
Nashik : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर, कुरुलकर प्रकरण यांसह राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राऊत म्हणाले, त्र्यंबकेश्वर प्रकरणात नव्हे तर कुरुलकर प्रकरणी एसआयटी नेमली पाहिजे. कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी...
संजय राऊत म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)चा एक प्रमुख प्रचारक जो पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकतो. पण त्यावर भाजप एसआयटी नेमत नाही. नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकले आहेत आणि हे सगळे भाजप आणि संघाशी संबंधित आहेत. त्याच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडवत आहात. पण महाराष्ट्र एकसंघ आहे, एकसंघ राहील. तुम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.
रामनवमी संदर्भात एसआयटी नेमली का?
राऊत म्हणाले, " त्र्यंबकेश्वर(Nashik Trimbakeshwer) मध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरी घुसलेलं नाही. मग या घटनेवर एसआयटी कसली नेमताय ? या देशात, महाराष्ट्रात काय चाललंय हे तुम्हाला माहीत नाही का? रामनवमी संदर्भात एसआयटी नेमली का? असा सवाल उपस्थित केला. तसेच रामनवमीला कधी नव्हे ते दंगली झाल्या, गेल्या ६० वर्षात रामनवमीला दंगली झाल्या नाहीत. या महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा. दंगली घडवून राजकारण करायचं असेल तर ते कधी होणार नाही असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
'त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही'
त्र्यंबकेश्वर हे आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. इथे याआधी अशाप्रकारच्या घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशाप्रकारचं पत्र लिहायला सांगितलं. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा आहे, मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवून ते पुढे जातात असं राऊत म्हणाले. पण त्र्यंबकेश्वर येथे काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरी घुसलं नसल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.