आधी ग्रामपंचायत सांभाळा; महाजनांचा खडसेंना टोला

भाजपा (BJP) हा घाबरणारा पक्ष नाही अजून घोडामैदान पुढे आहे
आधी ग्रामपंचायत सांभाळा; महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank election) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. राखीव सहा मतदार संघात सहकार पॅनलने बाजी मारत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर,अँड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) विजयी झाले आहेत. मात्र या विजयावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टिका केली आहे.

आजची निवडणूक ही एकतर्फी झाली असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर करुन त्यांनी आमच्या सर्व उमेदवारांचे फॉर्म रद्द केले. कोणीही कर्ज काढलेले नसताना खोट्या कर्जाचे दाखले दिले. आमच्या उमेदवारांचे फॉर्म त्यांनी बाद केले. त्यांचे सहा-सात उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. म्हणून आम्ही या निवडणूकीत आमचे फॉर्म मागे घेतले. ही निवडणूक आम्ही लढलोच नाही. त्यामुळे या ठिकाणी एकच पॅनेल होते, आता विजय झाला की अपयश आले हा विषय याठिकाणी गौण असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

आधी ग्रामपंचायत सांभाळा; महाजनांचा खडसेंना टोला
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील

तर याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा, आपल्या गावातील ग्रामपंचायत तरी ताब्यात आहे का, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या विषयासंदर्भात खडसेंनी या निवडणुकीपासून भाजपने पळ काढल्याचा आरोप केला होता, त्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका केली. भाजपा हा घाबरणारा पक्ष नाही अजून घोडामैदान पुढे आहे जिल्हा परिषदेचे अशा शब्दात महाजन यांनी खडसेंवर थेट आव्हान दिले.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत इतर संस्था मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) विजयी झाले असून त्यांना १५०१ मते मिळाली, इतर मागासवर्ग मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना २३१६ मते मिळाली. त्यांचे विरोधी विकास पवार यांना २४२मते मिळाली, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॅनल चे श्यामकांत सोनवणे विजयी झाले आहेत. त्यांना २४६४ मते मिळाली.

व्ही.जे एन.टी मतदार संघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. त्यांना २३२८ मते पडली. महिला राखीव मतदार संघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन अँड. रोहिणी खडसे व शैलजा निकम विजयी झाल्या आहेत. तर खडसे यांना २२३५ मते मिळाली आणि निकम यांना १९२५ मते मिळाली आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in