अपक्षांवर आरोप करणाऱ्या राऊतांना शिवसेनेतील खदखद दिसेल का?

अपक्षांवर आरोप करणारे संजय राऊत शिवसेनेतील नाराजी कधी जाणून घेणार
Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder ShindeSarkarnama

सोलापूर : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) घोडेबाजार झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय शिंदे (Sanjay shinde), श्‍यामसुंदर शिंदे (Shyamasunder Shinde) आणि देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) या तीन आमदारांची नावे घेतली. राज्यसभेसाठी मतदान केलेल्या २८४ आमदारांपैकी २७ आमदार हे महाविकास आघाडीला त्यांचे मत दाखविण्यास बांधिल नव्हते. मग, या तिघांचीच नावे राऊतांनी कशी घेतली? राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असेलल्या आमदारांवर आरोप झाल्याने राष्ट्रवादी अन्‌ शिवसेनेत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. पण शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळविलेले अपक्ष आमदार शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर आणि बच्चू कडू हे तरी सरकारवर खूश आहेत का? हा खरा प्रश्न आहे. खासदार राऊत यांनी शिवसेनेकडे विशेषता ग्रामीण भागातील शिवसैनिकांकडे याबाबत माहिती घेतल्यास वास्तव त्यांना नक्कीच कळेल. (When will Sanjay Raut know the displeasure in Shiv Sena's MLA?)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भेटत नाहीत, सरकारमध्ये आमची कामे होत नाहीत, अशी खदखद शिवसेनेच्या बाणावर विजयी झालेले अनेक आमदार खासगीत व्यक्त करतात. शिवसेनेच्याच आमदारांची कामे मार्गी लागत नसतील तर अपक्ष व लहान पक्षांचे आमदार तुम्हाला का बांधिल राहतील? याचाही शोध या निमित्ताने घेण्याची आवश्‍यकता आहे. मतदारांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी अपक्ष आमदार सत्तेचा लाभ मतदारसंघापर्यंत येनकेन प्रकारे नेण्याचा प्रयत्न करतात. कामे मार्गी लावण्याची धमक उपमुख्यमंत्री पवार यांच्यात असल्याने महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या आमदारांसह विरोधी पक्षातील अनेक आमदार त्यांच्याकडे हक्काने जातात.

Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
भगिरथ भालकेंच्या अडचणीत वाढ : विठ्ठल परिवारात २० वर्षांनंतर फूट!

खासदार राऊत यांनी जरी त्या तीन आमदारांची नावे घेतली असली तरी त्याचा संशय अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याची चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकेकाळी शिवसेनेचे तीन ते चार आमदार विधानसभेत जात होते. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये जिल्ह्यातून फक्त एकच आमदार विधानसभेत गेला आहे. हा आमदारदेखील काठावर पास होऊन जात आहे. करमाळ्यातून २०१४ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर आमदार झालेले नारायण पाटील यांची २०१९ मध्ये उमेदवारी कापली गेली, उमेदवारी कापण्यात कोण-कोण होते, याची माहिती माजी आमदार पाटील यांनी अनेकदा दिली आहे. जिल्ह्यात सध्या असलेले सेनेचे एकमेव आमदार शहाजी पाटील आगामी काळात भाजपमध्ये दिसतील? ही चर्चा व शक्यता अनेक महिन्यांपासून सुरू आहे. शिवसेनेला त्यांचे आमदार, माजी आमदार आणि नेते का टिकविता येत नाहीत? पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असूनही अनेक जण शिवसेनेला जय महाराष्ट्र का करत आहेत? याचा शोध राऊत घेतील काय, असा प्रश्न आहे.

Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
राष्ट्रवादीच्या आमदारांना अजितदादांच्या कार्यालयातून फोन; ‘शनिवारी मुंबईत पोचा’

तिकिट वाटपात ऐनवेळी घोळ कसा हेातो?

दीपक गायकवाड, धनंजय डिकोळे, साईनाथ अंभगराव यांच्यासह अनेक जुने शिवसैनिक सध्या कुठे आहेत? विधानसभेच्या तिकिट वाटपात शिवसेनेत ऐनवेळी कसा घोळ होतो? ज्याने तयारी केली, त्याचा पॉलिटिकल गेम कसा केला जातो? याचे किस्से महेश कोठे, नारायण पाटील, नागनाथ क्षीरसागर हे सांगू शकतील. एखाद्याच्या मागे ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार कसे उभा राहतात? याचा अनुभव आमदार शिंदे यांच्यासह राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, रश्‍मी बागल या नेत्यांनीही एकेकाळी घेतला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील हाच फरक पक्षवाढीसाठी महत्वाचा ठरत आहे.

Sanjay Raut-Sanjay shinde-Devendra Bhuyar-Shyamasunder Shinde
आमदार रोहित पवारांनी केलं गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य; बारामतीत 'पॉवरफुल' भेट

संजय शिंदे पोचले संपूर्ण राज्यात

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढा तालुक्यातील भोसरे गटात २००२ मध्ये झालेला पराभव ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून अपक्ष आमदार म्हणून मिळविलेला विजय, हा आमदार संजय शिंदे यांचा प्रवास जिल्ह्याने अनुभवला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शिंदे काय करू शकतात? हे सोलापूर जिल्ह्याने अनेकदा अनुभवले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा दूध संघाचे संचालक, कुर्डुवाडी बाजार समितीचे सभापती अशा पदांवर काम करताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमदार शिंदे यांच्यावर झालेला नाही, स्वत:च्या ताकदीवर त्यांनी साखर कारखाना व सूत गिरणी उभा करून यशस्वीपणे चालवून दाखविली, त्यामुळे घोडेबाजाराच्या आरोपात आमदार शिंदे असू शकतात? यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. सोलापूर जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळख असलेले आमदार संजय शिंदे हे खासदार राऊत यांच्या आरोपामुळे मात्र महाराष्ट्राला परिचित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com