नगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक : कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू

दोन गटात झालेल्या वादामुळे दगडफेक झाली. या दगडफेकीत महापालिकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
AMC
AMCSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू असताना दोन गटात झालेल्या वादामुळे दगडफेक झाली. या दगडफेकीत महापालिकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. दत्तात्रेय केशव जाधव ( वय 50 ) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ( Stone pelting on anti-encroachment squad of Ahmednagar Municipal Corporation: Work stoppage agitation of trade union )

अहमदनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे पथक आज दुपारी झेंडीगेट परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी व डम्प ट्रक सह दाखल झाले. या पथकात 7 ते 8 कर्मचारी होते. मात्र या पथकाला पोलीस संरक्षण नव्हते. पथक जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय ते बुथ हॉस्पिटल दरम्यान पोचले. पथक तेथील अतिक्रमणे काढत होते. अतिक्रमण काढत असताना तक्रारदार व अतिक्रमणधारकांत वाद सुरू झाला. वादाने अचानक उग्र स्वरूप धारण केले.

AMC
नगर महापालिका अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर 15 वर्षे आकारत होती घरपट्टी

जमावाकडून परस्परावर अचानक दगडफेक सुरू झाली. यात काही जणांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेकले गेले. यात जेसीबीत बसलेले महापालिका कर्मचारी दत्तात्रेय जाधव यांच्या डोक्याला मार लागला. त्यांच्यावर जवळच असलेल्या बुथ हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. जाधव यांच्या डोक्याला सात टाके पडले असल्याचे सांगितले जाते.

ही माहिती मिळताच अहमदनगर महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जाधव यांना घेऊन थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. जाधव यांनी जमावाविरोधात सरकारी कामात अडथळा व जीवघेणा हल्ला करण्याची फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

AMC
सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

महापालिकेचे कामकाज ठप्प

अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाची निषेध करत महापालिका कामकाज ठप्प करण्याचा निर्णय घेतला. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

अतिक्रमण विरोधी पथकाला पोलीस संरक्षण का मिळाले नाही याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. महापालिकेच्या कर उपायुक्तांनी पोलीस संरक्षण का घेतले नाही याची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी. दगडफेक करणा-या आरोपींना अटक करण्यात यावी. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत महापालिकेचे कामकाज ठप्प राहिल.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in