
नाशिक : हनुमान चालिसा वाचायचीच असेल तर तुमच्या घरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात जाऊन वाचायची गरज काय? उगाच खाजवून खरूज कशासाठी काढत आहात? कशाला कुणाला खिजवता? असा सवाल करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhangan Bhujbal) यांनी राणा दाम्पत्यांना फटकारले आहे. याचवेळी त्यांनी संतापलेले शिवसैनिक महाप्रसाद देण्याची वाट पाहत असल्याचेही म्हटले आहे. शिवसेनेच्या महाप्रसादात बुक्कांबा, लाथाटकी आणि बुक्काकोट असतो. त्यामुळे शांततेनं घ्या, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत असून राणा दाम्पत्यांचा कोणाच्यातरी सांगण्याने हे सर्व करत असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. राणा दाम्पत्यांनी आपल्या घरात हनुमान चालिसा वाचावी, मुंबईत आणि अमरावतीत हनुमानाची अनेक मोठी मंदिरे आहेत तिथे जाऊन हनुमान चालिसा वाचावी, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्यात काय अर्थ, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. आरती हनुमान चालिसा वाचून झाली की महाप्रसाद द्यावा लागतो, तो महाप्रसाद राणा दाम्पत्यांना द्यायचा असल्याच ते सांगत आहेत. मी एकाला फोन करुन विचारलं कसला प्रसाद देणार तर त्याने सांगितलं की, लाथापेटी आहे, बुक्कांबा आहे, बुक्काकोट पण आहे, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. राणा दाम्पत्य आले की त्यांना ते द्यायचे आहेत मी त्यांना म्हटलं की, शांततेने घ्या आणि शांतकके प्रसादही शांततेने द्या म्हटलं, असा मिश्किल टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
शिवसेनेला डिवचून भाजपला कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करायची आहे, महाराष्ट्र सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं कुणाच्या तरी घरावर जायचं आणि तमाशा केला तर लोकं कशी गप्प बसतील. शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणारच. आमच्या घरावर विरोधकांनी येऊन तमाशा करणे आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे शांततेने राजकारण करायला हवं. रोजगार, महागाई शिक्षण हे या देशातील हा महत्त्वाचे मुद्दे असताना देशात काय चाललंय, देशात उगाच दंगली भडकवण्याचं काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी केला आहे.
राणा दाम्पत्य शिवसेनेला खुलं आव्हान देण्याचा प्रयत्न करत असून केंद्र सरकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. ही हुकूमशाही आहे. नबाव मलिक बोलले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर हल्ला केला, आता मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत मजल गेली. घरावर जाऊन दंगली करण्याची ही कसली लोकशाही? भाजपच्या पाठबळाशिवाय त्यांची असं करायची हिंमत नाही. भाजपचा पाठिंबा असल्याने त्यांनी धाडस होतं. राज्यात त्याचं सरकार नाही म्हणून हे सुरू आहे. हा राज्य अस्थिर करण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही भूजबळांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.