पुण्यात महापौर आमचाच होणार; संजय राऊतांचा पुनरुच्चार...

शिवसेनेच्या (shivsena) या निर्धारामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात महापौर आमचाच होणार; संजय राऊतांचा पुनरुच्चार...
mp Sanjay Rautsarkarnama

पुणे : मुंबई, ठाण्यातील महानगरपालिकांनंतर शिवसेनेने (shivsena) आपला मोर्चा आता पुणे-पिंपरी चिंचवड (pune pimpri-chinchwad) या शहरांकडे वळवला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या शहरांमध्ये पुढचा महापौर आमचाच असेल असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी अवघ्या महिन्याभराच्या आत दुसऱ्यांदा केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय गणित बदललेली असतील, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न करू. पण पुढचा महापौर आमचाच असेल. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचा महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा आहे.

महाराष्ट्रात सध्या ठाकरे- पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. हा महाराष्ट्रातील चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकते हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचे विभाजन होऊ देणार नाही. पण पुण्यात शिवसेनेचा महापौर आत्तापर्यंत झालेला नाही याची खंत आहे, पण तो यावेळी पाहायला आवडेल, असेही सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.

26 सप्टेंबरला राऊत यांची स्वबळाची भाषा

26 सप्टेंबरला पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात बोलताना संजय राऊत म्हणाले होते की येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसे राज्यात आहोत. आपण इतकीच माफक अपेक्षा करत आहोत. राज्यात महाविकास आघाडी आहे, मग महापौर पदाची आपण इच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकले? आता संवाद साधू, आले तर सोबत. नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, पण पुण्यात आपलाच महापौर होईल.

mp Sanjay Raut
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? ः संजय राऊत

शिवसेनेच्या निर्धारामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले?

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बसवण्याचा शिवसेनेने निर्धार केला आहे. मात्र शिवसेनेच्या या निर्धारामुळे राष्ट्रवादीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन्ही जुळी शहरे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जातात. फडणवीस सरकारच्या काळात प्रभाग पद्धतीतील बदल व अन्य कारणांमुळे इथली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. मात्र आता ही दोन्ही शहरे पुन्हा मिळविण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून स्वत: अजित पवार सक्रिय झाले आहेत. पण आता त्याचवेळी राज्यात सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेनेही पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बनविण्याचा निर्धार केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in