जळगावचे नगरसेवक टक्केवारीत बरबटले?

जळगावच्या समस्यांनी सहनशील नागरिक त्रस्त असून हे प्रश्न कोण सोडवणार?
जळगावचे नगरसेवक टक्केवारीत बरबटले?
Jalgaon CitySarkarnama

सचिन जोशी

जळगाव : ‘अमृत’ योजनेची कामे करताना रस्त्यांची दुर्दशा करून पाच वर्षांपासून जळगावकरांची (Jalgaon) ‘हड्डीपसली एक’ केल्यानंतर जळगाव महापालिका पिवळे व दूषित पाणी (Drinking Water Issue) पाजून नागरिकांच्या जिवावरच उठली आहे. एवढे होऊनही मालमत्ता करवाढीचा दुपटी-तिपटीचा जुलूम सहन करणाऱ्या जळगावकरांच्या सहनशीलतेला जसा ‘मुजरा’ करायला हवा... तसे या विषयांवर चकार शब्दही न उच्चारणारे, मक्तेदारी अन्‌ टक्केवारीत बरबटलेले नगरसेवकही ‘सॅल्यूट’चे मानकरी ठरावेत. (Jalgaon people facing drinking water issue)

Jalgaon City
महसूल कार्यालयावर आज `लाल वादळ` घोंगावणार!

जळगाव शहरातील समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. हे ग्रहण आताच लागले आणि ते सुटले पाहिजे, अशी कुणाची अपेक्षा नाही. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून रस्ते, गटार, स्वच्छता, आरोग्य, पाणी अशा किमान नागरी सुविधांच्या बाबतीतही हजार कोटींचे बजेट असलेली महापालिका सातत्याने अपयशी ठरत असेल तर त्याला केवळ त्या पालिकेचे सारथ्य करणारे सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी हेच कारणीभूत आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही.

Jalgaon City
खडसे समर्थकांकडून एक दिवस आधीच फटाक्यांचे बुकिंग

पाणीपुरवठा आणि भुयारी गटार व मलनिस्सारण योजना शहरासाठी ‘अमृत’ ठरेल, असे वाटत होते. मात्र, सहा वर्षांतही ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. एखाद्या चांगल्या योजनेचे अत्यंत वाईट नियोजनामुळे कसे ‘तीनतेरा’ वाजतात, त्याचे हे ‘आदर्श’ उदाहरण. योजनेमुळे शहरभरातील रस्ते मात्र खोदून त्यांची चाळण करण्यात आली. गेल्या पाच-सहा वर्षांत या रस्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे आजार जडले. रस्त्यातील खड्डे अनेकांच्या जिवावरही उठल्याची उदाहरणे आहेत. जळगावकर जनता किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक या विषयावर ‘मौन’ पाळून आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ज्या किमान मूलभूत सुविधा महपालिकेने पुरविल्या पाहिजेत, त्या प्राथमिक पातळीवरच मनपाची यंत्रणा फेल ठरलीय. रस्त्यांच्या दुर्दशेतून सावरणे दूर असताना आता एक-दीड महिन्यापासून शहरात दूषित, पिवळ्या पाण्याचा पुरवठा होतोय. नागरिकांनी या पाण्याचे नमुने काही नगरसेवक, पालिकेतील अधिकाऱ्यांना दिले. त्यावर महासभेत चर्चाही झाली. मात्र चर्चेला विराम मिळाला असला, तरी दूषित पाणीपुरवठा काही बंद झाला नाही. पाण्याचा पिवळेपणा कमी झाला असला, तरी पाण्याला दुर्गंधी कायम असून, त्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार उद्‌भवल्याच्या असंख्य तक्रारी समोर येतायत. पाणीपुरवठा अभियंत्याने सभेत पाणी पिण्याचे नाटक केले खरे, मात्र त्यातून हे पाणी दूषित नाही असे सिद्ध होत नाही. असे असूनही जळगावकरच अद्याप गप्पच...

मालमत्तांचे फेरमूल्यांकन गेल्या २० वर्षांत न झाल्याचा दावा करत यंदा मनपाने मालमत्ता करवाढीचा ‘शॉक’ नागरिकांना दिला. अनेक मालमत्ताधारकांना तब्बल दुप्पट, तिप्पट वाढीव कराच्या नोटिसा आल्या. हरकतींची औपचारिकता पार पडूनही बहुतांश रहिवाशांच्या तक्रारी कायम आहेत. २० वर्षांत फेरमूल्यांकन केले नाही, ही काही नागरिकांची चूक नाही. आणि आता नागरी सुविधांच्या बाबतीत सर्वत्र ‘अंधार’ असताना अशा प्रकारे जुलमी करवाढ होत असेल तर ते मान्य होणे अशक्य. तरीही जळगावकर ढिम्म आहेत.

दुर्दैव असे, की ज्यांना आपण निवडून दिलंय ते बहुतांश नगरसेवकही या विषयांवर बोलायला तयार नाहीत. मनपाला मिळालेल्या आणि मिळणाऱ्या निधीतून करावयाची कामे, त्यातील कमिशन, हिस्सा याचे नियोजन करण्यात नगरसेवक व्यस्त... तर जळगावात काही सुधारणा होणेच अशक्य या नैराश्‍यात गेलेले रहिवासी... अशी आपल्या शहराची स्थिती.

जळगावकर सहनशील की निष्क्रिय?

मावळत्या आयुक्तांनी निवृत्त होता होता ‘जळगावकर खूप सहनशील आहेत’ असे वक्तव्य खासगीत केले होते. हे महाशय शंभर टक्के बरोबर बोलले... मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांत अशा समस्या असत्या तर तेथील नागरिकांनी त्या महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीलाच सुरुंग लावला असता. हे चित्र जळगावात कधी दिसेल, याची प्रतीक्षा आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in