती पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर होळकर- पाटील गटाकडून जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षिरसागर, सोनिया होळकर हे सभापती पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
यात प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिने उपसभापती पदाचा मान मिळणार असल्याचंही समजतं आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बाजार समितीच्या सभापतीपदी ग्रामीण भागातील चेहऱ्याला स्थान दिले जाणार असल्याने बाळासाहेब क्षीरसागर हे प्रमुख दावेदार बनले होते.
दरम्यान, शेतकरी पॅनलने नऊ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. पण जर पंढरीनाथ थोरे सभापती होणार असेल तर अपक्ष उमेदवार प्रवीण कदम यांनी आपण समोरच्या गटाला जाऊन पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेणार असल्याचेही समजते.
तसे झाल्यास दोन्ही गटांच्या नऊ-नऊ जागा होतील व त्यानंतर चिट्ठीवर सभापती पदाचा निर्णय होऊन एक तर सत्ता नाही तर मायनॉरिटी मध्ये बसावे लागेल. शिवाय पाच वर्ष विकास कामे करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार, त्यामुळे दोन्ही गटांनी बाजार समितीच्या हिताचा निर्णय व सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सदर निर्णय घेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.