मोहिते पाटील, शहाजी पाटील, बबनदादा शिंदे हे आज खूष असतील...

Solapur ZP आरक्षणात मातब्बर घराण्यांसाठी अनुकूल जागा
Shahaji Patil
Shahaji Patilsarkarnama

सोलापूर : Solapur जिल्हा परिषदेच्या 77 गटांसाठी व पंचायत समितीच्या 154 गणांसाठी आज आरक्षण सोडत झाली. आज झालेल्या आरक्षण सोडतीनूसार जिल्हा परिषदेच्या आगामी सदस्यांमध्ये माळशिरस, सांगोला व बार्शी या तीन तालुक्‍यांचा वरचष्मा राहण्याची शक्‍यता आहे. माळशिरसमधील 11 पैकी 6 जागा, बार्शीतील 6 पैकी 3 जागा व सांगोल्यातील 8 पैकी 3 जागा सर्वसाधारण राहिल्याने या तालुक्‍यांमधून दमदार नेतृत्व झेडपीत येण्याची शक्‍यता आहे.

माळशिरस तालुक्‍यातील संग्रामनगर, यशवंतनगर, माळीनगर, बोरगाव, मांडवे आणि पिलीव हे सहा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहेत. मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ग्रामीण भागातील त्यांच्या प्रभावी समर्थकांचा झेडपीत प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. सांगोला तालुक्‍यातील महूद बुद्रुक, एखतपूर आणि घेरडी हे तीन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राहिले आहेत. आमदार शहाजी पाटील यांच्या कुटुंबातील युवा नेतृत्व महूद गटातून झेडपीत दिसण्याची शक्‍यता आहे. बार्शी तालुक्‍यातील उपळे दुमाला, पानगाव व मालवंडी हे तीन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राहिले आहेत.

Shahaji Patil
Sangli ZP : संग्रामसिंह देशमुखांचा पत्ता कट तर सम्राट महाडिकांसाठी संधी

माढा तालुक्‍यातील लऊळ हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राहिला आहे. येथून आमदार बबनराव शिंदे यांच्या परिवारातील सदस्य झेडपीत येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात कोंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राहिला असल्याने येथून माजी आमदार दिलीप माने यांच्या कुटुंबातील सदस्य झेडपीत येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मोहोळ तालुक्‍यातील सहा पैकी फक्त पेनूर हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे. या गटात चुरशीची लढत होण्याची शक्‍यता असून माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक रामदास चवरे, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्‍यता आहे.

Shahaji Patil
Pune ZP : जुन्नरमध्ये आशा बुचके, देवराम लांडे नशीबवान; तर इतरांना धक्का!

पंढरपूर तालुक्‍यातील 10 पैकी भोसे व रोपळे हे दोनच जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहेत. भोसेमधून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांचा जिल्हा परिषदेत प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. रोपळेमधून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुभाष माने यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. करमाळा तालुक्‍यातील पांडे आणि वीट हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राहिले आहेत. या गटातून जिल्हा परिषदेत कोण येणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्‍यातून सलगर व तोळणार हे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कुटुंबातील सदस्य तोळणूर जिल्हा परिषद गटातून झेडपीत येण्याची शक्‍यता आहे. मंगळवेढा तालुक्‍यात भोसे हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असल्याने या गटातील लढत चुरशीची मानली जात आहे.

Shahaji Patil
भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत यांना आरक्षणात लाॅटरी...

दक्षिणमध्ये महिलाराज, नेत्यांमध्ये अस्वस्थता

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील सातही जिल्हा परिषद गटांमध्ये विविध प्रवर्गाच्या महिला सदस्या असणार आहेत. सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जमाती या तीन वर्गातील महिलांसाठी सातही गट आरक्षित झाले आहेत. या आरक्षणातून दक्षिण सोलापूर तालुक्‍यात महिला राज येणार असले तरीही दुसरीकडे या तालुक्‍यातील पुरुष नेतृत्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. जिल्हा परिषद आरक्षण सोडतीच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्‍यातून न्यायालयात धाव घेतली जाण्याची शक्‍यता आहे. झेडपीमध्ये अनुसुचित जमातीसाठी असलेला एकमेव गट हा देखील होटगीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्‍यातच राखीव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com