
Satara MIDC News : सातारा औद्योगिक वसाहतीत गेली २४ वर्षे महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्प बंदावस्थेत आहे. या कंपनीची ४८ एकर जागा वापराविनाच पडून असून एमआयडीसीतील अनेक उद्योजकांना आपला उद्योग वाढवण्यासाठी जागा हवी आहे. त्यामुळे बजाज कंपनीची ही वापराविना जागा शासनाने ताब्यात घ्यावी. याबाबत बजाज कंपनी आणि शासनाने योग्य ती भूमिका न घेतल्यास जनतेच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी आज जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची भेट घेऊन एमआयडीसीच्या Satara MIDC प्रश्नावर निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे सभापती ॲड. विक्रम पवार, माजी उपनगराध्यक्षा अविनाश कदम, अमोल मोहिते, फिरोज पठाण, अमित महिपाल, महेश जगताप यांच्यासह कार्यकर्ते तसेच मासचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्प सध्या बजाज यांच्या ताब्यात आहे. याची साधारण ४८ एकर जागा आहे. सातारा एमआयडीसीत एवढी मोठी जागा पडून आहे. या आधी पण बजाजच्या माध्यमातून उद्योग सुरु व्हावा, म्हणून मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. त्यांना भेटून विनंती अनेकवेळा केलेली आहे. मात्र, शासनाकडून आणि बजाजकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.
एमआयडीसीतील अनेक उद्योजकांना उद्योग वाढवायचे आहेत. परंतु तेथे जागाच नसल्याने उद्योग वाढविता येत नाही. ही जागा परत शासनाने ताब्यात घ्यावी, यासाठी सह्यांची मोहिम सुरु करून लवकरच आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसेच देगांव एमआयडीसीचे शिक्के उठले गेले आहेत. त्यामुळे आता एमआयडीसी निगडी आणि वर्णे येथे वाढवण्याची गरज आहे. येथील डोंगर भागातील १०० एकर जागेत एमआयडीसी उभी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणार आहोत.
खासदारांना ठेकेदारांची ॲलर्जी
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पाहणीवेळी खासदार उदयनराजे यांनी ठेकेदाराने ठेकेदारासारखे रहावे व काम करावे, अशा सुचना केल्या होत्या. त्या प्रश्नाबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी अजिंक्यताऱ्यावर पहायला गेलो नाही. परंतु ठेकेदार देसाई चांगले काम करत आहेत. कास रस्त्याचे काम त्यांनीच केले आहे. खासदारांना काही ठेकेदारांची ॲलर्जी आहे. ती ॲलर्जी का आहे हे मी भेट झाल्यावर त्यांना विचारेन. लोकसभेला त्यांनी कुठून लढायचे हे त्यांचे त्यांनी ठरवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसच आरक्षण देणार....
मराठा समाजातल्या तरुणांना नोकरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण देणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात आरक्षण दिले होते. मात्र, नंतरच्या सरकारच्या काळात ते टीकले नाही. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्या राजकीय आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
Edited By Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.