Dy C. M. Ajit Pawar

Dy C. M. Ajit Pawar

Sarkarnama

अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन!

अजित पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला संघटनात्मक बळकटीसाठी बूस्टर डोस.

डॉ. राहुल रनाळकर

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मानावा लागेल. अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय मिळाले किंवा मिळेल, हे आत्ताच सांगता येत नसले तरीदेखील पक्षीय पातळीवर आणि राजकीयदृष्ट्या हा दौरा सुफळ संपूर्ण झाला, असे चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Dy C. M. Ajit Pawar</p></div>
या ड्रग्ज तस्करीपुढे ‘कार्डिलिया क्रूज’, आर्यन खान प्रकरण किरकोळ!

वास्तविक जळगाव जिल्ह्यात २००९ च्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाच आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता. मधल्या काळात ही स्थिती खालावली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. सध्या जिल्ह्यात भाजप सध्या बॅकफूटवर आहे. भाजपला मागे सारण्यात खडसे यांनी भूमिका मोठी आहे. राष्ट्रवादीची जिल्हा बँकेवर सत्ता आल्यानंतर हे प्रकर्षाने दिसून येते. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना सहकार क्षेत्रात स्थिरावू पाहतेय. तर काँग्रेसमध्ये पुन्हा नवी उमेद निर्माण होत आहे. एकूणच महाविकास आघाडीची बॅटिंग जोरात सुरू आहे.

भाजप मात्र सध्या कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करताना दिसून येते. ज्येष्ठ नेते गिरीश महाजन सध्या फारसे प्रकाशझोतात नाहीत. काही नगर परिषदा आणि पालिकांच्या निवडणुकीच्या नियोजनात ते सध्या व्यस्त आहेत. तर जळगाव शहरात आमदार राजूमामा भोळे एकटे पडल्याचे चित्र आहे. अमृत योजनेने भाजपाच्या मुळावर घाला घातल्याची स्थिती आहे. जळगाव शहरातील एकाही रस्त्यावर धड चालता येत नाही. हे पाप कुणाचं आहे, हा प्रश्न सध्या जनतेला सतावत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस शहरातील प्रश्नांवर पुढच्या काळात अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आल्यास त्यात नवल वाटायला नको.

<div class="paragraphs"><p>Dy C. M. Ajit Pawar</p></div>
रामदास कदम यांच्या डोक्यात अनिल परब केव्हा गेले?

गिरीश महाजन यांनी गेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मला शंभर दिवस द्या, असं जाहीर आश्वासन दिलं होत. आता तर नऊशे दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे, पण जळगावकरांचं नशिब काही फळफळलेलं नाही. ही सगळी नाराजी भाजपला पुढच्या काळात महागात पडण्याची शक्यता दिसून येते.

राष्ट्रवादीच्या संदर्भात बोलायचं झाल्यास दिग्गज नेते असूनही एकसंघपणा या नेत्यांमध्ये दिसून येत नव्हता. नाथाभाऊ पक्षात आल्यानंतर देखील या स्थितीत फारसा बदल झाला नाही, तथापि, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे नेते एकत्र आलेत, ही बाब विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण करणारी आहे. अजित पवार यांनी खडसे यांचे २४ कॅरेट सोनं म्हणून केलेला उल्लेख खडसेंसाठी आणि त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, लेवा पाटीदार समाजासाठी सकारात्मक मानावा लागेल. या विधानातून राष्ट्रवादीकडून खडसे यांना चांगले पद देण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचेही सूचित होते. भुसावळमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश आणि माजी आमदार संतोष चौधरी यांना खडसे यांच्यासमवेत जुळवून घेण्याचे दिलेले संकेत देखील या दौऱ्याच राजकीय फलित मानावं लागेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादीमध्ये उत्साहाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा निश्चित फायदा पक्षाला या निवडणुकांमध्ये होईल. तसेच महाविकास आघाडीच्या बळकटीकरणासाठी याचा फायदा होऊ शकतो. फक्त डोक्यात हवा जाऊ न देणे, ही या संभाव्य यशाची पूर्वअट असेल.

प्रत्यक्ष कुठलेही निर्णय किंवा मदतीची घोषणा अजित पवार यांनी या दौऱ्यात केलेली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाप्रमाणे एफआरपी द्यायला हवी हे पवारांचे वक्तव्य आशादायक आहे. मात्र प्रत्यक्षात या वक्तव्यासाठीची अंमलबजावणी अतिशय कठीण आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना काळात झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. उसासोबत दुधाची तुलना होऊ शकत नाही. कारण दुधाचे भाव हे फॅटप्रमाणे बदलतात. यासारख्या अजूनही बऱ्याच तांत्रिक बाबींच्या अभ्यासातून पुढे गेल्यास दुधासाठी एफआरपीचा निर्णय होऊ शकतो. तेवढी इच्छाशक्ती महाविकास आघाडी सरकारला दाखवावी लागेल. एसटीच्या कर्मचाऱ्यांना अजित पवार यांनी दिलेला इशारा सूचक असला तरीदेखील एसटी संपाची कोंडी फोडण्यात सरकारला अपयश आलेलं आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी फास्ट ट्रॅक प्रयत्न व्हायला हवेत. राष्ट्रवादीसाठी अजित पवार यांचा दौरा बूस्टर डोस ठरलेला असला तरीदेखील सर्वसामान्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही, हे मात्र नमूद करावे लागेल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com