त्यांचे आयुष्य स्वप्न बघण्यात जावो; राऊतांच्या फडणवीसांना शुभेच्छा...

महाविकास आघाडीच्या नवाब मलिक, (navab malik) सचिन सावंत (sachin sawant) अशा अनेक नेत्यांनी त्यांच्यावर खोचक पद्धतीने टीका केली होती.
त्यांचे आयुष्य स्वप्न बघण्यात जावो; राऊतांच्या फडणवीसांना शुभेच्छा...
Sanjay Raut News, Devendra Fadnavis .jpgsarkarnama

"मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते" या विधानावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) सध्या चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. काल बेलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नवाब मलिक, (navab malik) सचिन सावंत (sachin sawant) अशा अनेक नेत्यांनी त्यांच्यावर खोचक पद्धतीने टीका केली होती. आता फडणवीसांच्या याच विधानाला आपल्या शेलक्या शब्दांसाठी प्रसिद्ध असणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत म्हणाले, लोकांना कधीकधी वाटते, अजून यौवनात मी. असे एक नाटक रंगमंचावर चांगलेच गाजले होते. ते चिरतरुण नाटक होते. त्याचप्रमाणे अनेकांना वाटते की 'अजूनही यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री.' आम्हाला देखील कधीकधी दिल्लीत गेल्यानंतर वाटत असते आमचाच पंतप्रधान (prime minister) होणार, असेही म्हणायला राऊत विसरले नाहीत.

"देवेंद्र फडणवीस यांच्या भावना योग्य आहेत. माणसाने स्वप्नात रममाण व्हावे. चांगली स्वप्न पाहावीत. स्वप्नांना बळ असावे, त्यांच्या पंखात अधिक ताकद आणि आकाशात उडण्यासाठी त्यांना बळ यावो, त्यांचे आयुष्य ही स्वप्न बघण्यात जावो", असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच विरोधी पक्षनेत्याला आम्ही नेहमी शॅडो चीफ मिनीस्टर म्हणतो. या सावलीत त्यांनी कायम राहावे अश्या शुभेच्छा देखील राऊत यांनी दिल्या.

काल बेलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्या पदावर आहे, हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे एक दिवसही घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे, सामान्य जनतेची कामे करतो आहे. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत, त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते.

Related Stories

No stories found.