
Congress President Post: नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. तांबे थोरात आणि पटोले यांच्यातील वादाचे पडसाद थेट दिल्ली दरबारी हायकमांडपर्यंत उमटले आहेत. मात्र,यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेसमधीलच एका नाराज गटानं मोठी आघाडी उघडल्याचीही जोरदार चर्चा आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळी स्पष्टपणे समोर आलेली पाहायला मिळाली आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट शुक्रवारी(दि.१०) दिल्लीला जाणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधातील पक्षांतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पटोलेविरोधातील असंतुष्ट गट शुक्रवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. यात काँग्रेसचे २ माजी खासदार, ४ माजी आमदार यांच्यासह एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले आहे. मराठवाड्यातील पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणूगोपाल यांची दिल्ली दरबारी भेट घेणार आहेत. यावेळी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी हा गट करणार असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस(Congress) मधील अंतर्गत वाद चर्चेत आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडने या नाराजी नाट्याची गंभीर दखल घेतली. यानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयार केलेला अंतिम अहवाल २६ फेब्रुवारीला रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर केला होता.
पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा...
सत्यजीत तांबे(Satyajeet Tambe) यांचे बंड आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीचे प्रकरण थंडावण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू समोर आली होती. आता नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी विदर्भातील २४ नेत्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्नीथला यांची या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यांच्याकडे पटोले यांना हटवा आणि शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी करण्यात आली.
काँग्रेस पटोलेंबाबत काय निर्णय घेणार ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील असंतुष्ट गट दिल्लीत दाखल झाला आहे. यावेळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचे विश्वासू के राजु यांची भेट घेणार आहे. तसेच पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार, नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेंलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.