लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट बांधावर!

जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत.
Collector Manisha Khatri at Farm
Collector Manisha Khatri at FarmSarkarnama

शहादा : जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सारेच प्रमुख अधिकारी रस्त्यावर उतरून थेट शेताच्या बांधावर, वाड्या, वस्ती, रस्त्यावर लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबवून लसीकरणाचे प्रमाणपत्रही तपासण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) स्वतः रस्त्यावर उतरून मोहीम फत्ते करण्यासाठी सरसावले असल्याचे पाहून अनेकांची तारांबळ उडाली.

Collector Manisha Khatri at Farm
धक्कादायक; देश शोकमग्न असताना चित्रा वाघ जल्लोषात सहभागी होत्या!

लसीकरणाबाबत जिल्ह्याच्या राज्यात शेवटचा क्रमांक लागत असल्याने पुढील संभाव्य धोका ओळखून लसीकरणाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्ह्यात ८ ते १० डिसेंबरदरम्यान कोविड विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून लसीकरणाबाबत नागरिकांना आवाहन केले. त्यासोबतच लसीकरण करून घेतल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी केली.

Collector Manisha Khatri at Farm
मार्च महिन्यात नाशिक महापालिकेतून सत्ताधारी भाजपचे पॅकअप?

वाहनांची तपासणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नव्याने आलेल्या ओमिक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान बुधवार (ता. ८)पासून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील लसीकरण कॅम्पला भेट देण्यासाठी निघालेल्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अचानक कोळदा-खेतिया मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांना थांबवून कोविड लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली. दरम्यान, रस्त्यावर वाहनांची अचानक होणारी तपासणी पाहून काही जणांनी गाडी माघारी फिरवून घरीच जाणे पसंत केले.

थेट शेतात अन्‌ मजुरांशी संवाद

दरम्यान, या वेळी जिल्हाधिकारी खत्री यांनी डामरखेडा (ता. शहादा) येथील एका कापसाच्या शेतात मजूरवर्ग कापसाची वेचणी करत असल्याचे पाहून थेट त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. त्या वेळी त्यांच्यासमवेत शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

शहादा शहरात भेट

दरम्यान, शहादा शहरात सुरू असलेल्या लसीकरण कॅम्पची पाहणी जिल्‍हाधिकाऱ्यांनी केली. तसेच बाजारपेठेत असणाऱ्या नागरिकांशी लसीकरणाबाबत संवाद साधून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. या वेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---

लसीकरणाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी सर्वच अधिकारी जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले असून, नागरिकांनी सहकार्य करून लसीकरण करून घ्यावे.

-मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com