मुश्रीफ-कोरे भेट दसऱ्याला; नव्या सीमोल्लंघनाची चर्चा !
Hasan Mushrif_Vinay KoreSarkarnama

मुश्रीफ-कोरे भेट दसऱ्याला; नव्या सीमोल्लंघनाची चर्चा !

कोरे यांनी विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाला थेट विरोध दर्शवला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत लांबत चाललेली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांची बैठक आता येत्या शुक्रवारी (ता. १५ आक्टेाबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. शासकीय विश्रामगृहावर होणाऱ्या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. (Vinay Kore-Hasan Mushrif's meeting on Kolhapur District Bank elections on Friday)

कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न मुश्रीफ यांचे आहेत. तथापि काही तालुक्यांत विकास संस्था गटातूनच विद्यमान संचालकांना इच्छुकांकडून आव्हान दिले जात आहे. त्यात कोरे यांनी विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाला थेट विरोध दर्शवला आहे. यावरून आघाडीतच तणाव निर्माण झाला आहे. त्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनीही गगनबावडा तालुक्यातील विकास संस्था गटातून जोरदार तयारी केली आहे, त्याचेही पडसाद उमटू लागले आहेत.

Hasan Mushrif_Vinay Kore
अगोदर भाजपचे ठरू द्या, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ : राष्ट्रवादीचा गर्भित इशारा

या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी दोनवेळा कोरे-मुश्रीफ यांच्यात बैठक ठरली होती. पण, प्रत्यक्षात ती झालेली नाही. विनय कोरे हे पतसंस्था गटातून प्रा. जयंत पाटील, तर प्रक्रिया संस्था गटातूनच राष्ट्रवादीचेच प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासाठी आग्रही आहे. यातील प्रा. पाटील यांच्या नावाला पालकमंत्री पाटील यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) कोरे-मुश्रीफ यांची बैठक होत आहे. सायंकाळी होणाऱ्या बैठकीला पालकमंत्री पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

Hasan Mushrif_Vinay Kore
दिलीप मोहितेंचा शिवसेनेला दुसरा दणका : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे बंडखोर बनले उपसभापती

सोमवारपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार

दरम्यान, कोल्हापूरसह अन्य तीन जिल्हा बँकांच्या मतदार यादीबाबत उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणी आज पूर्ण झाली. यावरील निर्णय दोन दिवसांत दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. गुरुवारपर्यंत (ता. १४) यावरील निर्णय लागल्यास सोमवारपासून (ता. १८) कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात पुकारलेल्या संचारबंदीमुळे ठराव दाखल करता आला नसल्याच्या तक्रारी कोल्हापूरसह पुणे, सोलापूर जिल्हा बँकेच्या काही संस्थांनी थेट उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केल्या होत्या. तीन दिवसांपासून याचिकांवरील सुनावणी सुरू होती. आज सुनावणी पूर्ण झाल्यानंतर याचिका निकालावर ठेवत असल्याचे व दोन दिवसांत त्यावर निर्णय घेण्याचे न्यायालयाने जाहीर केले.

शुक्रवारपासून सलग तीन दिवस शासकीय सुट्या आहेत. त्यामुळे यावरील निर्णय उद्या किंवा गुरुवारी (ता. १४) अपेक्षित आहे. या दोन दिवसांत निकाल न लागल्यास तो थेट सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल कधी लागणार यावर कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि राज्यातील अन्य १५ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी पदावर अरुण काकडे यांची यापूर्वीच निवड झाली आहे. निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रमही तयार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर त्यात बदल करून तो जाहीर करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in