दंगल आवडे सर्वांना....घटना कुठे आणि प्रतिक्रिया कुठे?

आता ‘दंगल आवडे सर्वांना’ ही म्हण आपल्या राज्यात रूढ होऊ पाहतेय.
दंगल आवडे सर्वांना....घटना कुठे आणि प्रतिक्रिया कुठे?
Photo of policeSarkarnama

डॅा राहुल रनाळकर

नाशिक : महाराष्ट्रातील काही परिसर हे कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहेत. दुष्काळाच्या निमित्ताने ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ (People favorites Riots) अशी एक म्हण राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. पण, आता ‘दंगल आवडे सर्वांना’ ही म्हण आपल्या राज्यात रूढ होऊ पाहतेय. घटना कुठे आणि प्रतिक्रिया कुठे, हे पुढच्या काळात फारसं लोकांना पटणार नाही. किंबहुना ही बाब आत्ताच कुणालाही पटेनासी आहे.

Photo of police
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

अलीकडेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. कुठेतरी दूरवर काहीतरी घडतं आणि त्याचे पडसाद म्हणून इथे मोर्चे वगैरे निघतात. बरं, त्या मूळ घटनेत किती तथ्य आहे, की त्याला समाज माध्यमातून केवळ हवा देण्यात आलेली आहे, याची शहानिशा करण्याचीही कोणाला गरज वाटत नाही. फिरलेली टाळकी मग हुल्लडबाजी करायला मोकळे होतात. उलटपक्षी विक्षिप्त प्रतिक्रियांमुळे विशिष्ट समाजांबद्दलची आधीच तीव्र असलेली भावना अधिक तीव्र होण्यास मदत होते.

दंगली होण्यास किंवा तशी परिस्थिती निर्माण होण्यास कुठले घटक कारणीभूत आहेत, याचा सखोल अभ्यास केला असता, येणारं उत्तर हे अधिकांशवेळा राजकीय स्वरूपाचं असतं. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या घटनांना खतपाणी घातलं जातं. किती टक्के उद्दिष्ट सफल होऊ शकते, यावर प्रतिक्रियांची तीव्रता वाढवत न्यायची की आता माघार घेतलेली बरी, हे ठरवलं जातं. त्या-त्या वेळच्या तत्कालीन-स्वयंघोषित नेत्यांना मग हे अधिकार बहाल केले जातात. दंगल ही तशी गुंतागुंतीची बाब आहे. कुठल्यातरी घटनेवरची दंगल प्रतिक्रिया वरवर भासत असली, तरीदेखील अनेक दिवस-महिने या संदर्भात खलबतं सुरू असतात. एखादं तत्कालीन कारण सापडलं, की दंगलरुपी भडका उडतो. अगदी मूठभर मंडळी या सगळ्यात आघाडीवर असतात. फायदा मात्र राजकीय मंडळींना होतो. सत्तेत सहभागी असलेली मंडळी अशा घटनांवर कायदेशीर चौकटीतील भाष्य करतात. विरोधात असलेले राजकीय पक्ष-नेते भडकवणारी-प्रसंगी चिथावणीखोर वक्तव्य करतात. सत्ता बदलली, की पुन्हा या मंडळींचे रोल बदलतात. बुद्धिबळातील कॅसलिंगप्रमाणे फक्त घर बदलतात, भूमिका त्याच राहतात.

Photo of police
चंद्रकांत पाटील म्हणतात, राऊत यांनी माझी तपासणी करावी, मी राऊतांचे डोके तपासतो!

धार्मिक ध्रुवीकरण सध्या देशभर कळीचा मुद्दा आहे. खरंच या विषयावर साकल्याने, सर्वंकष विचार करणारी किती मंडळी आता आहेत. जी हा विचार करताहेत. या मंडळींच्या विचाराला गांभीर्याने घेणारे किती लोक आहेत. तुम्ही कितीही सहनशील भूमिका घेतली-मांडली तरी समाज माध्यमांवरील एखाद्या पोस्टने सगळ्या विचारांवर पाणी फेरले जाते. सामान्य जनता काहीही ध्यानीमनी नसताना नकळतपणे या विखारी प्रचाराला बळी पडत राहते. बिनबोभाटपणे धार्मिक, सामाजिक पोस्ट व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केल्या जातात. धार्मिक ध्रुवीकरण करणारी वक्तव्य, फोटो, चुकीचे संदर्भ समाज माध्यमांद्वारे फिरवत ठेवली जातात. त्यातून तरुणांची माथी भडकवायची आणि संधी मिळताच, त्याचे रूपांतर दंगलीत करायचे. मग पुढे प्रयोगशाळा म्हणून तटस्थपणे सगळ्या घटना पाहत राहायच्या. कुठे पेटलंय. जमल्यास त्यात आणखी तेल ओतायचं. जर यदाकदाचित सगळं विझलं तर पुन्हा कसं पेटेल, हे पाहायचं. नाहीच जमलं तर मग अमन-शांतीच्या गोष्टी सुरू करायच्या. पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण कसं घातक आहे, या गप्पा टीव्हीवर मारायच्या आणि सोशल मीडियावर विरोधाभास दर्शवणाऱ्या पोस्ट टाकत राहायच्या, हे आता नित्याचं झालं आहे.

कुठल्याही पक्षाची, विचारांची लोक जर ती डबल गेम करणारी असतील, तर लोकांना ते कळत नाही, असा उगाच काही नेतेमंडळींचा गैरसमज असतो. ठीक आहे की, आपल्याकडची जनता लगेचच व्यक्त होत नाही. अनेकदा जनतेला मूर्ख गृहीत धरून त्यामुळे आपण करतोय ते बरोबरच आहे, असा मनोमन समज या मंडळींचा होत राहतो. पण, वस्तुस्थिती तशी अजिबात नसते. मुस्लिम-दलित-आदिवासी या प्रमुख समुदायांमध्ये सध्या अनेक गट-तट तयार झालेले आहेत किंवा तयार केले गेले आहेत. काही पक्ष-संघटना कुणाची तरी ‘बी’ टीम म्हणून कार्यरत आहेत. या गटांना पक्षीय राजकारणाची किनार आहे. या समुदायांच्या नेमक्या भावना-आवेग नेमकेपणाने समजून येऊ शकेल, अशी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. या समुदायांचे नेते म्हणवून घेणारी मंडळी ही स्वार्थाने अंध बनली आहेत. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष या समुदायांचा पद्धतशीरपणे वापर करून घेत आहे. आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने डोळ्यांवर पट्टी ठेवून हे प्रमुख समुदाय आणि त्यांचे नेते स्वैर पद्धतीने समाजात व्यक्त होत आहेत. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अधिक गुंतागुंतीची तयार केली जात आहे. याचं भान जोवर त्या-त्या समाजांमधील प्रमुख मंडळींना येत नाही, तोपर्यंत सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करणं मोठ्या धेंडांना सहज शक्य होत राहील. किंबहुना दंगल आवडे सर्वांना... ही म्हण मग जनमानसांत अगदी सहज रूढ होऊन जाईल.

---

Related Stories

No stories found.