एसटी स्टँड,ग्रामीण रूग्णालयाला जमीन दिली, आज स्वातंत्र्य सैनिक,माजी आमदारांचे कुटुंब झाले बेघर

Jagannath Patskar : धडाकेबाज कामांसाठी अजित पवार यांची ओळख आहे. परंतू पाटसकर कुटुंबियांच्या कामाबाबत हा अनुभव येत नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
Jagannath Patskar, Daund News
Jagannath Patskar, Daund NewsSarkarnama

केडगाव : स्वातंत्र्य सैनिक व दौंडचे माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिका-यांना स्पष्ट सुचना देऊनही वर्षभर सुटलेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा अखेर तरी आम्हाला घरासाठी जागा मिळेल का याकडे पाटसकर कुटुंबिय डोळे लावून बसले होते. परंतू महसूल विभागातील लालफितीचा कारभार आणि राजकीय उदासिनतेमुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही. याबाबत सर्वच थरातून खेद व्यक्त होत आहे. (Jagannath Patskar, Daund News)

Jagannath Patskar, Daund News
आमदार असताना सतराशे कोटी अन् मंत्री झाल्यावर फक्त चारशे; शंभुराजेंनी व्यक्त केली खदखद

जगन्नाथ पाटसकर यांनी स्वातंत्र्य संग्रामात घरावर तुळशीपत्रे ठेवले. चार वेळा तुरूंगवास भोगला. ज्येष्ठ नेते शरद पवार व पाटसकर हे एकाच वर्षी १९६७ मध्ये आमदार झाले. पाटसकर यांनी आमदार झाले तरी त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सोडला नाही. दौंड शहरात ग्रामीण रूग्णालय व एसटी स्टँडअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या दोन सुविधा व्हाव्यात म्हणून पाटसकर यांनी उपोषण केले होते. जागेअभावी ही दोन विकासकामे प्रलंबित होती. १९९२ साली पाटसकर यांनी दौंडचे एसटी स्टँड व ग्रामीण रूग्णालयासाठी शहरालगतची स्वतःची साडेसात एकर जमीन दिली.

त्याबदल्यात त्यांना दौंड शहरात घर बांधून द्यायचे होते. १९९२ साली मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दौंड एसटी स्टँडचे भूमीपूजन झाले तेव्हा पाटसकर यांच्या घराचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र नंतर या जागेतील तांत्रिक अडचणी पुढे आल्याने पाटसकर यांचे घर आस्तीत्वात आले नाही; ते आजपर्यंत. घराच्या भूमीपूजनानंतर १५ दिवसात माजी आमदार पाटसकर यांचे निधन झाले. त्यानंतर घरासाठी पाटसकर कुटुंबियांनी अनेकदा सरकारी उंबरे झिजवले मात्र त्यांना कुणी दाद दिली नाही. मंत्रालयाला आग लागली तेव्हा 'तुमच्या जागेचा प्रस्ताव त्यात जळाला.' असे उत्तर देण्यात आले. ३० वर्षात घराची आशा दिसेना तेव्हा पाटसकर कुटुंबियांनी घराचा नाद सोडून दिला. मात्र 'सरकारनामा'ने हा प्रश्न चव्हाट्यावर आणला. गेल्या वर्षी प्रश्न पुन्हा चर्चेत आला तेव्हा सर्व थरातून खेद व्यक्त करण्यात आला. अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले.

Jagannath Patskar, Daund News
फडणवीस आधीच म्हणाले होते; सुधीरजी मला अर्थ खात्याचा अनुभव घ्यायचा आहे...

२३ जुलै २०२१ रोजी अजित पवार यांनी जिल्हाधिका-यासमवेत बैठक घेत एक महिन्यात जागेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. सुरवातीला या कामाला गती होती मात्र नंतर काम मंदावले. पवार यांनी सुचना देऊन एक वर्ष होऊन गेले तरी या कामात ठोस प्रगती अजूनही दिसत नाही. भूमी अभिलेख व नगरविकास विभागाने मात्र त्यांच्याकडील काम वेगात पुर्ण केले आहे. महसूल विभागाकडील फाईल कासवगतीने पुढे सरकत आहे. याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

पाटसकर यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या जागेच्या प्रस्तावात काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयातून दोन महिन्यांपुर्वी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे आला. हा प्रस्ताव अनेक दिवस दौंड तहसीलमध्ये धूळ खात पडला होता. सरकारनामा व पाटसककर कुटुंबियांनी अनेकदा हेलपाटे मारल्यानंतर दोन दिवसांपुर्वी हा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना या प्रस्तावाचे महत्व माहित असूनही या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Jagannath Patskar, Daund News
सुधीरभाऊंना 'वनवास' रवींद्र चव्हाण 'डार्क हॅार्स'

धडाकेबाज कामांसाठी अजित पवार यांची ओळख आहे. परंतू पाटसकर कुटुंबियांच्या कामाबाबत हा अनुभव येत नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कामात लक्ष घालतो असे प्रारंभी सांगितले होते. मात्र त्यांच्याकडूनही काही हालचाली झाल्या नाहीत. स्थानिक आमदार म्हणून राहुल कुल यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नात विशेष पाठपुरावा करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी या कामासाठी जुजबी प्रयत्न केले आहेत.

विद्यमान आमदारांना मुंबईत न मागता मोफत घरे देण्याचा विचार होऊ शकतो पंरतू एक स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे माजी आमदार या देशात बेघर आहेत. याची सल निर्णयकर्त्यांना नाही. याकामात राजकीय पातळीवर फारच निरूत्साह दिसून येत आहे. कारण पाटसकर कुटुंबियांच्या मागे मतांचा गठ्ठा नाही. त्यांच्या मागे त्यांच्या समाजाचे पाठबळ नाही. एका रेशनिंगच्या दुकानावर पाटसकर कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे. पाटसकर यांच्यासाठी लोकप्रतिनिधींचा हात धरून कोणी जाब विचारत नाही. स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सव देशभर उत्साहात साजरा होत आहे. मात्र अमृतमहोत्सवी वर्षातही पाटसकर यांची तिसरी पिढी दौंडमध्ये अजूनही भाड्याच्या घरात रहात आहे. नगरविकास विभागाची फाईल आठवड्यात पूर्तता करून दुसऱ्यांदा मंत्रालयात गेली. महसूल विभागाकडील फाईल दोन महिने दौंड तहसीलमध्ये पडून होती. कामाची कर्तव्यदक्षता आणि हलगर्जीपणा या दोन्हीही गोष्टी पाटसकर कुटुंबीयांनी या काळात अनुभवल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com