महेश कोठेंनी अवलंबले पवारांचे धक्कातंत्र : चंदेले, खरटमलनंतर बेरियाही राष्ट्रवादीच्या वाटेवर

या प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सोशल इंजिनिअरिंग करत बेरजेचे राजकारण केले आहे.
Mahesh kote-sharad Pawar
Mahesh kote-sharad PawarSarkarnama

सोलापूर : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले (कै.) विष्णुपंततात्या कोठे यांचे चिरंजीव, माजी महापौर महेश कोठे यांनी अद्यापही तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. तरीही ते पूर्ण ताकदीनिशी सध्या सोलापूर शहरात राष्ट्रवादीचे काम करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्या पद्धतीने धक्कातंत्राचा अवलंब करतात, त्याच धक्कातंत्राचा अवलंब माजी महापौर कोठे यांनीही केला आहे. (Solapur NCP had no idea about entry of Sudhir Kharatmal and Nalini Chandile )

सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदेले आणि कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अनपेक्षित व कोणत्याही चर्चेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. माजी महापौर नगरसेवक ऍड. यू. एन. बेरिया यांची पवार यांच्यासोबत झालेली भेट म्हणजे पुढील टप्प्यात बेरियादेखील राष्ट्रवादीत दिसणार, हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे.

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे म्हणून एकेकाळी ओळख असलेले कोठे, ऍड. बेरिया, खरटमल आणि चंदेले हे आता राष्ट्रवादीसोबत आहेत. खरटमल आणि चंदेले यांच्या प्रवेशाची थोडीशीही कल्पना सोलापूर राष्ट्रवादीतील अनेकांना नव्हती. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रवेशाची चर्चा होती; परंतु ते शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे चंदनशिवे व त्यांचे समर्थक हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार की कॉंग्रेसचा हात धरणार? याची चर्चा पवारांच्या दौऱ्यानंतर सोलापुरात रंगली आहे. महेश कोठे यांनी खरटमल व चंदेले यांच्यासह नागनाथ क्षीरसागर, सुहास शिंदे, सुभाष डांगे, मारुती तोडकरी, रतिकांत कमलापुरे यांच्यासह इतर प्रभावी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला आहे. या प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने सोशल इंजिनिअरिंग करत बेरजेचे राजकारण केले आहे. निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या लहान-मोठ्या समाजातील प्रभावी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने सोबत घेतले आहे.

Mahesh kote-sharad Pawar
वाबळेवाडी शाळेवर कारवाईची मागणी करणाऱ्या त्या तीन झेडपी सदस्या कोण?

सोलापूर महापालिकेत थोडे लक्ष घातले आणि थोडी ताकद दिली तर या ठिकाणी आपण नंबर वन होऊ शकतो, याचा आत्मविश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी येत्या काळात किमान महिन्यातून एकदा सोलापूरला येण्याचा शब्द दिला आहे. आगामी निवडणूक भाजप विरोधी पक्षांना सोबत घेऊन सन्मानजक आघाडी करुन लढण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविली आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेतील दिग्गज मंडळी सोबत घेऊन सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपसोबत तगडा सामना खेळण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. विशेष म्हणजे हा सामना खेळत असताना ज्या कॉंग्रेस व शिवसेनेची माणसं राष्ट्रवादीने फोडली, त्याच शिवसेना व कॉंग्रेसकडे राष्ट्रवादी आज सन्मानजनक आघाडीचा प्रस्ताव ठेवत आहे, हे विशेष.

Mahesh kote-sharad Pawar
अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

चर्चा करूनच राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय : चंदनशिवे

सोलापूर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे व त्यांचे अन्य दोन सहकारी हे मधल्या काळात वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी सोलापुरात असतानाही ते सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला नव्हते. याबाबत नगरसेवक चंदनशिवे म्हणाले की, शहर व ग्रामीणमधील आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतील चर्चा अद्यापही शरद पवार यांच्यासोबत झाली नाही. सोलापूरच्या दौऱ्यात ही चर्चा होण्यासाठी वेळ मिळेल अशी माझी अपेक्षा होती. परंतु वेळ मिळाला नाही. चर्चा करूनच प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com