उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे धुळ्यातील राष्ट्रवादी विस्ताराचे आव्हान!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपाय होतील ही अपेक्षा
Dy CM Ajit Pawar
Dy CM Ajit PawarSarkarnama

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) स्थानिक स्तरावरील वाढत्या कुरबुरी, तक्रारींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. आता त्यांनीच हस्तक्षेप करत जिल्ह्यात पक्षाची वाढ का खुंटली, यामागची कारणे जाणून काय त्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

Dy CM Ajit Pawar
डीपीडीसी बैठक; कोरोनाने भुजबळ-कांदे वादाची हवाच काढून घेतली!

पक्षाचे काही वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री, नेतेमंडळी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आली तरी धुळ्याकडे का फिरकत नाहीत, यावर स्थानिक पातळीवर आत्मचिंतन होण्याची गरजही कार्यकर्ते व्यक्त करतात. राष्ट्रवादीत नवे-जुने असा वाद लपून राहिलेला नाही. यात एका गटाला आजही भाजपमध्ये गेलेले आणि पूर्वाश्रमीचे पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा दुसऱ्या गटावर ताबा असल्याचे वाटते. त्यामुळे कदमबांडे समर्थकांना कार्यकारिणीत स्थान देऊ नये, असा आग्रह संबंधित गटाकडून धरला जातो. असा समज मात्र दुसऱ्या गटाकडून खोडण्याचा प्रयत्न होतो. अशा समज-गैरसमजाच्या फेऱ्यात पक्ष अडकल्याने त्याची वाढ खुंटल्याचे एक कारण कार्यकर्ते मांडतात. याविषयी एकदा सोक्षमोक्ष लावला जावा, असे त्यांना वाटते.

Dy CM Ajit Pawar
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच, धर्मभास्करला लाजवेल असा ५० कोटींचा घोटाळा!

एकाच व्यासपीठाचा अभाव

साक्री नगरपंचायत, जिल्हा बँकेसह जिल्हा परिषदेच्या १५ जागा, महापालिका प्रभाग क्रमांक पाचची पोटनिवडणूकही नुकतीच झाली. त्यात राष्ट्रवादीचे काही स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील कुठलेही नेते, पदाधिकारी, मंत्री प्रचारासाठी फिरकले नाहीत. परिणामी, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि स्थानिक पातळीवर निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय याविषयी संभ्रमावस्था कायम राहिल्याचे कार्यकर्ते सांगतात. वाद गटातटाचे आणि भरडले जातात सामान्य कार्यकर्ते, वेठीस धरला जातो जिल्हा आणि त्यामुळे पक्षात कुणी येण्यास उत्सुक दिसत नाहीत, आले तरी एका व्यासपीठाअभावी स्वागत कुणी करावे, असा प्रश्न‍ अनुत्तरित राहतो. त्यामुळेही पक्षाची वाढ खुंटत असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते.

जनहितासाठी पाठपुरावा कुठे?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यात अनेक प्रमुख खाती राष्ट्रवादीकडे असताना त्याचा लाभ जिल्ह्याच्या पदरात पाडून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील किती पदाधिकारी प्रयत्नशील असतात हाही एक प्रश्‍न आहे. उदाहरणादाखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन मंत्रालयाचा कारभार आहे. त्यात जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २१० कोटींचा नियतव्य मंजूर असून, पैकी ६३ कोटींचा निधी कोरोनासंबंधी उपाययोजना, आरोग्य बळकटीकरणासाठी खर्च करायचा आहे. हा निधी एप्रिलपासून अद्याप पुरेशा प्रमाणात खर्च होऊ शकलेला नाही. एकिकडे ‘सिव्हिल’ला आयसीयू, जिल्ह्याला पुरेशी व्हेंटिलेटर नाहीत, तसेच आरोग्याच्या विविध गंभीर समस्या आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नाही; परंतु नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य होण्यासाठी पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसते.

जनहितासाठी ६३ कोटींचा निधी खर्च होण्यासाठी नियोजन विभाग, पालकमंत्र्यांवर दबाव आणण्याचा किंवा उपमुख्यमंत्री पवार यांच्यामार्फत यंत्रणेला सक्त सूचना देऊन या निधीच्या विनियोगासाठी एखाद्या पदाधिकाऱ्याकडून पाठपुरावा झाल्याचे तूर्त ऐकिवात नाही. जिल्ह्यात आपला पक्ष स्थिरस्थावर, प्रबळ होण्यासाठी मतभेद व मनोभेद विसरून सर्व पदाधिकाऱ्यांना संघटितपणे काम करावे लागेल, असा मोलाचा सल्ला कार्यकर्ते देतात.

---

अजित पवारांवर मदार

विविध समस्यांबाबत जनआक्रोशात आपला पक्ष किती ताकदीने सहभागी आहे आणि सत्तेच्या माध्यमातून जनआक्रोशाची तीव्रता कशी कमी करता येऊ शकेल यावर राष्ट्रवादीत चकार शब्द कुणी काढताना दिसत नाही. मग पक्षाची वाढ खुंटणार नाही तर काय, असा प्रश्‍न सतावत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. यासह पक्षांतर्गत कुरबुरींवर नियंत्रणासाठी, एकमेकांविरुद्धच्या तक्रारी रोखण्यासाठी पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ते पक्षाला जिल्ह्यात स्थिरस्थावर कसे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in