साताऱ्याच्या विकासासाठी तुम्ही वेगळं काय केलं ? ; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना सवाल

ग्रेडसेपरेटर म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय हे एक कोडंच सातारकरांना पडलं आहे.
ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosale
ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosalesarkarnama

सातारा :आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सातारा पालिकेतील भष्ट्राचारावरुन त्यांनी उदयराजेंवर गंभीर आरोप केले आहे. याबाबत शिवेंद्रराजेंनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. ( Shivendraraje Bhosale news update)

"गेल्या पाच- सहा वर्षात नगरपालिकेला अक्षरशः धुवून खाल्लं. टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी सत्तारूढ आघाडीत एकमेकांचे गळे धरणे आणि मारामाऱ्या करणे, हि अनोखी परंपरा सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलीआहे. त्यामुळे कोण चोर आणि कोण लुटारू हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय. एक ना धड भराभर चिंद्या असा कारभार पालिकेत पाहायला मिळाला. तुम्ही शहराच्या विकासासाठी वेगळं केलंय तरी काय," असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

"ज्या सर्वसामान्य महिलेला सातारकरांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले त्या माधवीताईंना तुम्ही कामच करून दिले नाही, याचे खुलासा करण्याची हिम्मत उदयनराजेंनी दाखवावी," असे आव्हान त्यांनी उदयनराजेंना केले आहे.

"नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे तर नगरपालिकेचे कामच आहे. पण, तुम्ही ज्या विकासकामांची जंत्री जाहीर केली त्यातील एकतरी काम सातारकरांच्या उपयोगाचे आहे का ? भुयारी गटर योजनेची वर्क ऑर्डर २०१८ ला निघाली. आजही या योजनेचे काम पूर्ण नाही, किंबहुना हे काम कधी पूर्ण होणार हे कोणालाच माहिती नाही. या योजनेमुळे शहरातील चांगल्या रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आणि हाच मुद्दा खासदार महोदयांना बोचला," असे शिवेंद्रराजेंना म्हटलं आहे.

ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosale
Sanjay Raut : ईडीने जप्त केलेली रोकड अयोध्या दौऱ्यासाठी ; एकनाथ शिंदेंचेही नाव

"कचरा डेपोतील कचऱ्याचे ढीग रिकामे होणे अपेक्षित असताना कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. हि योजना सपशेल फेल गेली असून केवळ ठेकेदाराला पोसण्याचा उद्योग सुरु आहे. ग्रेड सेप्रेटर म्हणजे तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. राजवाड्याकडून कलेक्टर ऑफिसकडे जायला मार्ग असणे आवश्यक होते मात्र, ग्रेडसेपरेटर म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय हे एक कोडंच सातारकरांना पडलं आहे. यातही केवळ पैसे वाया घालवण्याचा प्रकार झाला आहे," असे त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

शिवेंद्रराजेंना आपल्या पत्रकात म्हणतात..

अमृत योजनेचा लाभ सर्वच नगरपालिकांना मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही वेगळं काय केलंय हा खरा प्रश्न आहे. डंपर, डंपर करताय तो डंपर गेले तीन वर्षांपासून बंदच आहे, हे सातारकरांनाही माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामात तर मोठा गोलमाल आहे. ग्रेड सेपरेटर ऐवजी उड्डाण पुलाचा प्रस्ताव होता पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उड्डाण पूल रद्द करून ग्रेड सेपरेटर मंजूर केला. त्यातले ८० लाख रुपये शिल्लक राहिले म्हणून त्यातून तुम्ही शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम सुरु केले. मात्र हे पैसेही संपले आणि काम अपूर्ण राहिले. वास्तविक या कामाचे कोणतेही नियोजन केले नाही. शिवतीर्थ म्हणजे सातारकरांची अस्मिता आणि शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय.

हे भूषणावह आहे का ?

शिवतीर्थ म्हणजे प्रेरणास्थान. मग या कामासाठी लागणाऱ्या निधीची पालिकेने आधीच तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तुमच्या नाकर्तेपणामुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे निधी अभावी हे कामही अर्धवट राहिले. स्वच्छता अभियानात पाचगणी, कराड शहरांनी बाजी मारली पण, जिल्ह्यातील मोठी पालिका असलेला सातारा शेवटी, हे भूषणावह आहे का ?

तेच-तेच डायलॉग मारणे आता बंद करा

केवळ शोबाजी करायची आणि बोलबच्चनगिरी करून मीच कैवारी असा कांगावा आणि दिखावा करायचा हे सातारकरांना नवीन नाही. तेच- तेच डायलॉग मारणे आता बंद करा. समोरासमोर या म्हणजे नेमकं काय? जिल्हा बँक निवडणुकीत तुम्ही संचालक म्हणून बिनविरोध झाल्यावर सुरुची बंगल्यावर आला. माझी भेट घेऊन मला मिठाईचा बॉक्स दिला, आणि आभार मानले. त्यावेळी मी समोरच होतो ना. आणखी कसले समोरासमोर पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या कुकर्मावर पडदा टाकण्यासाठी वापरत असलेले तेच-ते डायलॉग आता बदला, सातारकरांना आता त्याचाही कंटाळा आला आहे. तुम्ही किती आणि कसला विकास केला हे सुज्ञ सातारकरांनी पाहिले आहे आणि त्यामुळेच सातारकर तुम्हाला 'नारळ' दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com