सोनई परिसरात बंद, मोर्चे : गडाख पिता-पुत्रांना धमकी देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी
Strictly closed in Sonai, Kharwandi areaSarkarnama

सोनई परिसरात बंद, मोर्चे : गडाख पिता-पुत्रांना धमकी देणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी

सोनईतील व्यापारी व युवकांनी पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढून आरोपीस अटक करण्याची मागणी केली.

सोनई (जि. अहमदनगर) - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) व त्यांचे चिरंजीव उदयन गडाख यांना ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून धमकी दिल्याचा निषेध म्हणून सोनई, चांदे व खरवंडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावात आज कडकडीत बंद पाळून जाहीर निषेध करण्यात आला. सोनईतील व्यापारी व युवकांनी पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढून आरोपीस अटक करण्याची मागणी केली. ( Strict closure in Sonai, Kharwandi area to protest against the threat received by Minister Gadakh )

मंत्री गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी (ता. 22) रोजी लोहगाव शिवारात गोळीबार झाल्यानंतर दोन दिवसाने गडाख पितापुत्रास घरात घुसून ठोकू, त्यांच्यासाठी परदेशी बनावटीच्या 20 पिस्तुल आणून ठेवल्या आहेत, असे संभाषण असलेली ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर संपूर्ण नेवासे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गोळीबार व धमकी प्रकरणाचा निषेध म्हणून आज सर्व गावे व वाड्यावस्त्यांवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

सोनई येथे व्यापारी, तरुण मंडळाचे युवक, ग्रामस्थ व शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. येथे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे यांनी गोळीबार व धमकीच्या ऑडिओ क्लीपचा जाहीर निषेध केला. सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, माजी सरपंच कल्याण गडाख, व्यापारी महावीर चोपडा, ललित चंगेडिया, तेजकुमार गुंदेचा, मनोज चंगेडिया उपस्थित होते.

घोडेगाव, चांदे, वडाळा, कांगोणी, शिरेगाव, शनिशिंगणापूर,

करजगाव, लोहगाव, खरवंडी या मोठ्या गावासह लहान गावात व वाड्यावस्त्यांवर बंद पाळण्यात आला. प्रत्येक गावात आज सकाळी ग्रामस्थांनी एकत्र जमून निषेध सभा घेतली.मंत्री गडाख व उदयन गडाख यांना अधिक बंदोबस्त देवून धमकी देणाऱ्या आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी प्रत्येक गावात करण्यात आली.सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल व रामचंद्र कर्पे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संशयित आरोपीचे कोडे..

सोनई ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात पिस्तुल लाभधारकांचे 17 नावे कोड्यात टाकणारी दिली आहे. यामध्ये दोन वकील बंधू, घोडेगाव रस्त्यावरील हॉटेल मालक बंधू, प्रसिद्ध फरसाण विक्रेत्याचा मुलगा, बँकेंचा दैनंदिन ठेव प्रतिनिधी, शनिशिंगणापुरातील एक डॉक्टर असा त्यात उल्लेख केला आहे. हे कोड्यातील नावे जाहीर भाषणात सांगण्यात आल्याने उपस्थित अचंबित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.