खडसेंचा दबदबा संपविण्यासाठी गिरीश महाजन कंबर कसून तयार!

जळगाव जिल्ह्याचे राजकारण दूध संघाच्या निवडणुकीत तापणार.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कोण बाजी मारणार, याकडे जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून दूध संघावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) दबदबा संपविण्यासाठी भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) व शिवसेनेतील शिंदे गटाचे आमदारांनी कंबर कसली आहे. (NCP leader Kenath Khadse had thumbing majority on Jalgaon Milks society)

Eknath Khadse & Girish Mahajan
छगन भुजबळांना जुन्या घराची (शिवसेना) ओढ लागली का?

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप व गुलाबराव पाटील यांना दूध संघात पुन्हा आसमान दाखवण्याची रणनीती तयार केल्याचं सांगितलं जात आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात संचालक मंडळाच्या २१ जागांवर ही निवडणूक होणार आहे. यात १५ तालुक्यात दूध सोसायट्यांचे पंधरा प्रतिनिधी याशिवाय दोन महिला राखीव, ओबीसी, एससी, एसटी व एसबीसीच्या प्रत्येकी एक अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दूध संघाशी संलग्न अशा ४३५ दूध सोसायटी असल्या, तरी यापैकी वर्षाकाठी किमान ७० हजार लिटर दूध संघाला पुरवणाऱ्या संस्थांना मतदानाचा अधिकार आहे. अशा संस्थांकडून ज्यांच्या नावाचे ठराव आले आहेत, त्यांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
सत्ता गेली तरी छगन भुजबळांवर येवलेकरांचे प्रेम कायम!

याच संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाचाही अधिकार आहे. हा निकष पूर्ण करणाऱ्या ३५६ दुध संस्था जिल्ह्यात आहेत. अर्थातच ३५६ मतदार हे संचालक मंडळ निवडून देणार आहेत. यापैकी ३३२ संस्थांकडून वेगवेगळ्या नावांचे ठराव दूध संघाला प्राप्त झाले आहेत. ज्यांच्या नावाचे हे ठराव असतील, ते संचालक मंडळासाठी उमेदवारी करू शकणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दूध संस्थांकडून आलेल्या ठरावानुसार भाजप व शिवसेना शिंदे गट यांचे एक पॅनल तर राष्ट्रवादी, काँग्रेस व मूळ शिवसेना असलेल्या संचालकांचं एक पॅनल निवडणूक लढणार आहे. याचाच अर्थ गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचं एक पॅनल, तर त्यांच्यासमोर खडसे व गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात एक पॅनल अशी समोरासमोर अटीतटीची लढाई होणार आहे. जळगाव जिल्हा बँकेत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील व दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचं पॅनल तयार झालं होतं. त्यांची एकत्रित ताकद पाहता भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपच्या पॅनलची सपशेल माघार घेतली होती.

जिल्हा बँकेवर आता मविआची सत्ता आहे. राज्यातील सत्तांतरांचं नाट्य घडलं नसतं, तर आताही दूध संघात हीच परिस्थिती राहिली असती. मात्र शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात झालेलं सत्तांतर पाहता शिवसेनेचे बंडखोर गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची हातमिळवणी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेनेचे सहकार क्षेत्रातील दिग्गज यांचे पॅनल महाजन - पाटील यांना शह देण्यासाठी दूध संघात खडे ठाकणार आहे.

दूध संघातील राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, मुलगी रोहिणीताई खडसे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष ऍड वसंतराव मोरे, आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे सहकार विभागाचे अध्यक्ष वाल्मीक पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचं पॅनल मैदानात असणार आहे, तर दुसरीकडे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण या प्रमुख मंडळींसह एक पॅनल मैदानात असणार आहे. म्हणजेच दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा महाजन विरुद्ध खडसे असा सामना पाहायला मिळणार आहे. गुलाबराव पाटील व महाजन या राज्यातील सत्ताधारी मंडळींची मोट एकत्र बांधली गेल्यानं खडसेंसमोर दूध संघाची सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

असे असले, तरी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांना सहकार क्षेत्रातला असलेला अनुभव पाहता महाजन यांच्या पॅनलला तोडीस तोड उत्तर देण्याची रणनीती आधीच तयार झाली आहे. राज्यातील सत्ता गेल्यामुळे ही मंडळी आता पूर्णपणे दूध संघावर लक्ष केंद्रित करून आहेत, तर दुसरीकडे सत्तांतर झालं असलं तरी, मंत्रिमंडळ विस्तार व इतर सगळ्या बाबींमध्ये गुलाबराव पाटील व गिरीश महाजन हे पूर्णपणे अडकलेले आहेत. दूध संघाबाबत त्यांची रणनीती अजूनही तयार झालेली दिसून येत नाही. त्यामुळे नव्यानं आमदारकीचे बळ मिळालेल्या खडसे यांच्यापुढे सत्ताधाऱ्यांच्या पॅनलचा किती निभाव लागेल, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. खडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकार क्षेत्रातील अनुभव पाहता गिरीश महाजन - गुलाबराव पाटील या जोडगोडीला दूध संघाचं मैदान मारणं सोपं नाही, असंच चित्र सध्यातरी दिसत आहे.

चिमणराव पाटील यांची साथ

पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे शिवसेनेचे बंडखोर असले तरी, ते महाजनांच्या पॅनलमध्ये नक्कीच जाणार नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. गुलाबराव पाटील यांच्याशी त्यांचं हाडामांसाचं वैर असून, ते उघडपणे गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप करत आहेत. शिवाय जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आपले चिरंजीव अमोल पाटील यांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष करण्याचा आग्रह आमदार पाटील यांनी धरला होता, मात्र गुलाबराव पाटील यांनी त्यात खोडा घालून श्यामकांत सोनवणे यांना बँकेचे उपाध्यक्ष केले, त्याचाही राग त्यांच्या मनात आहे. असे असताना त्यांचीही साथ खडसे यांच्या पॅनलला मिळण्याची शक्यता आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in