
केळघर : मेढा, केळघर विभागातील ५४ गावांसाठी अत्यंय महत्वाच्या असलेल्या बोंडारवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने तातडीने मार्गी लावला पाहिजे, अशी जोरदार मागणी आज आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. शिवेंद्रसिंहराजे यांच्या या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, मागणीनुसार हा प्रकल्प जलसंपदा विभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आज शिवेंद्रसिंहराजे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून ५४ गावांचा प्रश्न मांडल्याने या गावांतून समाधान व्यक्त होत आहे. आज नागपूर येथे विधानसभेत लक्षवेधी सादर करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सभागृहाला सविस्तर माहिती दिली.आमदार भोसले म्हणाले, जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका असून तालुक्यात कोयना व कण्हेर ही दोन धरणे आहेत. मात्र पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने मेढा,केळघर विभागातील ५४ गावांतील युवक रोजगारासाठी मुंबईची वाट धरतात. गावात केवळ वयस्कर लोक राहतात. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न ही ५४गावांतील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून जाणवतो आहे.त्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्प होणे गरजेचे आहे, शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
या प्रकल्पासाठी ट्रायल पीट, रेखांकन यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. मात्र निधी उपलब्ध झाला नाही.त्यामुळे या कामासाठी जलसंपदा विभागाकडून निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी आमदार भोसले यांनी केली. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे केडंबे गाव हे ही या प्रकल्पात येते. ५४ गावांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. हा प्रकल्प सक्षमपणे मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाकडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना या प्रकल्पाच्या ट्रायल पीट व रेखांकन या कामांसाठी जलसंपदा विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. आमदार भोसले यांच्या मागणीनुसार हा प्रकल्प जलसंपदा विभागाकडून करण्यात येईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे ५४गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या बोंडारवाडी धरण प्रकल्प आमदार शिवेद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागणार असल्याने, ५४ गावांतून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.