
अहमदनगर - लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी भाजप व वाढत्या महागाईवर टीका करताना कविता सादर केली. भाजपवर टीका करण्यासाठी त्यांनी दूध, लोणीचे रुपक वापरले होते. यावर भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी टीका केली होती. लोकसभेतील भाषणासंदर्भात डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना व काँग्रेस पक्ष संपविण्याचे काम केल्याचा आरोप केला. ( Sujay Vikhe's criticism of Supriya Sule: Let the milk and butter remain, they have disappeared the cow )
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी काल कविता मांडली. कवितेचे विश्लेषण त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले. त्यांनी त्यांची बाजू मांडली. मी माझी बाजू मांडतो. मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात जे महावसुली सरकार चालले. यात सर्वाधिक लोणी कोणी खाल्ले असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी खाल्ले. ते फक्त लोणीच खात नाहीत. तर सर्व बायोप्रोडक्ट खातात. या पूर्वीच्या दहावर्षांच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात त्यांनी हेच केले. मात्र यावेळी त्यांनी गाय देखील गायब करून टाकली, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, जीएसटी लागला अथवा नाही हा दुय्यम चर्चेचा भाग आहे. पूर्ण मलाई व संपूर्ण लाभ घेण्याचे काम अडीच वर्षांत राष्ट्रवादीने केले. या स्थितीला खासदार सुप्रिया सुळे यांनी सादर केलेली कविता फिट बसते. या कवितेच्या अर्थाचे रुपांतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या लाभात केले तर त्याचा अर्थ महाराष्ट्राला कळेल.
खासदार सुळे या अनेक वर्षांपासून खासदार आहेत. मी त्यांचा मनापासून मानसन्मान करतो. त्या काल भाजप विरोधात बोलत होत्या त्याप्रमाणे मी सुद्धा भाजपचा खासदार म्हणून मला त्यांच्या पक्षाच्या विरोधात भूमिका मांडणे क्रमप्राप्त आहे. त्या योग्य की मी योग्य हे जनता ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सरकार बदलल्यामुळे राज्यात आता कुठे स्थैर्य पहायला मिळेल. सत्ता परिवर्तन झाले नसते तर आगामी अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात काहीच ठेवले नसते. त्यांनी काँग्रेस तर संपविले आहेतच आणि शिवसेनेचीही काय परिस्थिती झाली हे सर्वजण पाहत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
मी आजही मैत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या हातात हात घालून बसतो. काँग्रेसमध्ये माझे वडील मंत्री असताना ते ज्या संस्था पहात होते त्या संस्था बंद करण्यात आल्या. हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे खाते असलेल्या मंत्र्यांनी केले. आमचा संघर्ष हा अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहिला आहे. आम्ही मंत्री असताना जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या विरोधातच लढत आलो आहोत. आम्ही आघाडीत होतो तरी शेतकरी हिताच्या विरोधातील निर्णयांचा आम्ही विरोध केला. औरंगाबादला धरणातील पाणी देण्याला आम्ही विरोध केला त्यावेळी जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे होते. ते आमच्या बरोबर होते त्यावेळी आम्ही फार आनंदी होतो असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्यथा देश चीनकडे गहाण राहिला असता
काँग्रेसने आम्हाला मंत्रीपद दिले त्याचा उपयोग आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे भले व्हावे यासाठी वापरले. मात्र सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचा संघर्ष होतो. व तो संघर्ष आजही आहे. 2008साली काँग्रेसने जेव्हा राजीव गांधी फाउंडेशनसाठी चीन सरकारकडून पैसे घेतले. तीन ते चार वर्षे चीनकडून फाउंडेशनमध्ये दान स्वीकारण्यात आले. चीनच्या याच पैशामुळे पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकेवर आर्थिक संकट आले. सध्या जर देशात युपीए सरकार असते तर तेही याच पद्धतीने चीनच्या आर्थिक जाळ्यात अडकले असते. देश चीनकडे गहाण राहिला असता. जगातील युद्ध खोरी व आर्थिक मंदीतही देश तरला याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक नीती जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्थतज्ज्ञ असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही चीनची आर्थिक खेळी लक्षात आली नव्हती. याचे आश्चर्य वाटते. त्यांनी या गोष्टी का थांबविल्या नाहीत. युपीए 1 मध्ये त्यांनी पैसे घेतले त्या प्रमाणे त्यांनी आताही पैसे घेतले असते. त्यामुळे देश चीनच्या आर्थिक कचाट्यात फसला असता, असे मत त्यांनी मांडले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.