
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगल्या कामांकडे बघुन सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले आहे. त्यांचे लोकदायित्व ते पार पाडत आहेत. परंतु तुमचे तोंड बघितल्यावर अजित पवार यांनी पैसे दिले असा डांगोरा ते पिटत आहात. तुम्ही तुमचा मुखडा दाखवल्याने अजित पवार यांनी निधी दिला हे जर खरे असेल तर फक्त एखाद-दुस-या कामासाठीच तुम्ही तुमचे सुमूख किंवा कुमूख का दाखवले. सातारकरांसाठी अधिक वेळा तुमचे मुख त्यांनी दाखवून, अजित दादांकडून अधिक कामे-निधी का मंजूर करुन घेतली नाहीत, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
खासदार उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले की, दुतोंडी आणि स्वार्थी असणा-या बाजारबुणग्यांची कुजकट दुर्गंधी युक्त घाण यापूर्वीच सातारकरांनी पालिकेतुन बाहेर काढून दूर फेकून दिली आहे. त्यावेळी 'नाक कापले तरी भोके आहेत' असे म्हणत वर तोंड करुन ते फिरत आहेत. हे दुटप्पी राजकारणी साविआच्या कामाचे अभिनंदन करुन आपणच निधी आणला अशा अविर्भावात आहेत.
प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन कसे केले, वर्क ऑर्डर आहे का, असले नकारात्मक प्रश्न ज्यांनी उभे केले, तेच आज प्रशासकीय इमारतीसाठी रुपये १० कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन करीत आहेत. गेल्या पाच वर्षात एक तरी मोठे काम दाखवा असे काल पर्यंत केकाटणारे, आज ग्रेड सेपरेटर आम्ही केला, प्रशासकीय इमारत चांगली होईल, असे भाष्य करीत आहेत. गेल्या पाच वर्षात साविआने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून लोकहिताची कामे केली आहेत. त्यांच्याकडे ४० वर्षे सत्ता असताना जे काही व्हायला पाहिजे ते कधीच झाले नाही. त्यामुळे साविआने केलेल्या कामांचा धसका घेवून, दुतोंडी भुमिका त्यांना घ्यावी लागत आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
आता हे फुकटचे फौजदार १० कोटींबद्दल संबंधीत मंत्री महोदयांचे इतक्या उशीरा आभार-अभिनंदन करीत आहेत. म्हणजे 'बैल गेला आणि झोपा केला' अशी त्यांची अवस्था आहे. यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. जनतेच्या तव्यावर आपल्या पोळया भाजुन घ्यायच्या आहेत. सहकारी संस्था झाल्या, कारखाना चावून-चावून दात आणि कारखाना दोन्ही बोथट व्हायला लागलेत. आता सभासद जागा होत असल्यामुळे दुसरे आयते कुरण म्हणून ते निव्वळ स्वार्थासाठी पालिकेकडे पहात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगल्या कामांकडे बघुन सातारकरांनाच नव्हे तर सर्वांनाच भरभरुन दिले आहे. लोकहिताच्याकामासाठी, त्यांनी वेळोवेळी मंजू-या, निधी दिला आहे. त्यांचे लोकदायित्व ते पार पाडत आहेत. परंतु यांचे तोंड बघितल्यावर अजित पवार यांनी पैसे दिले असा डांगोरा ते पिटत आहेत. तुम्ही तुमचा मुखडा दाखवल्याने अजित पवार यांनी निधी दिला हे जर खरे असेल तर फक्त एखाद-दुस-या कामासाठीच तुम्ही तुमचे सुमूख किंवा कुमूख किंवा जे काय असेल ते का दाखवले ? सातारकरांसाठी अधिक वेळा त्यांचे मुख त्यांनी दाखवून, अजित दादांकडून अधिक कामे-निधी का मंजूर करुन घेतली नाहीत, असा प्रश्न सामान्य सातारकर विचारत आहेत.
सातारा विकास आघाडीची कामाची एक पध्दत आहे. सर्वसामान्य सातारकरांचा चौफेर विकास हे साविआचे धोरण आहे. त्यासाठी लागेल ते करायची जिद्द आणि चिकाटी आहे. कितीतरी विकास कामे फक्त आणि फक्त साविआने मार्गी लावलेली आहेत. आता तर हद्दवाढ सुध्दा झाली आहे. त्यामुळे आयत्या रेघोटा मारणा-या स्वार्थ्यांध बाजीरावांना सातारा पालिकेच्या पाय-या सुध्दा दिसू नयेत अशी भुमिका समस्त सातारकरांनी घेतली आहे. उपसुन, फेकून दिलेली घाण पुन्हा कधीच नको, असेच सातारकर आता म्हणत आहेत.
तुमचा सगळीकडचा भ्रष्ट कारभार चव्हाटयावर आणणार आहे. त्याच्या कागदपत्राची सुरळी चांगलीच ठासणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात, कागदपत्रांची सुरळी करा म्हणणा-यांची दातखीळ बसलेली पहायला मिळणार आहे. एकंदरीत श्रेयासाठी धडपडणारी नविआ म्हणजे नकारात्मकता आहे. नगरविकास आघाडी एका नगराची म्हणजेच पडतळीत जागा घेवून, त्यातील प्लॉट विकणा-या विशिष्ट कंपूची आहे. नविआचे मुळातच असलेले नगण्य अस्तित्व दाखवण्यासाठी यांची ही फुकटची फौजदारी आणि बाजीरावकी चालु आहे, असे देखील उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.