चित्रा वाघ, शेलारांचा फुसका बार : सावरकरांविषयीचे ते वक्तव्य शिवसेनेचे नव्हेच!

माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? (‘Are we Savarkar to apologise?’)
Chitra wagh-ashish shelar-priyanka chaturvedi
Chitra wagh-ashish shelar-priyanka chaturvediSarkarnama

दिल्ली : "निलंबित १२ खासदारांनी माफी मागितली, तर निलंबन मागे घेवू" अशा प्रस्तावाची मागच्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र आम्ही माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका या खासदारांनी घेतली आहे. दूसऱ्या बाजूला याच माफी प्रकरणावरून महाराष्ट्रात वेगळ्याच राजकारणाला सुरुवात झाली आहे. मात्र याच राजकारणात चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) या भाजप नेत्यांची टीका फुसका बार निघाला आहे.

या १२ निलंबित खासदारांनी "माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का?" असे वक्तव्य केल्याचा मथळा असलेली बातमी ३० नोव्हेंबर रोजी इंग्रजी भाषिक 'द न्यूज मिनीट' या माध्यमाने दिली. त्यानंतर या १२ निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेचे (Shivsena) २ खासदार असल्याने सावकरांविषयीचे हे वक्तव्य शिवसेनेनेच केले असल्याच्या चर्चांना सोशल मिडीयावर सुरुवात झाली. मात्र त्याचवेळी सेनेच्या निलंबित खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी यावर हे वक्तव्य आपण किंवा आपले सहकारी आणि शिवसेनेचे दुसरे निलंबित खासदार अनिल देसाई यांनी केले नसल्याचा खुलासा केला. त्याबाबत त्यांनी ट्विटही केले.

प्रत्यक्षात बातमी पुर्ण वाचल्यानंतर हे वक्तव्य केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे निलंबित खासदार बिनोय विश्व (Binoy Viswam) यांनी केले असल्याचे दिसून येते. ते म्हणाले होते, माफी मागायचे कोणतेही नियोजन नाही. माफी मागायची तर कशाबद्दल? माफी मागायला आम्ही काय सावरकर नाही. माफीचे पत्र लिहीण्याची आपली संस्कृती नाही.

मात्र त्यानंतरही काल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका करणारे ट्विट केले. त्या म्हणाल्या शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील प्रेम किती बेगडी आहे हे यातून दिसून येते. काँग्रेसची मर्जी राखण्यासाठी सावरकरांचा अपमान केला जात आहे. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना सावरकर विरोधी बनली आहे. राज्यात दारू स्वस्त केल्यानंतर सत्ताधा-यांमध्ये हा बदल दिसून येत आहे. यावर चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ आपले राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हा अट्टाहास करत असल्याचे म्हटले.

त्यानंतर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही शिवसेना आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, कोण या प्रियांका चतुर्वेदी महोदया? खासदारकीसाठी कुठल्या पक्षातून कुठे आल्या? कशाला सावरकरांशी तुलना करताय? किती माहिती आहेत, सावरकर तुम्हाला? सावरकर प्रेमी शिवसैनिक किती ओळखतात तुम्हाला? हिंदुहृदयसम्राट तरी कळलेत का? आता तुम्ही महाराष्ट्राला स्वा. सावरकर शिकवणार का? असा सवालही त्यांनी विचारला.

मात्र या सगळ्या प्रकारानंतर प्रत्यक्षात 'द न्यूज मिनीट'ने आज याबाबत स्पष्टीकरण देत सावकरांविषयीचे हे वक्तव्य शिवसेना किंवा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केले नसल्याचे म्हटले आहे. आपल्या मथळ्यातचे हेतुपुरस्सर चुकीचे चित्रण केले असून त्याद्वारे निलंबित करण्यात आलेले अनेक राज्यसभा खासदार ऑनलाइन ट्रोल्सच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही ट्रोलर्सनी हेतुपुरस्पर खासदारांवर टीका केली विषेशतः खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर. मात्र त्यांनी अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले नसून त्यांच्यावर होणारी ट्रोलिंग कमी करण्यासाठी आम्ही मथळा बदलला आहे.

एकूणच 'द न्यूज मिनीट' या माध्यम समूहाच्या या खुलाश्यानंतर सावरकरांविषयीचे ते वक्तव्य शिवसेना किंवा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चित्रा वाघ आणि आशिष शेलार यांचा टीकेचा हा बार फुसका निघाला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर चतुर्वेदी यांनी शेलारांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com