बाजार समित्या; मुख्यमंत्री राष्ट्रवादीला खिंडीत गाठणार?

बाजार समितीतील सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली.
Chhagan Bhujbal & Girish Mahajan
Chhagan Bhujbal & Girish MahajanSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत (APMC elections) शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याची मुभा मिळाली आहे. यामध्ये (Congress) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यातील बाजार समित्यांरूपी धरणांना गळती लावण्यासाठीची धूर्त व्यूहरचना या सरकारनं (Eknath Shinde Government) केल्याचं म्हटलं जात आहे. असे असले तरीही राज्यातील सत्ताधाऱ्यांना ही सत्ता सहजासहजी मिळवणे शक्य नाही, असे चित्र आहे. (Eknath Shinde given a right of candidature to farmers in APMC election)

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
राष्ट्रवादीच्या नेत्याचं गाव फोडून शेजारच्या झेडपी गटाला जोडले!

शेतकऱ्यांना मतदानाच्या अधिकारासाठी आवश्‍यक पूर्तता करण्यात वेळ दवडल्यानं हा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी युद्धपातळीवर अध्यादेशाची तयारीही करण्यात आली आहे. वरकरणी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे, असे दर्शविणारा असला तरी यातील शुद्ध राजकीय डाव लपुन राहिलेला नाही.

Chhagan Bhujbal & Girish Mahajan
माजी आमदार विनायक निम्हण यांच्या मातोश्री सावित्री निम्हण यांचे निधन!

किमान एक-दोन तरी अपक्ष आपले निवडून आणून नंतर साम, दाम, दंड, भेद वापरून बाजार समित्या ताब्यात मिळविण्यासाठीची रणनीती म्हणून याकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांआधी या निवडणुका असल्यानं अनेकांनी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकांत डावपेच आखण्यास सुरवात केली आहे.

खानदेशातील ३४ बाजार समित्यांसह राज्यातील बाजार समित्यांच्या प्रलंबित निवडणुकांचा बिगुल एकदाचा वाजला. त्यासाठी प्राथमिक प्रक्रिया म्हणून मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना मतदानाच्या अधिकाराच्या घोषणेमुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. मात्र सरकारनं त्यासाठी आवश्‍यक कायदेशीर पूर्तता न केल्यानं त्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर होऊ शकलं नाही. त्यामुळे सरकारनं हा तातडीचा मार्ग म्हणून सभासद नसलेल्या, पण शेतकरी असलेल्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देऊ केला आहे. यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी बाजार समितीची निवडणूक लढविण्याची आणि जिंकण्याची धमक फक्त सधन शेतकरीच दाखवू शकतील, हे उघड आहे. हे सधन शेतकरी म्हणजे सोसायटी, ग्रामपंचायतीत पराभूत झालेले मातब्बरच असतील. यातील एखाददुसरा निवडून आला तरी त्याला आपल्याकडे खेचून त्याच्या माध्यमातून बाजार समितीची सत्ता मिळवायची किंवा तिला सुरुंग तरी लावायचा, हा सत्ताधाऱ्यांचा डाव असू शकतो. यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणत त्यांना खिंडीत गाठण्याची तयारी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे, हे स्पष्ट आहे.

खानदेशातून बाजार समितीमध्ये जामनेरसह तीन बाजार समित्या वगळता सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचीच सत्ता होती. सध्या त्यांच्यावर प्रशासकाची नियुक्ती आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपला ग्रामीण भागात पाय मजबूत करण्यासाठी बाजार समित्यांच्या सत्तेची गरज आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे शेतकरी निवडणूक लढवू शकतो, हे गाजर दाखवून त्या माध्यमातून आपल्या सधन पदाधिकाऱ्यांची सोय लावणे आणि त्यातून प्रसंगी सत्ताही काबीज करणे, अशी रणनीती यामागे स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रत्येक तालुक्यातील बाजार समित्यांसाठी निवडणूक होत असल्याने तालुक्यातील आजी-माजी आमदारांचे गट सक्रिय झाले आहेत. पालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी बाजार समितीच्या निवडणुका होणार असल्यानं याकडे राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणूनही पाहिलं जात आहे. राजकीय अस्थिरता बघता विधानसभेच्या निवडणुकादेखील होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे आपल्या बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेत्यांची अस्तित्वाची लढाई राहणार आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणूक असली तरी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनही याकडे पाहिले जाणार आहे, नव्हे ती असेलच, असे राजकीय वातावरण आहे.

खानदेशात नंदुरबारची बाजार समिती ही माजी आमदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या, तर शहादा बाजार समिती भाजपचे दीपक पाटील यांच्या ताब्यात होती. जामनेरची बाजार समितीही मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखील भाजपच्या ताब्यात होती. याव्यतिरिक्त सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या सत्ताकेंद्राला सुरुंग लावण्यासाठी सत्ताधारी भाजप पडद्यामागून खलबतं करणार, हे निश्‍चित आहे. धुळे बाजार समितीवर उद्योजक सुभाष देवरे यांची, तर शिरपूर बाजार समितीवर आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गटाची सत्ता होती. त्यामुळे आहे ती कायम ठेवत काँग्रेसच्या ताब्यात समित्या आपल्याकडे घेण्यासाठी भाजपला हा ‘शेतकरी’ कामाला येणार आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी नाकारलेल्यांना रसद पुरविण्याची संधी भाजपला मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात नांदगाव बाजार समितीत आमदार सुहास कांदे विरोधात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र येऊन पॅनल देऊ शकतात. कळवणमध्ये राष्ट्रवादी महाविकास आघाडीची मोट बांधून रिंगणात उतरू शकते. त्याविरोधात भाजप पॅनल देणार का, याकडे लक्ष लागले आहे. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे नेमकी काय भूमिका घेणार? यावर लढतीचे चित्र असणार आहे. देवळा, घोटी, मनमाड बाजार समितीत तेथील स्थानिक आघाड्या, नेते पॅनल करून लढू शकतात.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्चस्व आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी त्यांना टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न केला. बंद पडलेला नाशिक साखर कारखाना सुरू केल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा सहकारक्षेत्रात शिरकाव झाला आहे. कारखान्यांपाठोपाठ आता गोडसे बाजार समितीच्या निवडणुकतही पॅनल उतरविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान विरुद्ध माजी खासदार, यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. पिंपळगाव बाजार समितीवर आमदार दिलीपराव बनकर यांची एकहाती सत्ता राहिलेली आहे. गत निवडणूक तर त्यांनी बिनविरोध करत आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, आता राजकीय चित्र पालटले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांपासून दूर असणारे त्यांचे विरोधक माजी आमदार अनिल कदम यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत बनकर विरुद्ध कदम, असाच सामना होण्याची शक्यता आहे. लासलगावमध्येही पंढरीनाथ थोरे विरुद्ध जयदत्त होळकर, असा सामना रंगू शकतो. सिन्नरमध्ये कोकाटे विरुद्ध वाजे या पारंपरिक लढतीत नवा भिडू येऊ शकतो. येवल्यातही माजी मंत्री छगन भुजबळ विरुद्ध आमदार दराडे, असा सामना होईल. शिवाय भाजपचेही पॅनल असेल. त्यामुळे एरवी बिनविरोध होणारी ही निवडणूक एकूणच बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांची कसोटी पाहणारी ठरू शकेल, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in