भाजपला लाज वाटली पाहिजे; सुप्रिया सुळेंनी सुनावले

Supriya Sule| BJP| MNS| भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.
भाजपला लाज वाटली पाहिजे; सुप्रिया सुळेंनी सुनावले
Supriya Sule

NCP latest news update

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जागरण गोंधळ घालण्यात आला. यावेळी महागाईची प्रतिकात्मक तिरडीही बांधण्यात आली. तर त्यांनी सोमवारी (16 मे) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागावडे यांना झालेल्या मारहाणीचाही समाचार घेतला.

''काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी महागाईच्या मुद्द्यावर त्यांना भेटू इच्छित होत्या. त्यांना स्मृतीजींना निवेदन द्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना भेट नाकारली. बालगंधर्व सभागृहातून त्यांना बाहेर नेत असताना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्याने आपल्या एका भगिनीवर हात उचलला. सर्वांनी व्हिडीओ पाहिला आहे. आज आमची महिला भगिनी हॉस्पिटलमध्ये आहे. हाच यांचा पुरूषार्थ आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. महिलांचा मानसन्मान झालाच पाहिजे. हिम्मतच कशी झाली त्या पुरूषाची एका महिलेवर हात उगारायची. त्यांच्या पक्षाला लाज वाटली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Supriya Sule
मुंबई, कोकणातल्या निवडणुका लांबणार; इतर पालिका, झेडपीच्या निवडणुका जून-जुलैमध्येच

महागाई इतकी वाढली आहे की, गेला महिनाभर आमच्या घरात लिंबू सरबत बनत नाही. आम्ही केंद्रात सत्तेत असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रुपये इतका होता. तेव्हा मोदीजी म्हणायचे "बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार मोदी सरकार". आता गॅस सिलिंडरचे दर १००० रुपये झाले आहेत. त्यामुळे "बहुत हो गयी महगाई की मार, अबकी बार किसकी सरकार?" असा सवाल सुप्रियाताईंनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

देशात महागाईऐवजी जानेवारी महिन्यात हिजाबचा मुद्दा उचलला गेला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्सचा प्रचार केला गेला, मार्च महिन्यात भोंगे, लाऊडस्पीकर आले, एप्रिल महिन्यात हनुमान चालिसा गायली गेली आणि आता मे महिन्यात ज्ञानवापी मंदिराचा मुद्दा उचलला जात असल्याचे सुप्रिया म्हणाल्या.

केंद्र सरकारने एक लक्षात ठेवावं की, कोरोना काळात कोणताही माणूस उपाशीपोटी मृत्यू पावलेला नाही. याचं सर्वात जास्त श्रेय हे शेतकऱ्याला जातं. कोरोना काळात लोक शहरांऐवजी गावाकडे पळत होते. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे. आमचीही चर्चेची तयारी आहे. मात्र ऊठसूट तुम्ही महाराष्ट्र सरकारवर टीका करत असता, असे सुप्रियाताई म्हणाल्या.

तर माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी सांगितले की, देशात कायदा सुव्यवस्था बिघडली की आर्थिक व्यवस्था बिघडून जाते. संपूर्ण देशात अशी अराजकता निर्माण झाली आहे. देशात महागाई आणि कायदा सुव्यस्था कुठे गेली याचा विचार न करता मुख्यमंत्र्यांच्या घरात हनुमान चालिसा वाचण्याचा आग्रह धरतात. देशात अराजकता निर्माण करण्याच्या धोरणाला भाजपचे शंभर टक्के संरक्षण आहे, असा आरोप गुजराथी यांनी केला. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राष्ट्रवादीचे आहेत. आपण एकत्रितपणे केंद्र शासनाशी मुकाबला करू, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in