शिवरायांच्या पुतळ्याभोवती महिलांचा वेढा ; ग्रामस्थ आक्रमक

ग्रामस्‍थ पुतळ्याभोवती जमा झाले. प्रामुख्‍याने महिला वर्ग पुतळ्याच्‍या संरक्षणासाठी पुतळ्याभोवती वेढा टाकत ठिय्या मांडून बसला. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली.
Shivaji Maharaj
Shivaji Maharajsarkarnama

-जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी जल्‍लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त धनूर (ता.धुळे) येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळा (Shivaji Maharaj)विनापरवानगी उभारण्यात आल्याने प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात वाद पेटला आहे.

शिवरायांचा पुतळा हटवू नये, यासाठी पुतळ्याभोवती धनूरमधील महिलांनी वेढा घालत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार पुतळा समितीची स्‍थापना व विविध शासकीय परवानगी घेतल्‍यानंतर पुतळा उभारणीला मंजूर दिली जात असते. परंतु, धनूर येथे विनापरवानगी छत्रपती शिवारायांचा पुतळा उभारण्यात आला. यामुळे सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्‍ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधिक्षक प्रशांत बच्‍छाव यांच्‍यासह महसूल व पोलिस प्रशासनाचा फौजफाटा शनिवारी सकाळी धनूर येथे दाखल झाला.

सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांच्‍याशी चर्चा करत त्यांना विनापरवानगी असलेला शिवरायांचा पुतळा (Shivaji Maharaj)सन्‍मानाने हटवावा, अशी सूचना उपस्थित वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी दिली. सरपंचांना त्‍याबाबत नोटीसही बजावली. चर्चेची फेरी सुरू असताना काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व राष्ट्रवादीचे जिल्‍हा परिषद सदस्‍य किरण पाटील गावात दाखल झाले. पुतळा हटविण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू असल्‍याचे समजताच; ग्रामस्‍थ पुतळ्याभोवती जमा झाले. प्रामुख्‍याने महिला वर्ग पुतळ्याच्‍या संरक्षणासाठी पुतळ्याभोवती वेढा टाकत ठिय्या मांडून बसला. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली.

शनिवारी (१९ फेब्रुवारी) रात्री दहापर्यंत सलग ठिय्या आंदोलन सुरू असताना सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांनी सोमवारी ग्रामसभा बोलावून पुतळ्याबाबत होणारा निर्णय महसूल व पोलिस प्रशासनाला कळविला जाईल, अशी भूमिका जाहीर केली.

Shivaji Maharaj
नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश ; स्फोटक साहित्य जप्त

तीन हजार लोकसंख्‍येचे धनूर गाव आहे. शेतीवर अर्थकारण असलेल्‍या या गावात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) मध्‍यरात्रीनंतर काही अज्ञात व्‍यक्‍तींनी अश्‍वारूढ शिवरायांचा पुर्णाकती पुतळा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी उभारला. हा प्रकार शनिवारी सकाळी महसूल व पोलिस प्रशासनाच्‍या निदर्शनास आला.

आज (रविवारी) पोलीस व एसआरपीचा ताफा सकाळी धनूर येथे दाखल झाला. ही वार्ता गावात पसरताच महिला वर्ग व ग्रामस्‍थ पुन्‍हा संघटीत झाले. त्‍यांनी पुतळ्याला वेढा घालत ठिय्या मांडला. या पाठोपाठ आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद सदस्‍य किरण पाटील व समर्थकांनी या ठिय्या आंदोलनात उडी घेतली. त्‍यांनीही पुतळ्याभोवती आंदोलनातून वेढा घातला. या स्थितीमुळे पोलिसांना पुतळ्यापर्यंत पोहचणे अडचणीचे ठरले. हा वाद सुटणार नसल्‍याचे चिन्‍ह दिसू लागल्‍यानंतर पोलिसांनी आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil)यांच्‍याशी संवाद सुरू केला.

आमदार कुणाल पाटील यांनी हस्‍तक्षेप करत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवू नये, यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍याशी सोमवारी चर्चा केली जाईल; तोपर्यंत पुतळा हटवू दिला जाणार नाही, अशा भूमिकेतून धनूरच्‍या ग्रामस्‍थांना अश्वस्त केले. त्‍यानंतर आज दुपारी पावणेदोनला जमावाला पांगविण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे गावात दाखल झाले. त्यांनी पुतळ्यासाठी खासदार निधीतून दहा लाखांचा निधी देण्याचे घोषित केले. त्‍याआधी जिल्‍हा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, मराठा संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले होते. ग्रामस्‍थांनी नियमांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com