'ते' ठेकेदार जावई नाहीत; त्यांच्यावर तातडीने कारवाई करा : भरणे कडाडले!

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार राम सातपुते, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल तक्रार केली.
'ते' ठेकेदार जावई नाहीत; त्यांच्यावर तातडीने कारवाई करा : भरणे कडाडले!
Dattatray Bharane Sarkarnama

सोलापूर : मंजूर झालेले काम वेळेत सुरू करून पूर्ण करण्याची ज्यांची ऐपत आहे, अशाच ठेकेदारांनी (contractor) कामे घ्यावीत. काम मंजूर करून घेऊन अनेक ठेकेदार काम करत नाहीत. ते ठेकेदार काय जावई नाहीत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, असा आदेश पालकमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांना दिले आहेत. सोलापूर (Solapur)जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारींवर उत्तर देताना पालकमंत्री भरणे यांनी या सूचना केल्या आहेत. (Take action against non-performing contractors: Dattatray Bharane)

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार राम सातपुते, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल तक्रार केली. कामे मंजूर आहेत; परंतु ती सुरू होत नाहीत. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात लागेबांधे आहेत. त्यांच्यात साटेलोटे होते आणि तक्रार करूनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा आमदार सातपुते व आमदार माने यांनी उपस्थित केला. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात लागेबांधे असणे चुकीचे आहे. काम न करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री भरणे यांनी केली.

Dattatray Bharane
एकनाथ शिंदे कधीही आनंद दिघे होऊ शकत नाहीत : राजू पाटलांची टीका

बार्शीचे कार्यकारी अभियंता भेटत नाहीत, फोन घेत नाहीत. तालुक्यात मंजूर झालेली कामे सुरू करत नाहीत, याबद्दल आमदार राऊत यांनी आजच्या बैठकीत आरोपांच्या फैरी झाडल्या. कार्यकारी अभियंत्यांना समोर बोलावून या संदर्भातील खुलासा करायला लावला. जिल्ह्यात मंजूर असलेली कामे, मंजूर असून सुरू न झालेली कामे या संदर्भातील आढावा बैठक पुण्यात सीई यांच्याकडे घेतली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उपसा सुरू आहे. हप्ते दिल्याशिवाय मुरुम उपसा होत नाही, असा आरोप आमदार सातपुते यांनी केला.

Dattatray Bharane
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार!

राजेंद्र राऊतांनी केली अधिकाऱ्यांची बोलती बंद

सोलापूर ते बार्शी रस्त्यावर ज्या ठिकाणी वन विभागाची जमीन आहे, त्या ठिकाणी सात मीटरचा तर उर्वरित ठिकाणी दहा मीटर रुंदीचा रस्ता केला आहे. या कामासाठी एशियन बँकेने निधी दिला आहे. कधी नव्हे ते निधी मिळाला आहे, तुम्ही रस्ता सात मीटरचा का केलात? त्यामुळे अपघात होतील, असा प्रश्‍न आमदार राऊत यांनी मांडला. वन विभागाला पर्यायी जमीन न मिळाल्याने सात मीटरचा रस्ता केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी सांगितले. तुम्ही आम्हाला का सांगितले नाही, आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव करून पर्यायी जागा दिली असती, अशी विचारणा आमदार राऊत यांनी करताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

Dattatray Bharane
बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठा धक्का : भोरच्या सभापतींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अक्कलकोटच्या आजी-माजी आमदारांची कुरघोडी

अक्कलकोट तालुक्यातील रस्त्याचे काम अधिकाऱ्यांनी बंद केले आहे, अशी तक्रार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली. ही तक्रार करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी सभागृहात नव्हते. सभागृहात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला. खडीच्या ऐवजी ठेकेदार भुकटी वापरत आहे, निकृष्ठ रस्ता करत आहे, याबद्दल विचारणा केली तर मी आमूक नेत्याच्या जवळ असल्याचे सांगत आहे. तालुक्यातील कामांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही. ठेकेदाराला मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती आमदार कल्याणशेट्टी यांनी दिली. त्या वेळी माजी मंत्री म्हेत्रे सभागृहात नव्हते, आजी-माजी आमदारांची कुरघोडी रस्त्याच्या कामातसुद्धा दिसून आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in